पूजा झाल्यानंतरचे कृत्य अग्निपुराणामध्ये सांगितले आहे ते असे -
"याप्रमाणे पूजा करून पुरुषसूक्तांनी, विष्णुसूक्तांनी व इतर स्तोत्रांनी स्तवन करावे; वाद्यांचा घोष, गीतांचे मंगल स्वर, निरनिराळ्या सत्कथा, प्राचीन पुराणेतिहास यांनी प्रेक्षकगणांसहवर्तमान ती रात्र घालवावी." या ठिकाणी कथांसंबंधी वैचित्र्य सांगितले ते देश, भाषा, काव्य इत्यादिकांसंबंधाचे जाणावे. कारण सूक्ते अगोदर सांगून नंतर पुराणे, कथा वगैरे सांगितली. 'प्रेक्षकगणांसहवर्तमान' यावरून नृत्य गायन, इत्यादिकांचा अंतर्भाव होतो. वैदिक सूक्तांनी स्तुतियुक्त, पुराण इतिहास वगैरेंनी मिश्रित, गायन नृत्य इत्यादिकांसह, देशभाषा काव्य वगैरे वैचित्र्य ज्यामध्ये आहे अशा प्रकारचा कथायुक्त जागर ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य अशा तीन वर्णांना आहे; शूद्रादिकांनी अशा प्रकारचा जागर करू नये. वैदिक सूक्तांनी रहित व गीत इत्यादिकांनी युक्त असा जागर चारी वर्णांना साधारण आहे असे दुसरे वचन आहे. गोकुळातील कृष्णजन्माच्या लीला श्रवण केल्यानंतर वैष्णवांनी परस्परांवर दही इत्यादिकांचे सिंचन करावे. कारण "दही, दूध, घृत, उदक यांनी गोपालांनी परस्परांवर सिंचन व लेपन केले" असे भागवतामध्ये वचन आहे. त्यावरून असा विधि प्राप्त होतो. हा उत्सव सांप्रत महाराष्ट्रामध्ये "गोपालकाला" या नावाने लोक करितात असे मला वाटते. हे सर्व श्रीमान अनंतदेव यांनी कौस्तुभामध्ये स्पष्ट सांगितले आहे. करिता मीच सांगतो म्हणून मजवर कोणी रागाऊ नये. अशा प्रकारच्या कथांनी युक्त जागर रामनवमी एकादशी इत्यादि इतर उत्सवांमध्येही करावा असे सांगितले आहे; कारण पूजा, जागर इत्यादिकांनी युक्त असा व्रतोत्सव साधारण आहे- आणि महाराष्ट्रीय लोकांमध्ये असा आचारही आहे. 'उत्सव पर्वणीचे दिवशी करावे अथवा रोज करावे' असे वचन आहे, याकरिता प्रेमळ भगवदभक्त वर सांगितलेल्या कथा, उत्सव इत्यादि रोज करतात असे मला वाटते.