नरकाला भिणार्यांनी आश्विन वद्य चतुर्दशीला तील व तेल यांचे अभ्यंगस्नान करावे. हे कृत्य करण्याचे जे तीन काळ सांगितले आहेत ते असे-
१. रात्रीच्या शेवटच्या प्रहारापासून आरंभ करून, अरुणोदयापर्यंत.
२. तेथून चंद्रोदयापर्यंत व
३. तेथूनच सूर्योदयापर्यंत.
यांचे वर्गीकरण पहिल्याहून दुसरा श्रेष्ठ व दुसर्याहून तिसरा श्रेष्ठ असे आहे; म्हणून, चंद्रोदयापासून सूर्योदयापर्यंतचाच मुख्य काळ होय. सकाळचा वेळ गौण समजावा. आदल्या दिवशीच जर चंद्रोदयव्याप्ति असेल तर तीच चतुर्दशी घ्यावी व दुसर्या दिवश जर चंद्रोदयव्यापिनी असेल, तर ती घ्यावी. चंद्रोदयव्याप्तीकरिता या दिवशी सूर्यास्तकाळी उल्कादान (कोलित दाखविणे) दीपदान वगैरे कृत्ये त्या त्या काली जर चतुर्दशी नसली, तरी करावीत. चंद्रोदयव्याप्ति जर दोन दिवस असेल तर पहिल्या दिवसाची घ्यावी. दोन्ही दिवस जर चंद्रोदयव्याप्ति नसेल, तर जे तीन प्रकार संभवतात, ते असे.
१. आदल्या दिवह्सी चंद्रोदयानंतर उषःकाल व सूर्योदय यांना व्यापून आरंभ झालेली व दुसर्या दिवशी चंद्रोदयापूर्वीच संपलेली.
उदाहरण - त्रयोदशी घटका ५८ प० ५० व चतुर्दशी घ० ५७. या प्रकारात चतुर्दशीने युक्त अशा एका भागात स्नान करावे.
२. आदल्या दिवशी फक्त सूर्योदयाला व्यापून आरंभ झालेली व दुसर्या दिवशी चंद्रोदयापूर्वीच संपलेली चतुर्दशी आणि
३. दोन्ही दिवशी सुर्योदयाला स्पर्श न केल्यामुळे क्षय झालेली चतुर्दशी. उदाहरण - त्रयोदशी ५९ घ. ५९ प. व चतुर्दशी ५७ घ. किंवा त्रयोदशी २ घ. व चतुर्दशी ५४ घ. या दोन्ही प्रकारात दुसर्याच दिवशी चंद्रोदय काली अभ्यंगस्नान करावे; कारण, यात चौथा प्रहर वगैरे जे गौणकाल त्यात चतुर्दश्ची व्याप्ति आहे. या दोन्ही प्रकारात अरुणोदयाच्या आधीही चतुर्दशीत स्नान करावे, असे काही ग्रंथकारांचे सांगणे आहे. अरुणोदयानंतरच्या चंद्रोदय वगैरे काळी चतुर्दशी अमावास्येने युक्त असताही स्नान करावे असेही इतर काही ग्रंथकार सांगतात. चतुर्दशीचा क्षय असता, आदल्या दिवशी त्रयोदश्लाच स्नान करावे असे जे काही ग्रंथकारांचे म्हणणे आहे ते मात्र अयोग्य आहे.
'सीतालोष्ठसमायुक्त सकण्टकदलान्वित । हर पापमपामार्ग भ्राम्यमाणः पुनः पुनः ॥'
या मंत्राने नांगराने उकरून काढलेल्या मातीचे ढेकूळ व आघाड्याच्या फांद्या ही स्नानात आपल्या अंगावर तीन वेळा फिरवावीत. अभ्यंगस्नानानंतर गंध लावल्यावर कार्तिकस्नान करावे. योग्य वेळी स्नान करणे शक्य नसल्यास सूर्योदयानंतर, गौणकालातही स्नान करण्यास हरकत नाही. संन्याशादिकांनी सुद्धा अभ्यंगस्नान अवश्य करावे. कार्तिकस्नानानंतर पुढीलप्रमाणे यमतर्पण करावे- 'यमायनमः यभं तर्पयामि' असा उच्चार करून, सव्याने अथवा अपसव्याने(जसा अधिकार असेल त्याप्रमाणे) तिलमिश्रित पाण्याच्या तीन ओंजळी देवतीर्थाने (अंगुलेच्या अग्रांनी) अथवा पितृतीर्थाने (आंगठा व तर्जनी यांच्या मधल्या भागाने) दक्षिणेकडे तोंड करून द्याव्या. पुढच्या तर्पणाविषयीही हेच समजावे. नंतरचे तर्पण -
'धर्मराजायनमः धर्मराजं तर्पयामि । मृत्येवनमः मृत्युं तर्पयामि । अंतकायनमः अंतकं तर्पयामि । वैवस्वतायनमः वैवस्वतं तर्पयामि । कालायनमः कालंतर्पयामि । सर्वभूतक्षयायनमः । सर्व भूतक्षयं तर्पयामि । औदुंबरायनमः औदुंबर तर्पयामि । दध्नायनमः दध्नं तर्पयामि । नीलायनमः नीलं तर्पयामि । परमेष्ठिनेनमः परमेष्ठिनं तर्पयामि । वृकोदरायनमः वृकोदरं तर्पयामि । चित्राय नमः चित्रंतर्पयामि । चित्रगुप्ताय नमः चित्रगुप्तंतर्पयामि ।'
ज्याचा बाप जिवंत असेल त्याने हे तर्पण सातूमिश्रित पाण्याने करावे. नंतर प्रदोषकाली मनोहर असे दिवे, देऊळ, मठ, घराभोवतालची जागा व भिंती, बाग, रस्ते, गोठा, घोड्यांची ठाणे, हत्ती बांधण्याच्या जागा वगैरे ठिकाणी तीन दिवस दिवे लावावेत. सूर्य तुला राशीत असताना चतुर्दशी व अमावास्या या तिथींवर प्रदोषकाळी पुरुषांनी हातात जळते कोलीत अथवा पेटलेली चूड घेऊन, आपल्या पितरांना रस्ता दाखवावा. तो मार्ग दाखवताना जो मंत्र म्हणावा लागतो तो असाः -
अग्निदग्धाश्चे ये जीवा येप्यदग्धाः कुले मम ।
उथ्ज्वलज्ज्योतिषा दग्धास्तेयांन्तु परमां गतिम् ॥
यमलोकं परित्यज्यआगता ये महालये उज्ज्वलज्ज्योतिषावर्त्म प्रपश्यंतु व्रजंतुते ॥'
या दिवशी नक्तषभोजनाचे मोठे फल आहे.