मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|द्वितीय परिच्छेद|
भीष्मपञ्चकव्रतमुक्त

धर्मसिंधु - भीष्मपञ्चकव्रतमुक्त

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.

This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


कार्तिक शुक्ल एकादशीपासून पांच दिकस भीष्मपंचकव्रत करावे. हे शुद्ध एकादशीचे दिवशी व्रताला आरंभ करून चतुर्दशीने विद्ध नसून सूर्योदयव्यापिनी अशा पौर्णिमेचे दिवशी समाप्त करावे. जर शुद्ध एकादशीला आरंभ केला असता क्षयाचे योगाने दिवस कमी होऊन पौर्णिमेपर्यंत पाच दिवसांच्या व्रताची समाप्ति होत नसेल तर विद्ध एकादशीचे दिवशीही आरंभ करावा. शुद्ध एकादशीचे दिवशी आरंभ केला असता दिनवृद्धीच योगाने प्रतिपदाविद्ध पौर्णिमा समाप्ति येईल तर सहा दिवस होतात, आणि व्रत तर पाच दिवसांचे आहे, याकरिता चतुर्दशी विद्ध पौर्णिमेला समाप्ति करावी. या व्रताचा प्रयोग कौस्तुभ वगैरे ग्रंथी पहावा. कार्तिक महिन्यामध्ये एकादशी इत्यादि पर्वणीचे दिवशी चंद्रबल व ताराबल पाहून शिव व विष्णु यांच्या मंत्रांची दीक्षा ग्रहण करावी. कारण "कार्तिकामध्ये मंत्रदीक्षा घेतली असता ती जन्मापासून मुक्त करणारी म्हणजे मोक्ष देणारी होते" असे नारदाचे वचन आहे. या मासात तुलसीच्या काष्ठांची माला धारण करावी असे स्कंदपुराणातील द्वारकामाहात्म्यामध्ये व विष्णुधर्मामध्ये सांगितले आहे. "तुलसीच्या काष्ठांची माला केशवाला अर्पण करून नंतर जो मनुष्य ती भक्तिपूर्वक धारण करतो त्याचे पाप निश्चयाने रहात नाही." मालेच्या प्रार्थनेचा मंत्र -

"तुलसीकाष्ठसंभूते माले कृष्ण जनप्रिये ।

बिभर्मि त्वामहं कण्ठे कुरु मां कृष्णवल्लभम् ॥"

या मंत्राने प्रार्थना केल्यावर कृष्णाचे कंठी अर्पण केलेली माला जो कार्तिक मासामध्ये यथाविधि धारण करतो तो विष्णुपदाला जातो. असे निर्णयसिंधूमध्ये स्पष्ट सांगितले आहे. सर्व पुस्तकांमध्ये नाही तरी निर्णयसिंधूच्या एखाद्या पुस्तकामध्ये "याविषयी मूळ विचार करावा" असे वाक्य आढळते. याचे तात्पर्य, मालाधारणाविषयी जी विधिवाक्ये आहेत ती प्रमाणभूत नाहीत असे नाही. कारण आपणच स्कंदपुराणातील विष्णुधर्मामध्ये लिहिलेली वाक्ये सांगून ती वाक्ये निर्णयसिंधुकार आपणच अप्रमाण म्हणतील तर हानिकारक प्रसंग येईल- आणि रुद्राक्षांच्या आकाराप्रमाणे केलेल्या तुलसीकाष्ठाच्या मण्यांची माला करून ती गळ्यामध्ये धारण केल्यावर पूजेला आरंभ करावा, तुलसीकाष्ठांच्या मालेने भूषित असा पितर अथवा देव यांची पूजा वगैरे करील तर त्याचे ते कर्म द्विगुणित होते" अशी जी पद्मपुराणामध्ये पातालखंडात ७९ व्या अध्यायामध्ये प्रत्यक्ष वचने आहेत त्यांच्याशी विरोध येईल. याविषयी, आषाढमास प्रकरणामध्ये आषाढ शुक्ल द्वादशीविषयी अनुराधा योगरहित द्वादशीचे ठिकाणी पारणा करावी असे सांगून त्याला प्रमाणभूत जी आभाकासितपक्शेषु, मैत्राद्यपते स्वपितीह विष्णुः इतादि भविष्यपुराणातील विष्णुधर्मग्रंथाची वाक्ये लिहून हे निर्मूल आहे असे ज्याप्रमाणे शेवटी सांगितले त्याप्रमाणे या दुसर्‍या ठिकाणीही जाणावे. म्हणजे माधवादिक मूलग्रंथामध्ये ते वचन मिळत नाही एवढेच निर्णयसिंधूच्या परिभाषेचे तात्पर्य जाणावे. अप्रमाणाविषयी नाही. अप्रमाणाविषयी मानले असता भाद्रपद व कार्तिक या महिन्यांमध्ये त्याच वाक्याला अनुसरून जो पारणानिर्णय सांगितला त्याची संगति लागणार नाही; तसेच कौस्तुभादि सर्व नवीन ग्रंथांमध्येही त्याच वाक्याला अनुसरून सांगितलेल्या निर्णयाचीही सिद्धि होणार नाही; आणि त्या वाक्याला अनुसरून सर्व शिष्ट जन जी पारणा करतात तिलाही प्रमाण नाही असे होईल. त्याप्रमाणे माधवादि ग्रंथात मिळत नाही एवढ्यामुळेच हे अप्रमाण असे जे म्हणतील त्यांचे खंडन जाले. माधवादिकांनी लिहिलेली बहुत वाक्ये व आचार हीही प्रमाणभूत नाहीत अशी आपत्ति येईल. जेथे 'यानि 'यत्तु' या स्वरूपाने यत्पदाचा आरंभ दाखवून पुढे ती निर्मूल आहेत असे दाखविले-उदाहरणार्थ श्रवणद्वादशीप्रकरणी श्रवणाला उत्तराषाढावेधाचा निषेध आहे असे सांगणारी वाक्ये-तेथे त्यांचे अप्रमाणाविषयीच तात्पर्य आहे असे सूक्ष्मबुद्धी यांनी जाणावे. या संबंधाने शंका-माधवादि ग्रंथांमध्ये मिळत नाही म्हणून निर्मूल नव्हे, असे म्हटल्यास अशी कोणती वाक्ये? सामान्यतः काष्ठमालाधारणाचा निषेध करतात ती अथवा विशेषतः तुलसीकाष्ठामलाधारणाचा निषेध करतात ती? या शंकेचे समाधान-प्रथम पक्ष सामान्यतः काष्ठमालाधारणाचा निषेध करणार्‍या वाक्यांचा बाध विशेष जी तुलसी, आवळी यांच्या काष्ठांची माला धारण करण्यास सांगणार्‍या विधिवाक्यांनी स्पष्ट होतो. दुसरा पक्ष - ज्याप्रमाणे अतिरात्र यज्ञामध्ये षोडशी पात्रांचे ग्रहण विधिनिषेधरूपाने वैकल्पिक आहे त्याप्रमाणे या ठिकाणी तुलसी काष्ठमालाधारणाचा विकल्प आहे असे समजावे. या विकल्पाची व्यवस्था वैष्णव व अवैष्णव या भेदांनी होते. कारण, मूलवचनांमध्ये विष्णु इत्यादि पदे आहेत. यास्तव निर्मूल असे म्हणता येत नाही म्हणूनच माधवादिकांनी ही वाक्ये लिहिली नाहीत. हरिवासराच्या लक्षणाचे ठिकाणी वैष्णवांनीच हविवासर अवश्य पाळावा असे पुरुषार्थचिंतामणीमध्ये सांगितले आहे. म्हणून या वाक्यांचे ग्रहण न केले तरी त्याने माधवादिकांना कमीपणा येत नाही, अशा रीतीने माधवादिकांचा अभिप्राय जाणणे शक्य आहे. याप्रमाणे आवळीच्या काष्ठांची माला धारण करण्याचा विधि जाणावा. रामार्चनचंद्रिका इत्यादि ग्रंथामध्ये तुलसीच्या काष्ठांचे मणि करून त्यांच्या मालेने जप करावा. इत्यादि विधिवाक्ये स्पष्ट आहेत; आणि अशीच दुसर्‍या ग्रंथांमध्येही बहुत आढळतात. तसेच पूर्वी अग्रोदक, गंध, पुष्पे, अक्षता इत्यादि पूजा सामुग्री मिळवून हातपाय धुवून ज्याप्रमाणे सामर्थ्य असेल त्याप्रमाणे पीतांबर इत्यादि शुद्ध वस्त्र धारण करून अलंकार धारण केलेला असा मोत्ये, पोवळी, कमलाक्ष, तुळसीच्या काष्ठांचे मणि यांच्या माला कंठामध्ये धारण करून पूजेला आरंभ करावा, असे प्रयोगपारिजात ग्रंथामध्ये आह्निकांत पूजाप्रकरणी सांगितले आहे. याप्रमाणे सर्व देशांमधील वैष्णवांमध्ये तुलसीच्या काष्ठांची माला धारण करून जप करण्याचा सांप्रदायही आढळतो. यावरून भस्म इत्यादि धारण करण्याचा द्वेष करणारे जे वैष्णव त्या वैष्णवांच्या द्वेषाने शैवपंथाचा आग्रह धरणारे शैव मात्र तुलसीकाष्ठमालेचा द्वेष करतात याप्रमाणे निर्णय झाला. इतका विस्तार पुरे झाला.

N/A

References : N/A
Last Updated : May 05, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP