मार्गशीर्षातल्या पौर्णिमेला दत्ताचा जन्म झाला. ही पौर्णिमा प्रदोषव्यापिनी घ्यावी. मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशी किंवा पौर्णिमा या तिथींवर आश्वलायनांनी प्रदोषकाळी जे प्रत्यवरोहण करावे, त्याला कर्मकालव्यापिनी (म्हणजे प्रदोषव्यापिनी) तिथि घ्यावी. या कर्माचा प्रयोग, प्रयोग-रत्न, कौस्तुभ वगैरे ग्रंथात पहावा. मार्गशीर्षादि चार महिन्यांतल्या कृष्णाष्टम्यांना अष्टकाश्राद्धे, त्यांच्या आधीच्या सप्तम्यांना पूर्वेद्युः श्राद्धे व पुढच्या नवम्यांना अन्वष्टक्य श्राद्धे करावीत. याप्रमाणे भाद्रपदाच्या कृष्णपक्षातही अष्टकाश्राद्धे करावीत. आश्वलायनांहून जे इतर शाखांचे असतील त्यांनी, याप्रमाणे पाच अष्टकाश्राद्धांचा विधि करावा. आश्वलायनांनी मार्गशीर्षादि चारच अष्टका कराव्या. भाद्रपदातल्या कृष्णाष्टमीला 'माध्यावर्षश्राद्धं कर्तुं पूर्वेद्युः श्राद्धं करिष्ये' असा संकल्प करावा व नवमीला 'अन्वष्टकश्राद्धं करिष्ये' असा संकल्प करावा, हा यातला विशेष आहे. याप्रमाणेच भाद्रपदातल्या कृष्णाष्टमीच्या श्राद्धाला 'माध्या वर्ष' असे म्हणतात म्हणून आश्वलायनांचा चारच अष्टकांचा पक्ष समजावा आणि इतर शाखीयांनी पौषादि तीनच अष्टकांचा सुद्धा पक्ष समजावा. याप्रमाणे सार्या अष्टका करण्यास असमर्थ असणार्याने एकच अष्टकाश्राद्ध करावे. हे जे एकच श्राद्ध माघी पुनवेनंतरच्या सप्तमी, अष्टमी व नवमी या तीन तिथींवर करण्याचे ज्याचे सामर्थ्य नसेल त्याने, ते श्राद्ध माघातल्या कृष्णाष्टमीला करावे. ह्या अष्टकाश्राद्धाकरिता अपराह्णव्यापिनी अष्टमी घ्यावी. अपराह्णव्याप्ति जर दोन दिवस असली तर किंवा दोन्ही दिवशी नसली तर, त्याचा निर्णय वर्षश्राद्धाप्रमाणेच समजावा. अष्टमीच्या अनुरोधाने पहिल्या व पुढच्या दिवशी पूर्वेद्युःश्राद्ध व अन्वष्टक श्राद्ध ही अनुक्रमे करावीत. या बाबतीत सप्तमी वगैरे तिथींनाही अपराह्णव्याप्ति पाहाण्याचे कारण नाही. ज्याला एक दिवसही श्राद्ध करयाची ऐपत नसेल अशाच्या करता जे गौणपक्ष सांगितले आहेत, ते येणेप्रमाणे- बैलाला गवत घालावे, अग्नीत पांढरी गवते जाळावीत. गुरूपाशी सांग वेदाध्ययन केलेल्यांना उदकुंभ द्यावा, अथवा श्राद्धाचे मंत्र म्हणावेत. उपास करावा असेहि काही ग्रंथात सांगितले आहे. अष्टक श्राद्धे अधिक मासात करू नयेत, असे नारायणवृत्तीत म्हटले आहे. अष्टकादि तीन श्राद्धांचा प्रयोग, कौस्तुभात आणि प्रयोगरत्न या ग्रंथात असा सांगितला आहे की, या अष्टमीच्या श्राद्धात कामकाल नावाचे विश्वेदेव आणि सप्तमी व नवमी यावर करण्याच्या श्राद्धात पुरूवार्द्रसंज्ञक हे घ्यावेत. आहिताग्नि पूर्वेद्युःश्राद्धाचा अंगभूत आहे. अन्वष्टकाश्राद्धाचा अग्नौकरणहोम आणि तीन दिवसपर्यंत हवीचे श्रपण (शिजविणे) ही दक्षिणाग्नीत करावीत. असा याचा विशेष आहे. बाकीचे कर्म गृह्याग्नीप्रमाणे करावे. अष्टकाश्राद्धाचा जर लोप होइल तर प्राजापत्य अथवा उपास ही प्रायश्चित्ते करावीत. अन्वष्टक्य श्राद्धाचा लोप झाल्यास, त्या दिवशी 'एतर्द्युभिःसुमना०' या मंत्राचा शंभर वेळ जप करावा.