याच पुनवेला त्रिपुरदीप लावावेत. या तिथीवर काम्यवृषोत्सर्व करणे फार उत्तम होय. त्याचप्रमाणे हत्ती, घोडा, रथ, तूप, गाय वगैरे महादाने करणेही चांगले. आश्विनी पुनव, सूर्यग्रहण, कर्कसंक्रांत व मकरसंक्रांत हेही काळ वृषोत्सर्गासाठी आहेत. माघ, चैत्र, वैशाख, फाल्गुन व आषाढ यांतील पौर्णिमा, रेवती नक्षत्र, वैधृति, व्यतीपात, युगादि, मन्वादि, सूर्यसंक्रांत, बापाची मृत्युतिथि व अष्टकाश्राद्धाचे दिवस (पुढे मार्गशीर्षात सांगितलेले) हे कालसुद्धा वृषोत्सर्गाला दुसर्या ग्रंथात सांगितले आहेत. या वृषोत्सर्गासंबंधाने निरनिराळ्या शाखांना भिन्नपणे उपयोगी पडणारे प्रयोग कौस्तुभात जे सांगितले आहेत, ते पाहावे.