कार्तिक शुद्ध द्वितीयेला यमद्वितीया म्हणतात. युधिष्ठिरा, पूर्वी यमुनेचे या तिथीला यमाला आपल्या घरी जेवू घातले, म्हणून हिला लोकांत यमद्वितीया म्हणतात. या तिथीला आपल्या घरी जेवू नये. त्रास झाला तरी बहिणीच्या हातचे जेवावे, म्हणजे धन, धान्य व सुख यांचा लाभ होतो. वस्त्रे व अलंकार यांनी सर्व बहिणींचा सत्कार करावा. स्वतःला बहीण नसल्यास, मित्रादिकांच्या बहिणींचे पूजन करावे. बहिणीने सुद्धा भावाची पूजा करावी. त्याने तिला अवैधव्य आणि भावाला दीर्घायुष्य ही मिळतात. तसे न केल्यास सात जन्मपर्यंत भ्रातृनाश होतो. ही द्वितीया जर पूर्व दिवशीच अपराह्णव्यापिनी असेल तर तीच घ्यावी. दोन्ही दिवस जर व्याप्ति असेल अथवा नसेल तर दुसर्या दिवसाची घ्यावी. या दिवशी यमुनास्नान, अपराह्णकाळी चित्रगुप्त व दूतांसह यम यांचे पूजन आणि यमाला अर्घ्यदान करणे या गोष्टी आवश्यक आहेत.