याचा आरंभ पौषशुद्ध एकादशी, पौर्णिमा किंवा अमावास्या या तिथींपैकी कोणच्यातरी एकीस करावा. माघ महिन्यातल्या द्वादशी, पौर्णिमा वगैरे तिथींवर आरंभाच्या अनुक्रमाने समाप्ति करावी; किंवा मकरसंक्रमणापासून कुंभसंक्रमणापर्यंत स्नान करावे. स्नानकाल-अरुणोदयाला आरंभ करून, प्रातःकाळी नक्षत्रे दिसत दिसत तोपर्यंतचा काळ उत्तम होय. नक्षत्रे दिसेनाशी झाली असता मध्यमकाळ व सूर्योदयानंतरचा हीन काळ होय. सूर्याचा किंचित उदय होतो आहे अशा वेळी माघात उदके असे सांगतात की, ब्रह्महत्या अथवा सुरापान करणाराला आम्ही पावन करतो. ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ, भिक्षुक, बाल, वृद्ध, युवा, नरनारी व नपुंसक ही सर्वजणे माघस्नानाची अधिकारी आहेत. या स्नानाचे उदकाच्या मानाने अधिकाधिक फळ आहे. घरातल्या कढत पाण्याने स्नान केल्याचे सहा वर्षे फळ मिळते. विहीर वगैरेचे स्नान केल्याने बारा वर्षे फळ मिळते. तलावादिकांचे स्नान केल्याने त्याच्या दुप्पट, नदीच्याने चौपट, गंगेत केल्याने बारा वर्षांच्या सहस्त्रपट, गंगायमुनांच्या संगमात केल्याने गंगेच्या शतपट फळ मिळते. कोठेही जरी स्नान केले, तरी प्रयागाचे स्मरण करावे. माघस्नानाला समुद्रस्नानही सर्वोत्तम होय.