या अपरपक्षामध्ये सप्तमी, अष्टमी व नवमी या तीन दिवशी
"मादावर्षश्राद्धं कर्तु पूर्वेद्युः श्राद्धं करिष्ये माध्यावर्षश्राद्धं करिष्ये अन्वष्टक्यश्राद्धं करिष्ये'
असा क्रमाने संकल्प करून, आश्वलायनांनी सर्व अष्टकाविधि करावा. हे अष्टकाविकृतिरूप श्राद्ध आश्वलायनांनी एकाष्टकाकरणपक्षीही करावे. इतर शाखीयांनी अष्टकारूपच करावे. पंचाष्टकाकरणपक्षे 'अष्टकाश्राद्धं करिश्ये' अशा संकल्पाने करावे. एकाष्टकापक्षी करू नये. नवमीला नऊ देवतांच्या उद्देशाने अन्वष्टक्यश्राद्ध सर्व शाखीयांनी करावे. अष्टमीला अष्टकाश्राद्ध जरी केले नसले, तरी गृह्याग्नीसंबंधाने जो विधि सांगितला आहे, त्याच विधीने करावे. कारण, त्या दिवशी अन्वष्टक्यश्राद्धच मुख्य आहे. जे कोणी गृह्याग्निरहित असतील त्यांनी, आणि माता आधी मरण पावून मागाहून ज्याचा बाप मरण पावला असेल त्याने म्हणजे मृतमातापितृकांनी नऊ देवतांच्या उद्देशाने पाणिहोमादि विधीने करावे. आई मेली असून, बाप जिवंत असता जरी अनुपनीतता असली, तरी- आई, आजी व पणजी- त्रयीच्या उद्देशाने एकपार्वणरूप पुरूरवर्द्रदेवसहित सपिंडक श्राद्ध करावे. स्वतःची आई जिवंत असून सावत्र आई मेलेली असल्यास, सापत्न मातृत्रयीच्या उद्देशाने करावे. स्वतःची आई आणि सावत्र आई अशा दोघीही मेलेल्या असल्यास द्विवचनप्रयोगाने, सापत्न माता जर अनेक असतील, तर स्वमातेसह बहुवचनप्रयोगाने एका ब्राह्मणाला एकच क्षण द्यावा आणि अर्घ्य व पिंडही एकेकच द्यावा. पितामही व प्रपितामही यांच्या श्राद्धांना दोन ब्राह्मण व दोन पिंड द्यावे- असे पार्वण आवश्यक आहे. माता जर अनेक असतील तर तितके ब्राह्मण व तितके पिंड द्यावे असेही कोणी ग्रंथकार म्हणतात. स्वमाता व सापत्न माता जर जिवंत असतील, तर गृह्याग्नीने रहित व ज्याचा बाप मेला आहे अशानेही करू नये. कारण, अन्वश्टक्य श्राद्धामध्ये मातृयजन हेच मुख्य असल्याने, त्या ठिकाणी मातृपार्वणच आधी करावे असे काही ग्रंथकारांनी सांगितले आहे असे वाटते. बाप मेल्यानंतर जर आई मेली असेल तर गृह्याग्नीने युक्त असणारांनी या नवमीला अन्वष्टक्य श्राद्ध अवश्य करावे. कारण, ते नित्य आहे. गृह्याग्निरहित असे जे कोणी असतील, त्यांची माता पित्याच्या निधनानंतर जर मृत झाली असेल, तर त्यांना हे श्राद्ध आवश्यक नाही. बापाच्या आधी मेलेल्या आईच्या श्राद्धाचा, बापाच्या मरणानंतर लोप होतो, हे वचन प्रमाण मानुन कोणी नवमीचे श्राद्ध पितृमृत्यूनंतर करीत नाहीत. भर्त्याबरोबर सती गेलेल्या मातामही, भगिनी, कन्या, मातृष्वसा इत्यादि जर निपुत्रिका असतील तर व पिता आणि माता यांच्या कुलात उत्पन्न झालेल्या इतरही सर्व सौभाग्यवती सतींचे श्राद्ध या नवमी तिथीलाच करावे. नवर्याच्या आधी मेलेल्या स्त्रियांचे श्राद्ध भर्तृनिधनानंतर करू नये, म्हणूनच ही अविधवा नवमी या नावाने प्रसिद्ध आहे. याकरिता पत्नीचे देखील नवमीश्राद्ध करावे. या अविधवानवमीचे श्राद्धाचा महालयाप्रमाणेच वृश्चिक राशीमध्ये सूर्य प्रवेस करीपर्यंत गौणकाल आहे. याप्रमाणे दौहित्रप्रतिपदेच्या श्राद्धाचाही वृश्चिक राशीला सूर्य जाईपर्यंत गौणकाल आहे असे कालतत्त्वविवेचन ग्रंथात सांगितले आहे. या अविधवानवमी श्राद्धाचे ठिकाणी आणि प्रतिसांवत्सरिक श्राद्धादिकांचे ठिकाणी सुवासिनीभोजन देखील द्यावे. 'भर्त्याचे अगोदर मरण पावलेली स्त्री व भर्त्यासह सती गेलेली स्त्री यांचे उद्देशाने त्यांचे श्राद्धामध्ये ब्राह्मण व सुवासिनी यांना भोजन घालावे इत्यादि मार्कंडेयाचे वचन आहे. या नवमीचे दिवशी जीवत्पितृकांनी अथवा गर्भिणीपतींनींही पिंडदान करावे. नवमीश्राद्धाचा असंभव असेल तर 'ममान्वष्टक्याकरणजनितप्रत्यवायपरिहारार्थ शतवारं' एभिर्द्युभिः सुमना०' इति मंत्रजपं करिष्ये'
असा संकल्प करून त्या मंत्राचा जप करावा. अन्वष्टक्य श्राद्धामध्ये सामवेदी यांनी पितृपार्वणमात्र करावे; मातृपार्वण व मातामहपार्वण ही करू नयेत असे निर्णयसिंधूमध्ये सांगितले आहे.