वैशाख महिन्यांत वृषभ संक्रांतीच्या पहिल्या सोळा घटका पुण्यकाळ. संक्रांति जर रात्रीं आली असेल तर पुण्यकाळ मागें सांगितल्याप्रमाणें समजावा. या महिन्यांत प्रातःस्नान, तिळांनीं पितृतर्पण व धर्मघटाचें दान - हीं कर्में करावींत. त्याचप्रमाणें-गंध, फुलांच्या माळा, पन्हें, केळीं वगैरे वस्तूंनीं ब्राह्मणांची वसंतपूजा करावी. वैशाख अथवा ज्येष्ठ यांपैकीं ज्या महिन्यांत अतिशय उकाडा होत असेल त्या महिन्यांत सकाळीं नित्यपूजा करुन, गंध व पाणी यांनीं भरलेल्या भांडयांत विष्णूची स्थापना करावी आणि त्याची पंचोपरांची पूजा करावी. त्या तीर्थानें--स्वतःला आपल्या बायकोला व घरांतल्या इतर माणसांना पावन करावें. हें कृत्य द्वादशीला दिवसां न करतां रात्रीं थोडा वेळ पाण्यांतल्या विष्णूची पूजा करुन, त्याला त्याच्या योग्य ठिकाणीं ठेवावा. या वैशाख महिन्यांत कृष्णगौर नांवाच्या तुलसींनीं विष्णूची त्रिकाल पूजा करावी. याचें फल मुक्ति आहे. सकाळीं स्नान करुन पिंपळाच्या मुळावर पुष्कळ पाणी घालावें व प्रदक्षिणा कराव्या. असें केल्यानें अनेक कुलें तरुन जातात. गाईचें अंग खाजविलें असतांहि, हेंच फल मिळतें. या महिन्यांत-एक वेळ जेवणें, संध्याकाळीं जेवणें किंवा अवचित म्हणजे कोणी न बोलावतांच जेवायला जाणें-हीं सर्व इच्छित हेतु पार पाडतात. या महिन्यांत पाणपोई घालणें, देवावर पाण्याची गळती बांधणें, पंखा, छत्री, जोडा, चंदन वगैरे वस्तूंचें दान देणें-या गोष्टींचें मोठें फल मिळतें. वैशाख महिना आल्यास, मलमासांत काम्यव्रताची समाप्ति करुं नये-असा निषेध सांगितला असल्यानें, दोन महिनेपर्यंत-हविष्यान्नाचें भक्षण वगैरे नियमांचें अनुष्ठान करावें. चांद्रायणादिक व्रतांची समाप्ति मलमासांत देखील होते. वैशाख शुद्ध तृतीयेला गंगास्नान, जवसांचा होम, जवसांचें दान व जवस खाणें या गोष्टी केल्यास सर्व पापांचा नाश होतो. वैशाख शुद्ध तृतीयेला जो कोणी कृष्णाचें अंग चंदनानें विभूषित करतो, तो वैकुंठाला जातो. या तृतीयेला अक्षय्यतृतीया असें नांव आहे. या दिवशीं जें जें कांहीं ---जप, होम, पितृतर्पण, दान वगैरे करावें, तें सारें अक्षय्य होतें. बुधवार असून रोहिणी नक्षत्र जर या तृतीयेला असण्याचा योग असेल, तर तो महापुण्यकारक होय. या दिवशीं जर जप, होम वगैरे कृत्यें करायचीं असलीं तर त्यांबद्दलचा निर्णय, पुढें युगादि तिथींचा जो निर्णय सांगितला आहे, त्याप्रमाणेंच येथेंही जाणावा. ही तृतीया कृतयुगाच्या आरंभाचा दिवस होय. या दिवशीं युगादिश्राद्ध पिण्डांवांचून करावें. श्राद्ध करणें अशक्य असल्यास, निदान तिलतर्पण तरी करावें; शुक्लपक्षांतल्या युगादि तिथीचें कृत्य, पूर्वाह्नकाळीं करावें; पूर्वाह्नीं करण्याचा संभव नसल्यास अपराह्नींहि करावें. कृष्णपक्षांतल्या युगादि तिथींचें कार्य अपराह्नकाळीं करावें, असा मन्वादि तिथिप्रकरणांत निर्णय सांगितला आहे. दिवसाचे दोन समान भाग करुन त्यांतल्या पूर्वार्धांत जर एकदेशव्याप्ति दोन दिवस असेल व ती जर सहा घटकांहून अधिक असेल, तर अक्षय्य तृतीया दुसर्या दिवसाची घ्यावी. सहा घटकांहून कमी व्याप्ति असल्यास पहिल्या दिवसाची घ्यावी. मन्वादि, युगादि, चंद्रसूर्यांची ग्रहणें, व्यतिपात आणि वैधृति यांसंबंधीं करायचीं जीं कृत्यें, तीं तत्कालव्यापिनी अशा तिथींवर करावींत, असें वचन आहे. यांस संपूर्णव्याप्तीचा अपवाद असल्यानें, श्राद्धादिक कृत्यें तृतीयेंतच करावींत. पुरुषार्थचिंतामणींत जे गांधर्व, कुतुप आणि रौहिण या नांवांचे अनुक्रमें -सातवा, आठवा आणि नववा असे मुहूर्त दिले आहेत, ते युगादि श्राध्दांचे काल असल्यानें, शुक्लपक्षांत मध्यम दिनमानानें, तेरापासून पंधरा घटकांपर्यंतच्या ज्या तीन घटका, त्यांत व्याप्ति असलेल्या तिथींवर श्राद्ध करावें. कृष्णपक्षांत सोळाव्या घटकेपासून तीन घटकांत श्राद्ध करावें. अशी तीन घटकांची व्याप्ति दोन्ही दिवशीं असल्यास किंवा नसल्यास शुक्लपक्षांत दुसर्या दिवसाची तिथि घ्यावी. दुसर्या दिवशीं जर तेरा घटकांच्या आंतच तिथि संपेल आणि पहिल्या दिवशीं जर तेराव्या घटकेपासून तीन घटकांत संपूर्ण अथवा एकदेशव्याप्ति असेल, तर कर्मकालाविषयीं अधिक आधार आहेत, म्हणून पहिल्याच दिवसाची तिथि घ्यावी, असें जें सांगितलें आहे, तेंच मला सयुक्तिक वाटतें. या तृतीयेला देवता व पितर यांच्या नांवानें उदकुंभदान करावें.
’श्रीपरमेश्वरप्रीतिद्वारा उदकुंभदानकल्पोक्तफलावाप्त्यर्थं ब्राह्मणाय उदकुम्भदानं करिष्ये’ असा संकल्प करावा आणि सूत गुंडाळलेल्या आणि गंध, फळ, यव इत्यादिकांनीं युक्त अशा कलशाची आणि ब्राह्मणाची पंचोपचारें पूजा करुन,
’एष धर्मघटोदत्तो ब्रह्मविष्णुशिवात्मकः ।
अस्य प्रदानात् तृप्यन्तु पितरोपि पितामहाः ।
गन्धोदकतिलैर्मिश्रं सान्नं कुम्भं फलान्वितम् ।
पितृभ्यः सम्प्रदास्यामि अक्षय्यमुपतिष्ठतु ॥’
या मंत्रानें ब्राह्मणाला कलशाचें दान द्यावें. युगादि तिथींवर समुद्रस्नानाचें मोठें पुण्य सांगितलें आहे. वैशाखाचा महिना जर अधिक असेल, तर दोन्ही महिन्यांत युगादि श्राद्ध करावें. युगादि तिथीला उपास केल्याचें मोठें फळ आहे. युगादि आणि मन्वादि या तिथींवर रात्रीं जेवण केलें असतां, ’अभिस्ववृष्टिं०’ या मंत्राचा जप करावा. युगादि श्राद्धाचा लोप झाल्यास
’युगादिश्राद्धलोपजन्यप्रत्यवायपरिहारार्थ मृग्विधानोक्तं प्रायश्चित्तं करिष्ये’
असा संकल्प करुन, ’नयस्यद्यावा०’ या ऋचेचा शंभर वेळ जप करावा. सर्व युगादि तिथींचा हाच निर्णय समजावा. असा हा अक्षय्यतृतीयेचा निर्णय जाणावा.