आधी क्षौर करून नंतर बारा वेळा मातीची स्नाने व प्राणायाम हा विधि करुन व्यासपूजा करावी. या पूजेचा विधि संक्षेपाने सांगतो. देशकालादिकांचा उच्चार करून,
'चातुर्मास्यवाससंकल्पं कर्तु श्रीकृष्णव्यासभाष्यकाराणां सपरिवाराणां पूजनं करिष्ये'
असा संकल्प करावा. मध्ये श्रीकृष्ण व त्याच्या पूर्वदिशेकडून प्रदक्षिणेच्या वळणाने- वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध यांचे आवाहन करावे. या श्रीकृष्णादि पाच देवतांच्या दक्षिणभागी व्यास व त्यांच्या पूर्वेकडून प्रदक्षिणाक्रमाने-सुमंतु, जैमिनि, वैशंपायन व पैल अशा व्यासपंचकाचे आवाहन करावे. श्रीकृष्णादि देवतांच्या डाव्या बाजूला भाष्यकार श्रीमच्छंकराचार्य आणि त्यांच्या पूर्वदिशेकडुन प्रदक्षिणाक्रमाने पद्मपाद, विश्वरूप, त्रोटक व हस्तामलक या आचार्यांचे आवाहन करावे. श्रीकृष्णादि देवतापंचकात श्रीकृष्णाच्या दोन बाजूस ब्रह्मा आणि रुद्र, पूर्व वगैरे चार दिशांस- सनक, सनंदन, सनातन आणि सनत्कुमार; आणि पुढे-गुरु, परमगुरु, परमेष्ठिगुरु, ब्रह्मा, वसिष्ठ, शक्ति, पराशर, व्यास, शुक, गौडपाद, गोविन्दपाद, शंकराचार्य व इतर ब्रह्मनिष्ठ यांचे आवाहन करावे. या तिन्ही पंचकांच्या आग्नेयीस - गणपति, ईशान्येस क्षेत्रपाल, वायव्येस दुर्गा, नैऋत्येस सरस्वती आणि पूर्व वगैरे आठ दिशांत इंद्रादिक लोकपाल यांचे आवाहन करून, त्यांची पूजा करावी. नारायणाच्या आठ अक्षरी मंत्राने त्यातल्या श्रीकृष्णाची पूजा करून, इतरांची-प्रणवपूर्वक 'नमोन्त' अशी त्यांची नावे घेऊन, त्यांच्या नाममंत्रानी (पूजा) करावी. काही आडकाठी नसल्यास,पूजेनंतर 'चतुरो वार्षिकान्यासानिह वसामि' असा मनात संकल्प करावा आणि
'अहं तावन्निवत्स्यामि सर्वभूतहिताय वै । प्रायेन प्रावृषि प्राणिसंकुलं वर्त्म दृश्यते अतस्तेशमहिंसार्थ पक्षान्वै श्रुतिसंश्रयान् । स्थास्यामश्चतुरो मासानत्रैवासति बाधके।'
असा तोंडाने संकल्प करावा. त्यानंतर गृहस्थांनी
'निवसन्तु सुखेनात्र गमिष्यामः कृतार्थताम् । यथाशक्तिच शुश्रूषां करिष्यामो वयं मुदा ॥'
असे सांगावे. त्यानंतर गृहस्थांनी अधिक वयोमानाप्रमाणे असणार्या यतींना आणि यतींनी परस्पराना नमस्कार करावा. हा विधि जर पुनवेला करणे अशक्य झाले तर द्वादशीला करावा. आषाढकृष्ण द्वितीयेला अशून्यशयनव्रत करावे. या व्रतात लक्ष्मीसह विष्णूची पलंगावर पूजा करून,
'पत्नीभर्तुर्वियोग च भर्ताभार्यासमुद्भवम् । नाप्नुवन्ति यथा दुःखं दम्पत्यानि तथा कुरु ॥'
असा मंत्र म्हणून नवराबायकोचा विरह न करण्यासाठी प्रार्थना करावी. त्यानंतर चंद्राला अर्घ्य देऊन नक्तभोजन करावे. याप्रमाणे चार महिनेपर्यंत प्रत्येक वद्य द्वितीयेला पूजा करून, बायको असलेल्या ब्राह्मणाला शय्यादान द्यावे आणि सर्व सामुग्रीसह प्रतिमेचे दान करावे. हे व्रत केल्याने सात जन्मपर्यंत अक्षय्य असे दाम्पत्यसुख, पुत्रधनादिकांचा अक्षय्य लाभ व सन्तत गृहस्थाश्रम यांची प्राप्ति होते. या व्रताला चंद्रोदयाने व्यापलेली तिथि घ्यावी; कारण, पूजा वगैरे सर्व काही चंद्रोदयानंतर करावी, असे या बाबतीत सांगितले आहे. द्वितीया जर दोन दिवस चंद्रोदयव्यापिनी असली अथवा दोन्ही दिवशी तशी नसली, तर दुसर्या दिवसाची घ्यावी. याप्रमाणे अनंतोपाध्यायांचे पुत्र जे काशीनाथोपाध्याय, त्यांनी रचिलेल्या धर्मसिंधुसारातील आषाढमासाच्या निर्णयाचा उद्देश येथे संपला.