फाल्गुनी पुनव ही मन्वादि तिथि आहे. ही पूर्वाह्णव्यापिनी घ्यावी. हिला होलिका म्हणतात. प्रदोषव्यापिनी व कल्याणीरहित अशी ही घ्यावी. ही जर दोन दिवस प्रदोषव्यापिनी असेल, अथवा दुसर्या दिवशी जर हिची प्रदोषकाळी एकदेशव्याप्ति असेल, तर दुसर्याच दिवसाची घ्यावी; कारण पहिल्या दिवशी कल्याणीदोष येतो. दुसर्या दिवशी प्रदोषकाळी जर स्पर्श होत नसेल व पहिल्या दिवशी प्रदोषकाळी कल्याणी असेल अशावेळी दुसर्या दिवशी जर पौर्णिमा साडेतीन प्रहर किंवा त्याहून अधिक असेल तर, व त्याच्या पुढच्या दिवशी जर प्रतिपदेची वृद्धि असेल तर, दुसर्या दिवशीच्या प्रदोषव्यापिनी प्रतिपदेत होळी करावी. अशावेळी प्रतिपदेचा जर क्षय असेल, तर कल्याणीच्या शेवटच्या भागात अथवा कल्याणीची सुरवात तेवढी सोडून, कल्याणीतच होळी करावी. दुसर्या दिवशी प्रदोषकाळी जर स्पर्शाचा अभाव असेल आणि पहिल्या दिवशी निशीथकाळी जर कल्याणी संपत असेल तर कल्याणी संपल्यानंतर होळी पेटवावी. कल्याणी जर निशीथकालानंतर संपत असेल तर कल्याणिचे तोंड सोडून कल्याणितच होळी करावी. कल्याणीचा आरंभ जर प्रदोषकाली होत असेल, तर कल्याणीनंतर किंवा प्रदोषानंतर होळी पेटवावी. दोन्ही दिवशी प्रदोषकाळी जर पुनवेचा स्पर्श नसेल व पहिल्या दिवशीच कल्याणीचे शेपूट असेल, तर त्यातच होळी करावी. तसा भाग नसल्यास कल्याणीतच प्रदोशकालानंतर होळी करावी. कारण, कल्याणीचे पूर्वार्ध रात्री ग्राह्य होय असे जरी वचन आहे, तरी पहिल्या दिवसाच्या प्रदोषकाळी चतुर्दशीत किंवा दुसर्या दिवशी सायान्हाकाळी होलिका करू नये. होळी दिवसा करणे हे सर्व ग्रंथाच्या विरुद्ध आहे. हे होलिकापूजन, श्रवणकर्माप्रमाणे जेवण झाल्यावरही करतात व ते योग्यही आहे. कोणी होळीची पूजा करून मग जेवतात. त्यांना जेवणाला किंवा होळीच्या पूजेला नियमाने शास्त्रांत सांगितलेला काळ मिळत नाही. पुनवेला जर चंद्रग्रहण असेल, तर वेधात होळीचे पूजन करावे. जर ग्रहण लागलेल्या स्थितीतच उदय पावत असेल, तर ग्रहणांतच होळीचे पूजन करावे व प्रदोषकाळी पुनव नसल्या पूर्वदिवशी करावे.