पहिल्या परिच्छेदांत महिन्यांचा वगैरे विशेषसा निर्णय न सांगतां, तिथि वगैरेंचाच सामान्य निर्णय सांगितला आहे. या दुसर्या परिच्छेदांत-कोणाच्या विशेष महिन्यांतल्या कोणच्या तिथींवर कोणचीं वार्षिक कृत्यें करावींत, त्यांचा निर्णय सांगितला आहे. दाक्षिणात्य (नर्मदेच्या खालचे) लोक, शुद्ध प्रतिपदेपासून अमावस्येपर्यंत महिना मानितात; यास्तव, त्याच प्रांताला योग्य असणारा निर्णय सांगतों. क्वचित् जागीं, पहिल्या परिच्छेदांत सांगितलेल्याच गोष्टींचा जो उल्लेख होईल तो विशेषाच्या बळकटी करतांच असल्यानें, पुनरुक्तीचा दोष मानूं नये. मेषसंक्रान्तीच्या आधींच्या दहा आणि मागूनच्या दहा घटका पुण्यकाळ असतो. मध्यरात्रीच्या आधींच्या रात्रीं जर संक्रान्त येईल, तर पहिल्या दिवसाचा उत्तरार्ध पुण्यकाळ असतो, आणि मध्यरात्रीनंतर जर संक्रान्त येईल, तर दुसर्या दिवसाचा पूर्वार्ध पुण्यकाळ असतो. मध्यरात्रीच्याच वेळीं जर संक्रान्त येईल तर आदला दिवस व पुढचा दिवस, असा दोन दिवस पुण्यकाळ असतो.