आषाढ महिन्यात जी कर्कसंक्राति होते तिला दक्षिणायन असे म्हणतात. कर्कसंक्रांतीच्या आधीच्या तीस घटका जरि पुण्यकाल असतो, तरी तिच्या अगदी सन्निध असणार्या घटकाच अधिक पुण्यदायक असतात. रात्री मध्यरात्रीच्या आधी अथवा नंतर जरी संक्रमण असले, तरी पूर्व दिवशी पुण्यकाळ समजावा, आणि त्यातल्या त्यात मध्याह्ना नंतरचा काळ अधिक पुण्यकारक होय. सूर्योदयानंतर दोन घटकांच्या आत जर संक्रमण असले तर दुसर्याच दिवशी पुण्यकाळ. सूर्योदयाच्या आधीचा तीन घटकांचा जो संध्यासमय, त्यामध्ये जरी कर्कसंक्रमण होत असले तरी दुसर्याच दिवशी पुण्यकाळ समजावा असे ज्योतिषविषयाच्या ग्रंथात सांगितले आहे. या दिवशी करायची दाने, उपास वगैरेची माहिती पहिल्या परिच्छेदात सांगितली आहे. कर्क, कन्या, धनु व कुंभ या राशीवर जेव्हा सूर्य असेल, तेव्हा केशकर्तन वगैरे गोष्टी निषिद्ध मानल्या आहेत. सवंद आषाढाच्या महिनाभर जर एकवेळ रोज जेवण केले, तर पुष्कळ धनधान्य व पुत्र यांचा लाभ होतो. या महिन्यात- जोडा, छत्री, मीठ व आवळे यांचे दान केल्याने वामनाचा संतोष होतो. आषाढ शुद्ध द्वितीया जरी पुष्य नक्षत्राने युक्त असली अथवा नसली, तरी त्या दिवशी श्रीरामाचा रथोत्सव करावा. आषाढ शुद्ध दशमी आणि पौर्णिमा या तिथि मन्वादि असून, यांचा निर्णय पूर्वीच सांगितला आहे.