आषाढ शुद्ध एकादशीला सर्वोपचारांनी युक्त अशा पलंगावर शंखचक्रादि आयुधांनी युक्त व लक्ष्मी पाय चुरीत बसली आहे अशी श्रीविष्णूची प्रतिमा ठेवून, तिची अनेक प्रकारच्या उपचारांनी पूजा करावी.
'सुप्ते त्वयि जगन्नाथे जगत्सुप्तं भवेदिदम् । विबुद्धे त्वथि बुध्यते तत्सर्वं सचराचरम् ॥
अशी तिची मग प्रार्थना करावी. त्या दिवशी उपास करून रात्री जागरण करावे. द्वादशीला पुन्हा पूजा करून, त्रयोदशीला- गायन, नर्तन, वाद्यवादन वगैरेंनी सेवा करावी. असे हे तीन दिवसांचे व्रत आहे. या बाबतीत स्मार्त आणि वैष्णव यांनी आपापल्या एकादशीला शयनीव्रताचा आरंभ करावा. रात्री शयनोत्सव करावा व दिवसास प्रबोधोत्सव करावा. द्वाद्शीला पारण्याच्या दिवशी शयनोत्सव आणि प्रबाधोत्सव हे करावेत, असे कोणी म्हणतात. या बाबतीत देशाचाराप्रमाणे वागावे. हे व्रत अधिक महिन्यात करू नये. आषाढ शुद्ध द्वादशीला जेव्हा अनुराधानक्षत्र नसेल तेव्हा पारणे करावे. त्यातही अनुराधा नक्षत्राचा पहिला चरण मात्र वर्ज्य समजावा. ज्यावेळी द्वादशी थोडी असून वर्ज्य नक्षत्राचा भाग द्वादशीचा अतिक्रम करीत असेल त्यावेळी निषेधाचा त्याग करुन, द्वादशीलाच पारणे करावे असे कौस्तुभात सांगितले आहे. संगवकालाचा भाग टाकून, सकाळी अथवा मध्यान्हकाळी जेवण करावे असे पुरुषार्थ चिन्तामणीत सांगितले आहे.