ऋग्वेद्यांना जसे श्रवणनक्षत्र लागते, त्याचप्रमाणे यजुर्वेद्यांचा श्रावणी पौर्णिमा हाच मुख्य काळ होय. पुनवेला खंड असल्याने, पूर्व दिवशी जेव्हा ती दोन घटकानंतर सुरू झाली असेल व दुसर्या दिवशी बारा घटका व्यापिनी असेल, तेव्हा सर्व यजुर्वेद्यांनी दुसर्या दिवसाचीच घ्यावी. शुद्धाधिक्याने जेव्हा दोन्ही दिवशी सूर्योदयव्यापिनी असेल, तेव्हा सर्व यजुर्वेद्यांनी पूर्व दिवसाचीच घ्यावी. आदल्या दिवशी दोन घटकांनंतर सुरू झाली असून दुसर्या दिवशी चार-सहा वगैरे बारा घटकांहून जेव्हा कमी असेल, तेव्हा तैत्तिरीय शाखीयांनी दुसर्या दिवसाची घ्यावी. तैत्तिरीय शाखियांखेरीजकरून जे इतर शाखेचे यजुर्वेदि असतील, त्यांनी पूर्व दिवसाची घ्यावी, आणि जेव्हा पूर्वदिवशी दोन घटकांनंतर असेल व दुसर्या दिवशी जेव्हा चार घटकाहून कमी असेल अथवा क्षयामुळे मुळीच नसेल तेव्हा, सर्व यजुर्वेद्यांनी पूर्व दिवसाचीच घ्यावी. हिरण्यकेशी तैत्तिरीयशाखीयांना श्रावणी पौर्णिमा हाच मुख्य काळ आहे. त्या काळाच्या ऐवजी श्रावण महिन्यातले हस्तनक्षत्र घ्यावे. त्या सूत्रात श्रावण शुद्ध पंचमी सांगितली नसल्याने, ती घेऊ नये. भाद्रपदातहि हेच दोन काल उक्त आहेत, हा यातला विशेष जाणावा. खंडतिथि असल्यास, तिचा निर्णय पूर्वी सांगितलाच आहे. हस्त नक्षत्राखेरीज उदयकाळापासून संगवकाळाला स्पर्श करणारे असे जे असेल ते घ्यावे. तसे नसल्यास पूर्वनक्षत्राने जे सिद्ध असेल ते घ्यावे. आपस्तंबांचा उपाकर्मकाल श्रावणी पौर्णिमा हाच मुख्य आहे. तिच्या अभावी भाद्रपदी पौर्णिमा हा विशेष जाणावा. बौधायनांचा काळ श्रावणी पौर्णिमा हा जरी मुख्य आहे तरी काही दोष (अडचण) असल्यास आषाढी पुनवेचा विशेष जाणावा. या तिथी देखील जर खंड असतील, तर त्याबद्दल पूर्वी जो निर्णय सांगितला आहे, तो जाणावा