अष्टमी दोन प्रकारची आहे. शुद्धा आणि विद्धा. दिवसास अथवा रात्रिस सप्तमीयोगरहित अशी ज्या दिवशी जितकी असेल त्या दिवशी तितकी शुद्धा. दिवसास अथवा रात्रीस सप्तमीयोगाने युक्त अशी ज्या अहोरात्रामध्ये जितकी असेल त्या दिवशी तितकी विद्धा. ती पुनः दोन प्रकारची आहे, एक रोहिणी नक्षत्राने युक्त आणि दुसरी रोहिणीनक्षत्रविरहित. त्यामह्ये रोहिणीनक्षत्रविरहित अष्टमीचे भेद उदाहरणाने सांगतो- सप्तमी ५९ घटिका ५९ पळे, अष्टमी ५८ घ. ५ प. ही शुद्ध आहे व येथे दुसर्या कोटीचा संभव नाही म्हणून हिच्यासंबंधाने संशय नाही. सप्तमी २, अष्टमी ५५ ही विद्धा आहे म्हणून दुसर्या दिवशी मुळीच नसल्याने येथे दुसर्या कोटीचा संभव नाही म्हणून हिच्यासंबंधानेही संशय नाही. जेव्हा दोन दिवस केवल अष्टमी असते तेव्हा चार पक्ष संभवतात. ते हे -
१. पूर्वदिवशी निशीथव्यापिनी.
२. दुसर्या दिवशी निशीथव्यापिनी;
३. दोन्ही दिवशी निशीथव्यापिनी; आणि
४. दोन्ही दिवस निशीथव्याप्ति नसणे. रात्रीचे अर्ध म्हणजे निशीथ होय. स्थूलमानाने आठवा मुहूर्त तो निशीथ काल होय.
१. पूर्व दिवशी निशीथव्यापिनीने उदाहरण सप्तमी ४०, अष्टमी ४२. याठिकाणी सप्तमीने युक्त अशी पूर्वविद्धा उपोषणाला घ्यावी. अथवा दुसरे उदाहरण-अष्टमी ६०।४ ही शुद्धाधिक आहे तथापि पूर्व दिवसाचीच घ्यावी
२. दुसर्या दिवशी निशीथव्यापिनीचे उदाहरण- सप्तमी ४७, अष्टमी ४६ याठिकाणी दुसर्या दिवसाचीच उपोषणाला घ्यावी
३. दोन्ही दिवशी निशीथव्यापिनीचे उदाहरण- सप्तमी ४२ अष्टमी ४६ या ठिकाणी दुसर्या दिवसाचीच उपोषणाला घ्यावी.
४. दोन्ही दिवशी निशीथव्याप्ति नसणे सप्तमी ४७, अष्टमी ४२. याठिकाणीही दुसर्या दिवसाचीच घ्यावी. या सर्वपक्षांमध्ये सप्तमीयुक्त अष्टमी असेल तर रात्रीच्या पूर्वार्धाच्या समाप्तिकाली एक कला जरी अष्टमी असली तरी ती निशीथव्यापिनी मानावी. नवमीयुक्त अष्टमी असेल तर रात्रीच्या उत्तरार्धाच्या प्रथम भागात एक कला जरी अष्टमी असेल तरी त्या दुसर्या दिवसाची निशिथव्यापिनी मानावी. सप्तमीचे दिवशी उत्तर भागामध्ये अष्टमी असेल आणि नवमीयुक्त दिवशी पहिल्या भागातच अष्टमी असेल तर निशीथव्याप्ति नाही असे समजावे. याप्रमाणे पुढे सांगावयाचे रोहिणीनक्षत्रयुक्त भेद त्यांचे संबंधानेही असाच निर्णय जाणावा. रोहिणीयुक्त अष्टमीचे ठिकाणी पूर्व दिवशीच निशीथकाली अष्टमी व रोहिणी यांचा योग,
२. दुसर्या दिवशीच निशीथकाली आणि
३. दोन्ही दिवशी निशीथकाली योग असे तीन पक्ष होतात.
१. पूर्व दिवशी शीथकाली अष्टमी व रोहिणी यांचे योगाचे उदाहरण- सप्तमी ४० व त्या दिवशी कृत्तिका अष्टमी ४६ व त्या दिवशी रोहिणी ३६. या ठिकाणी पूर्वविद्धा अष्टमी उपोषणाला घ्यावी. दुसर्या दिवशीच निशीथकाली योगाचे उदाहरण- सप्तमी ४२ आणि कृत्तिका ५०, अष्टमी ४७ आणि रोहिणी ४६. या ठिकाणि दुसर्या दिवसाची अष्टमी घ्यावी.
३. दोन्ही दिवशी निशीथकाली योगाचे उदाहरण- सप्तमी ४२ व कृत्तिका ४३, अष्टमी ४७ व रोहिणी ४८. या ठिकाणी दुसर्या दिवसाची अष्टमी घ्यावी. रोहिणीयुक्त अष्टमीचेच ठिकाणी दोन्ही दिवशी निशीथयोग नाही असा बहुधा संभव असतो.