आश्चिन शुद्ध अष्टमी ही महाष्टमीच होय. ही सूर्योदयी एक घटका जरी असली, तरी नवमीयुक्त घ्यावी. ही सप्तमीने अल्प जरी विद्ध असली, तरी टाकावी. ज्या वेळी ही आदल्या दिवशी सप्तमीने युक्त असेल व दुसर्या दिवशी सूर्योदयी नसेल, अगर एका घटकेहून कमी असेल, त्यावेळी आदल्या दिवसाची सप्तमीने विद्ध असलेली घ्यावी. ही अष्टमी मंगळवारी अतिप्रशस्त होय. पूर्व दिवशी जेव्हा अष्टमी साठ घटका असेल, आणि दुसर्या दिवशी दोन घटका इत्यादि व्यापिनी असेल, तेव्हा दुसर्या दिवसाची नवमीयुक्त देखील टाकून आदल्या दिवसाची संपूर्ण आहे, याकरिता आदल्या दिवसाचीच घ्यावी. या प्रमाणे नवमीचा क्षय असल्यामुळे, दशमीच्या दिवशी सूर्योदयानंतर जर मुळीच नवमी नसेल, तर सूर्योदयकाली व्याप्ति असलेली नवमीने युक्त अशी देखील अष्टमी वर्ज्य करून, सप्तमीयुक्तच अष्टमी घ्यावी. अष्टमीच्या दिवशी पुत्रवन्ताने उपास करू नये. कुलाचारानेच जर प्राप्त असेल, तर किंचित काही खाऊन करावा. बलिदानाव्यतिरिक्त इतर पूजा, उपोषण वगैरेसाठी अष्टमीविद्ध महानवमी घ्यावी. ती जर अष्टमीच्या दिवशी सायंकाळी सहा घटका असेल तरच घ्यावी. सहा घटकांहून जर कमी असेल तर दुसर्या दिवसाचीच घ्यावी. नवमीयुक्त जे महाबलिदान, त्याविषयी दशमीने विद्ध असेल ती घ्यावी. नवमी जेव्हा शुद्धाधिक असेल, तेव्हा ती पूर्ण आहे म्हणून, बलिदानदेखील पूर्व दिवशीच करावे. अष्टमी व नवमी यांच्या संधीच्या ठिकाणी पूजा करावी. अष्टमी व नवमी यांचा जेव्हा मध्यान्ही अथवा अपराह्णी योग असेल, तेव्हा अष्टमी व नवमी यांची पूजा एकाच दिवशी प्राप्त होते. यास्तव, 'अष्टमी-नवमीपूजा तत्सन्धिपूजांच तन्त्रेण करिष्ये' असा संकल्प करून, तंत्राने पूजा करावी. अष्टमी जेव्हा शुद्धाधिका असेल, तेव्हा पूर्वदिवशी अष्टमीपूजा व दुसर्या दिवशी संधिपूजा व नवमीपूजा यांचे तंत्र याप्रमाणे करावे. या नवरात्रात स्वतः पूजादिक करण्यास जर सामर्थ्य नसेल, तर दुसर्याकडून करवावे. षोडशोपचारपूजेचा विस्तार करण्याला जो असमर्थ असेल त्याने गंधादि पंचोपचार पूजा करावी. नवमीला पूजा करून होम करावा. कोणी ग्रंथकार अष्टमीलाच होम करावा असे म्हणतात. अष्टमीला प्रारंभ करून, नवमीला होमाची समाप्ति करावी. या होमाची अरुणोदयी सुरुवात करून, सायंकाळपर्यंत अष्टमी व नवमी यांच्या संधिकालाच्या ठिकाणी संभव होतो. ही संधि रात्री येईल तर होम करणे अयोग्य असल्याने, नवमीलाच होमारंभ व समाप्ति करावी, असे दुसरे ग्रंथकार म्हणतात. या बाबतीत कुलाचाराप्रमाणे वर्तन करावे. हा होम नवार्णवमंत्राने करावा. किंवा, 'जयन्ती मङ्गला काली' या श्लोकाने अथवा, 'नमो देव्यै महादेव्यै०' या श्लोकाने, अगर सप्तशतीच्या श्लोकांनी, किंवा कवच, अर्गला, कीलक या तीन रहस्यांच्या श्लोकासह सप्तशती स्तोत्राच्या सातशे मंत्रानी करावा. या सातशे मंत्रांचा विभाग इतर ग्रंथात पहावा. या विकल्पासंबंधानेही जसा कुलाचार असेल, त्याप्रमाणे व्यवस्था करावी. होमाचे द्रव्य घृतयुक्त व पांढर्या तिळांनी मिश्रित असे पायस घ्यावे. अथवा केवळ तिळांनीच होम करावा. क्वचित ग्रंथी पळसाची फुले, दूर्वा, शिरस, भाताच्या लाह्या, सुपारी, यव, नारळ, रक्तचंदनाचे तुकडे आणि नानाविध फळे यांचे देखील पायसात मिश्रण करावे असे सांगितले आहे. जपाच्या दशांशाने होम करावा. नृसिंह, भैरव इत्यादि देवतांच्याही मंत्रांचा होम जर कुलाचाराने प्राप्त असेल तर करावा. या बाबतीत ग्रहमखासह होमाचा सविस्तर प्रयोग कौस्तुभात पाहावा.