दशमीला देवताविसर्जन करावे. दशमी जर दोन दिवस असेल, आणि पूर्वदिवशी जर श्रवणनक्षत्राच्या शेवटच्या चरणाचा योग असेल, तर दुसर्या दिवशी दशमीमध्ये करावे. दशमी जर दोन दिवस नसली आणि पुर्व दिवशी दशमीला श्रवणयोग जरी नसला, तरी करावे. नक्षत्राच्या योगाच्या अनुरोधाने जर विसर्जन करायचे असेल, तर ते अपराह्णकाळी करावे. नक्षत्राच्या अनुरोधाने जर प्रतिमा असेल, तर तिचे विसर्जन करावे, मृत्तिकादिकांची जर प्रतिमा असेल, तर तिचे विसर्जन करून, ती उदकांदिकांत टाकावी. परंपरागत पूजा करण्याची जर धातूची मूर्ति असेल, तर तिचे घटादिस्थापनेपासून 'उत्तिष्ठ०' इत्यादि मंत्रांनी उत्थापन मात्र करावे. विसर्जन करू नये. देवताविसर्जनाच्या दिवशी, पूर्वी धरलेले नियम सोडावे हे जरी योग्य आहे, तरी नवमीलाच पारणा करावी; कारण, ;नवमीला पारणा करून दशमीला अभिषेक करावा आणि मूर्तीचे विसर्जन करावे' असे वचन असल्याचे दुसरे ग्रंथकार सांगतात. या बाबतीत अशी व्यवस्था करावी- पूर्व दिवशी स्वल्प अष्टमीयुक्त नवमी, दुसर्या दिवशी पारणेला योग अशी नवमीयुक्त दशमी आणि तिसर्या दिवशी श्रवणनक्षत्रयुक्त अशी विसर्जनाला योग्य दशमी, याप्रमाणे असता, अष्टमीचे व नवमीचे अशी दोन उपोषणे पहिल्या दिवशी येतात; यास्तव, अवशिष्ट राहिलेल्या नवमीत पारणा करून शेष दशमीत विसर्जन करावे. शेष नवमीच्या दिवशीच विसर्जनाला योग्य अशी दशमी जेव्हा असेल, तेव्हा विसर्जन करून, नंतर पारणा करावी. पहिल्या दिवशी साठ घटका अष्टमी, दुसर्या दिवशी शेषाष्टमीयुक्त नवमी आणि तिसर्या दिवशी नवमीशेषयुक्त दशमी असा योग ज्यावेळी असेल तेव्हाहि नवमीने युक्त अशा दशमीलाच विसर्जन आणि पारणा ही करावीत. अष्टमी, नवमी व दशमी या तिन्ही तिथी जेव्हा सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत अखंड आणि, ज्या ज्या कृत्यांना योग्य असतील, तेव्हा दाक्षिणात्य (नर्मदेच्या खालच्या) लोकांचा नवमीलाच पारणा करण्याचा परिपाठ आहे. याकरिता नवमीलाच पारणा आणि विसर्जन ही करावीत. दशमीला करण्याची ज्यांची परंपरा असेल त्यांनी दशमीलाच या दोन्ही गोष्टी कराव्या.