देशकालादिकांचा उच्चार करुन,
’ममैतज्जन्मजन्मान्तरसमुद्भूतत्रिविधकायिक चतुर्विधवाचिक त्रिविधमानसेतिस्कान्दोक्तं दशविधपापनिरासत्रयस्त्रिंशच्छतपित्रुद्धारब्रह्मलोकावाप्त्यादिफलप्राप्त्यर्थं ज्येष्ठमाससितपक्षदशमीबुधवारहस्ततारकागरकरणव्यतीपातानन्दयोग
कन्यास्थचंद्र वृषस्थसूर्योतिदशयोगपर्वण्यस्यां महानद्यां स्नानं तीर्थपूजनं
प्रतिमायां जान्हवीपूजां तिलादिदानं मूलमंत्रजपमाज्यहोमं च यथाशक्ति करिष्ये ।’
असा संकल्प सोडल्यावर दहा वेळां यथाविधि स्नान करावें. पाण्यांत उभें राहून, पुढें दिलेलें (स्कंदपुराणांतलें) स्तोत्र दहावेळां म्हणावें. नंतर कोरडें वस्त्र नेसून पितृतर्पणासुद्धां सारा नित्यविधि करावा. तीर्थांची पूजा करावी. तूप लावलेले दहा पसे तील गंगेंत टाकावेत. नंतर गूळ मिसळलेल्या पिठाचे दहा पिण्ड गंगेंत टाकल्यावर गंगेच्या कांठीं तांब्याचा अथवा मातीचा कलश स्थापन करुन, त्यावर गंगेची सोन्याची प्रतिमा ठेवावी.
’नमो भगवत्यै दशपापहरायै गंगायै नारायण्यै रेवत्यै शिवायै
दक्षाये अमृतायै विश्वरुपिण्यै नन्दिन्यै ते नमोनमः ।’
या मंत्रानें गंगेचें आवाहन करावें. हा मंत्र स्त्रिया वगैरे सर्वांनीं म्हणावा. फक्त ब्राह्मणानेंच या वेळीं म्हणण्याकरितां जो वीस अक्षरांचा मंत्र आहे तो असा:-
’ॐ नमः शिवायै नारायण्यै दशहरायै गंगायै स्वाहा ।’
याप्रमाणें गंगेचें आवाहन केल्यावर, त्या ठिकाणीं नारायण, रुद्र, ब्रह्मा, सूर्य, भगीरथ व हिमालय यांचें नाममंत्रानें आवाहन करुन व पूर्वोक्त मूलमंत्र उच्चारुन
’श्रीगंगायै नारायणरुद्रब्रह्मसूर्यभगीरथहिमवत्सहितायै आसनं समर्पयामि’
असें म्हणून, आसनादि उपचारांनीं पूजा करावी. दहा प्रकारचीं फुलें अर्पण करुन, दशांगधूप द्यावा व दहा प्रकारचा नैवेद्य दाखवावा. नंतर विडा व दक्षिणा देऊन दहा फळें द्यावींत. शेवटीं दहा दिव्यांचें दान देऊन, पूजा समाप्त करावी. दहा ब्राह्मणांना, प्रत्येकीं सोळा मुठी तीळ दक्षिणेसह द्यावे. त्याचप्रमाणें यवही द्यावेत. नंतर दहा गाई अथवा निदान एक तरी गाय द्यावी. सोनें, रुपें अथवा पीठ यांचे मासे, कांसवें, बेडूक वगैरे करुन, ते तीर्थांत टाकावेत. याप्रमाणेंच दिवेसुद्धां प्रवाहांत सोडावेत. जप आणि होम करण्याची इच्छा असल्यास, वर जो मूलमंत्र सांगितला आहे, त्याचा पांच हजार जप करुन त्याच्या दशांशानें होम करावा किंवा जप व होम हीं यथाशक्ति करावींत. ’दशहराव्रताङ्गत्वेन होमं करिष्ये’ असा संकल्प करुन, स्थंडिलावर अग्नीची स्थापना करावी.
’चक्षुषी आज्येन इत्यन्ते श्रीगंगाम् अमुकसंख्या आज्येन
नारायणादिषड्देवता एकैकया आज्याहुत्या शेषेण स्विष्टकृतम् ।’
या मंत्रानें अग्नीवर समीध (अन्वाधान) ठेवावी. नंतर प्रोक्षणी वगैरे सहा पात्रें मांडून त्यांवर तूप फिरवावें आणि अन्वाधानाप्रमाणें होम करावा. दहा ब्राह्मण व दहा सुवासिनी यांना जेवूं घालावें. प्रतिपदेपासून आरंभ करुन दशमीपर्यंत स्नानादिक पूजेपर्यंतचा सारा विधि करावा, असें कांहीं ग्रंथकार म्हणतात. गंगेचें स्तोत्र स्कंदपुराणांत पुढील प्रमाणें दिलें आहे:-
या स्तोत्रानें पाण्यांत उभें राहून स्तवन करावें. होमानंतर प्रतिमेची पूजा करुन, तिचें विसर्जन करावें आणि मूलमंत्र म्हणून ती आचार्याला द्यावी. याप्रमाणें येथें दशहराविधि पुरा झाला.
ज्येष्ठशुद्ध एकदशीला निर्जला एकादशी म्हणतात. या एकादशीला नेहमींच्या आचमनाव्यतिरिक्त पाणी पिणें बंद करुन उपास केला असतां, बारा एकादश्यांच्या उपासाचें फळ मिळतें. द्वादशीला
’निर्जलोपोषितैकादशीव्रताङ्गत्वेन सहिरण्यसशर्करोदकुम्भदानं करिष्ये’
असा संकल्प करावा आणि
’देवदेव हृषीकेश संसारार्णवतारक ।
उदकुंभप्रदानेन यास्यामि परमां गतिम् ॥’
हा मंत्र म्हणून, साखर व सोनें यांच्यासह पाण्यानें भरलेला कुंभ दान करावा. ज्येष्ठांतल्या शुद्ध द्वादशीला तिलदान केलें
असतां, अश्वमेधयज्ञाचें फळ मिळतें. ज्येष्ठ महिन्यांतल्या ज्येष्ठा नक्षत्रानें युक्त अशा पुनवेला-छत्री व उपानह (जोडा) यांचे दान केलें असतां राज्यप्राप्ति होते. ज्येष्ठी पुनवेला बिल्वत्रिरात्रीव्रत करण्यास सांगितलें आहे. या व्रताकरतां पुढच्या तिथीनें विद्ध असलेली पुनव घ्यावी.