शयनी आणि बोधिनी या एकादश्यांना तप्तमुद्रा धारण कराव्या असे रामार्चन चंद्रिका नावाच्या ग्रंथात सांगितले आहे. तप्तमुद्रा धारण करण्याच्या बाबतीत प्रशंसापर अशी विधिवाक्ये व निंदापर अशी निषेधार्थक वाक्ये पुष्कळ आढळतात म्हणून, याबाबतीत शिष्टाचाराप्रमाणे व्यवस्था जाणावी. ज्यांच्या कुळात-बाप, आजा वगैरेंनी तप्तमुद्रा घेण्याचा धर्म स्वीकारला असेल, त्यांनी तो तसाच पुढे चालवावा. ज्यांच्या कुळात कोणीही तप्तमुद्रा घेतल्या नसतील, त्यांनी तसे करण्यात दोष सांगितला आहे; म्हणून केवळ स्वतःच्या बुद्धीच्या जोरावर तसे कर्म करू नये.