काशाच्या थाळ्यात जेवण सोडले असल्यास काशाचा थाळा तुपाने भरून दान करावा. मध सोडला असल्यास सप्तमीला तूप, खीर व साखर यांचे दान करावे. तेल सोडले असल्यास तीळ द्यावेत. मुक्याने जेवणाचे व्रत जर कार्तिकात धरले असेल तर तिळाने भरलेली घंटा द्यावी. इतर महिन्यात जर हे व्रत धरले असेल तर सोने, उडीद व तीस कोहळे द्यावेत. कार्तिकांत जर काशाच्या भांड्यात जेवण केले तर किडे खाल्ल्याचा दोष लागतो. जे फळ सोडले असेल ते द्यावे. जो रस सोडला असेल तो द्यावा. जे धान्य सोडले असेल त्याचे दान द्यावे अथवा सर्व बाबतीत गोदान द्यावे. दीपदानाचे फळ सर्व दानांच्या बरोबरीचे आहे; म्हणून कार्तिकात केलेल्या दीपदानाच्या फळाचा सोळावाहि भाग इतर दानांत नाही. इतकी व्रते करणे अशक्य असल्यास अथवा चातुर्मास्यांत व्रतांचा जर असंभव असेल, तर कार्तिकात कोणचे तरी व्रत अवश्य करावे. कारण, 'ज्या मूढ बुद्धीच्या लोकांचा कार्तिकमास व्रतांवाचून जातो त्यांना पुण्याचा लेशही मिळत नाही. त्यांना डुकराप्रमाणे समजावे. असे वचन आहे. जी स्त्री या महिन्यात शालग्रामापुढे रांगोळीने स्वस्तिक, मंडलादि रंगावल्या काढते, ती स्वर्गादि फळ भोगते व तिला सात जन्मपर्यंत वैधव्य येत नाही. कार्तिकात पुराण, इतिहास वगैरेची समाप्ति करणे योग्य आहे.