कापसाच्या सुताची नऊपदरी करू, तिचे १०८ फेर्यांचे मूर्तीच्या गुडघ्यापर्यंत पोचेल इतके लांब व चोवीस गाठी असलेले पवित्र (पोवते) उत्तम; चौपन फेर्यांचे व मूर्तीच्या मांड्यांपर्यंत पोचण्यासारखे लांब आणि बारा गाठी असलेले मध्यम आणि सत्तावीस फेर्यांचे मूर्तीच्या बेंबीपर्यंत पोचण्याच्या लांबीचे व आठ गाठींचे कनिष्ट- अशी पोवती करावीत. नऊ पदरीचे एकशेवीस अथवा सत्तर फेरे घेऊन, त्याची एकशेआठ अथवा चोवीस गाठींची वनमाला करावी, नऊ पदरी सुताचे बारा फेरे घेऊन, बारा गाठे असलेले गंधाने पवित्र करावे. नऊ पदरी सत्तावीस फेर्यांचे गुरुपवित्र करावे. अंगदेवतांची पवित्रे, तिसुतीने करावीत. शिवाची पवित्रे, लिंगविस्ताराप्रमाणे करावीत. ही सारी पोवती पंचगव्यने प्रोक्षित करून, त्यांचे प्रक्षालन, प्रणवमंत्राने (ॐकाराने) करावे. नंतर मूलमंत्राने १०८ वेळा अभिमंत्रण करून, गाठींना कुंकू लावून सुशोभित करावीत, आणि सर्व पोवती वेळूच्या भांड्यात घालून, ती वस्त्राच्छादित अशी देवाच्या पुढे ठेवावीत. त्यानंतर
'क्रियालोपविधानार्थ यत्त्वया विहितं प्रभो । मयैतत्किर्यते देव तव तुष्ट्यै पवित्रकम् ।
न मे विघ्नो भवेद्देव कुरु नाथ दया मयि । सर्वथा सर्वदा विष्णो मम त्वं परमा गतिः ॥'
इ० प्रार्थना करून अधिवासन ठेवावे. देशकालादिकांचा उच्चार केल्यावर
'संवत्सरकृतपूजाफलावाप्त्यर्थं अमुक देवताप्रीत्यर्थं अधिवासनविधिपूर्वकं पवित्रारोपण करिष्ये'
असा संकल्प करून, देवापुढे सर्वतोभद्रमंडल करावे व त्यावर पाण्याने भरलेला कुंभ ठेवावा. त्या कुंभावर बांबूचे भांडे ठेवून त्यात ती पोवती ठेवावीत. नंतर
'संवत्सरस्त्य यागस्य पवित्रीकरणायै भोः ।
विष्णुलोकत्पवित्राद्य आगच्छेह नमोस्तु ते॥'
याने व मूलमंत्राने त्यांना आवाहन करून तिसुतीत - ब्रह्मा, विष्णु व रुद्र, नवसुतीत- ॐकार,सोम, अग्नि, ब्रह्म, नागेश, सूर्य, शिव आणि विश्वदेव; उत्तम, मध्यम व कनिष्ठ या पोवत्यात- ब्रह्मा, विष्णु, रुद्र व सत्त्व, रज आणि तम; आणि वनमालेत प्रकृति यांचे आवाहन करून मूलमंत्राने
'श्रीपवित्राद्यावाहितदेवताभ्यो नमः'
येथपर्यंत पोवत्यांच्या ठिकाणी आवाहित अशा सर्व देवतांची गंधादि उपचारांनी पूजा करावी. त्यानंतर, पूर्वीच तयार करून ठेवलेले जे वीतभर लांबीचे व बारा गाठी असलेले गंधपवित्र, ते घेऊन,
'विष्णुतेजोद्भवं रम्यं सर्व पातकनाशनम् ।
सर्वकामप्रदं देव तवाङ्गे धारयाम्यहम् ॥'
या मंत्राने देवाच्या पायावर अर्पण करावे. देवाच्या हाताला बांधावे असेहि कोणी म्हणतात. त्यानंतर देवाची पंचोपचारे पूजा करून,
'आमंत्रितोसि देवेश पुराणपुरुषोत्तम ।
प्रातस्त्वां पूजयिष्यामि सान्निध्यं कुरु केशव ॥
क्षीरोदधिमहानागशय्यावस्थितविग्रह ।
प्रातस्त्वां पूजयिष्यामि संनिधौ भवते नः ॥
अशी प्रार्थना करावी आणि साष्टांग नमस्कार घातल्यावर पुष्पांजली वहावी. अशा प्रकारे अधिवासन करावे. या ठिकाणी मूलमंत्र म्हणजे गुरूने उपदेशिलेला तांत्रिक वैदिक अथवा देवगायत्रीरूप असा जो असेल तो घ्यावा.