अष्टमीळा आचार्यांची पूजा करुन,
’श्रीरामप्रतिमादानं करिष्येऽहं द्विजोत्तम ।
तत्राचार्यो भव प्रीतः श्रीरामोऽसि त्वमेव मे ॥’
अशी प्रार्थना करावी.
’नवम्या अंगभूतेन एकभक्तेन राघव ।
इक्ष्वाकुवंशतिलक प्रीतो भव भवप्रिया ॥’
या मंत्रानें एकदां जेवण्याचा संकल्प करुन आचार्यसह हविष्यान्न खावें. पूजेकरतां मंडप आणि वेदी करुन, नवमीला सकाळीं
’उपोष्य नवमी त्वद्य यामेष्वष्टसु राघव ।
तेन प्रीतो भव त्वं मे संसारात् त्राहि मां हरे ॥’
या मंत्रानें उपासाचा संकल्प करावा.
’इमां स्वर्णमयीं रामप्रतिमां स्वां प्रयत्नतः ।
श्रीरामप्रीतये दास्ये रामभक्ताय धीमते ॥’
या मंत्रानें प्रतिमादानाचा संकल्प करावा. नंतर
’श्रीरामनवमी व्रताङ्गभूतां षोडशोपचारै श्रीरामपूजां करिष्ये ।’
असा संकल्प करुन, वेदीवर सर्वतोभद्र नांवाचें मंडल करावें आणि त्यावर कलशाची स्थापना करावी. कलशावर पूर्णपात्र ठेवून, त्याला वस्त्राचें वेष्टन करावें. अग्न्युत्तारनाच्या विधीनें प्रतिमेंत श्रीरामाची स्थापना करुन, पुरुषसूक्ताच्या ऋचांनीं (त्या प्रतिमेची) षोडशोपचारांनीं पूजा करावी. पूजा झाल्यानंतर
’रामस्य जननी चासि रामात्मकमिदं जगत् ।
अतस्त्वां पूजयिष्यामि लोकमातुर्नमोऽस्तुते ॥’
या मंत्रानें कौसल्येची पूजा करावी. व ’ॐ नमो दशरथाय.’ या मंत्रानें दशरथाची पूजा करुन, सारी पूजा संपवावी. मध्यान्हकाळीं-फल, पुष्प, गंध, उदक वगैरेंनीं भरलेल्या शंखानें अर्घ्य द्यावेत त्याचा मंत्र असा :-
’दशाननवधार्थाय धर्मसंस्थापनायच ।
दानवानां विनाशाय दैत्यांना निधनायच ॥
परित्राणाय साधूनां जातो रामः स्वयं हरिः ।
गृहाणार्घ्यं मया दत्तं मातृभिः सहितो ऽ नघ ॥’
रात्रीं जागरण करुन , सकाळीं नित्यपूजा करावी आणि मूलमंत्रानें पायसार्या (तांदुळाच्या खिरीच्या) १०८ आहुतींचें हवन करुन पूजाविसर्जन करावें. आचार्याला ज्या मंत्रानें नंतर प्रतिमेचें दान करायचें, तो मंत्र असा :-
’इमां स्वर्णमयीं रामप्रतिमां समलंकृताम् ॥
शुचिवस्त्रयुगच्छन्नां रामोहं राघवाय ते ॥
श्रीरामप्रीतये दास्ये तुष्टो भवतु राघव ॥’
प्रतिमेचें दान या मंत्रानें केल्यानंतर
’तव प्रसादं स्वीकृत्य क्रियते पारणा मया ।
व्रतेनानेन संतुष्टः स्वामिन् भक्तिं प्रयच्छ मे ॥’
या मंत्रानें प्रार्थना करावी. नवमीच्या शेवटीं पारणें करावें. हें व्रत अधिक महिन्यांत करुं नये. याप्रमाणेंच जन्माष्टमी वगैरे व्रतें अधिक महिन्यांत करुं नयेत. याच नवमीला देवीच्या नवरात्राची समाप्ति करावी. त्याच समाप्तीचा निर्णय, आश्विनांतल्या नवरात्रांतल्या नवमीप्रमाणेंच समजावा.