ही अक्षय्यतृतीयाच परशुरामजयन्ती होय. रात्रींच्या पहिल्या प्रहरांत जिची व्याप्ति असेल, अशी या कामीं घ्यावी. पहिल्या दिवशीं जर पहिल्या प्रहराची व्याप्ति असेल, तर ती घ्यावी. दोन दिवस जर पहिल्या प्रहरांत समान अथवा कमी अधिक एकदेशव्याप्ति असेल, तर दुसर्या दिवसाची घ्यावी. या दिवशीं प्रदोषकालीं परशुरामाची पूजा करुन,
’जमदग्निसुतो वीर क्षत्रियान्तकर प्रभो ।
गृहाणार्घ्यं मया दत्तं कृपया परमेश्वर ॥’
या मंत्रानें अर्घ्य द्यावें. वैशाख शुद्ध सप्तमीला गंगेची उत्पत्ति झाली असल्यानें, मध्यान्हकालव्यापिनी अशा सप्तमीला गंगेची पूजा करावी. दोन दिवस जर व्याप्ति असेल, तर पहिल्या दिवशीं गंगापूजन करावें. वैशाखी द्वादशीला मधुसूदनाची पूजा करावी, म्हणजे अग्निष्टोमयज्ञाचें फळ मिळतें व तें करणारा पुरुष सोमलोकाला जातो. वैशाख शुद्ध चतुर्दशी ही नृसिंहजयन्ती होय. सूर्यास्ताच्या वेळीं व्याप्ति असलेली तिथि या दिवशीं घ्यावी. दोन दिवस व्याप्ति असेल, अथवा दोन्ही दिवशीं नसेल, तर दुसर्या दिवसाची घ्यावी. स्वाति नक्षत्र आणि शनिवार असा जर योग असेल तर ती चतुर्दशी अति प्रशस्त होय.