भाद्रपद कृष्णपक्षातलय प्रतिपदेपासून अमावास्येपर्यंत दररोज जो महालय करायचा त्यात-पित्याची, त्रयी, मातेची त्रयी व मातेच्या पित्याची त्रयी (सपत्नीक), पत्नी वगैरे जे एकोद्दिष्ट पितृगण म्हणजे (बायको, मुले, चुलता, मामा, भाऊ (सपत्नीक), आत्या, मावशी, बहीण (सभर्तृक व ससुत), सासरा व गुरु वगैरे सर्व पितर येतात; यास्तव, तो त्या सर्वांच्या उद्देशाने करावा असा एक पक्ष आहे. सपत्नीक अशी जी पितृत्रयी, व सपत्नीक अशी जी मातामहादि त्रयी त्या सहा देवतांच्याच मात्र उद्देशाने दररोजचा महालय करावा असा दुसरा पक्ष आहे. सपत्नीक पितृत्रयी, सपत्नीक मातामहत्रयी आणि पत्नी वगैरे जे एकोद्दिष्ट गण त्यांच्या उद्देशाने दररोज महालय करावा असा तिसरा पक्ष आहे. दररोज महालय करण्याच्या बाबतीत असे एकंदर तीन पक्ष आहेत. 'पंचमीपासून अमावास्येपर्यंत महालय करण्यासंबंधाने जे पक्ष आहेत, त्याबाबतितही वरीलप्रमाणेच निर्णय समजावा. एकदाच जर महालय करायचा असेल, तर तो मात्र सर्व पितरांच्या उद्देशाने केला पाहिजे. अशा महालयाच्या प्रसंगी देवतांचा संकल्प-
'पितृपितामहप्रपितामहानां मातृतत्सपत्नीपितामही तत्सपत्नीप्रपितामहीतत्सपत्नीनां यद्वास्मत्सापत्नमातुरिति पृथगुद्देशः मातामहमातृपितामहमातृप्रपितामहानां सपत्नीकानां यथानामगोत्राणांवस्वादिरूपाणां पार्वणविधीना पत्न्याः पुत्रस्य कन्यकायाः पितृव्यस्य मातुलस्य भ्रातुः पितृष्वसुर्मातृष्वसुरात्मभगिन्याः पितृव्यपुत्रस्य जामातुर्भागिनेयस्य श्वशुरस्य श्वश्र्वा वा आचार्यस्योपाध्यायस्य गुरोःसख्युःशिष्यस्य एतेषां यथानामगोत्राणां पुरुषविषये सपत्नीकानां स्त्रीविषये सभर्तृकसापत्यानामेकोद्दिष्टविधिना महालयापरपक्षश्राद्धमथवा सकृन्महालयापरपक्षश्राद्धं सदैवं - सद्यः करिष्ये' -
याप्रमाणे करावा. यामध्ये जे कोणी जिवंत असतील ते वगळून इतरांच्याच नावांचा उच्चार करावा. मातामह इत्यादिकांच्या पत्नी जिवंत असल्यास 'सपत्नीक' आणि स्त्रियांचा पति जिवंत असेल तर 'सभर्तृक' असे उच्चार करू नयेत. महालय, गयाश्रद्ध, नान्दीश्राद्ध आणि अन्वष्टका ही नऊ देवतांचे (पितृत्रयी, मातृत्रयी व मातामहत्रयी) उद्देशाने करावीत. इतर श्राद्धे (पितृत्रयी व मातामहत्रयी सपत्नीक) या सहा देवतांच्या उद्देशाने करावीत. अन्वष्टका, नान्दीश्राद्ध, प्रतिसांवत्सरिक श्राद्ध, महालय आणि गयाश्राद्ध यांच्या ठिकाणी सपिंडी करण्याच्या पूर्वी मातेचे श्राद्ध निराळे करावे. इतर ठिकाणी पतीसह करावे. स्मृतींच्या अनुरोधाने इत्यादि तीन पार्वणेच सांगितली आहेत. मातामही इत्यादि त्रयीचा पृथक् उच्चार करून, बारा देवतांची मिळून चार पार्वणे करावीत, असेही काही ग्रंथकारांनी सांगितले आहे. गयाश्राद्ध, तीर्थश्राद्ध आनि नित्य तर्पण यांत याच देवता घ्याव्यात. महालयातही 'धूरिलोचन' नावाचे विश्वेदेव घ्यावेत. ज्याला सामर्थ्य असेल त्याने देवांकरिता दोन, तीन पार्वणांपैकी प्रत्येकाला तीन प्रमाणे नऊ आणि पत्न्यादि एकोद्दिष्टगणाला प्रत्येक देवतेला एकेक याप्रमाणे ब्राह्मणांना आमंत्रण द्यावे. ज्याला सामर्थ्य नसेल त्याने देवांकरिता एक, तीन पार्वणांना प्रत्येकी एक मिळून तीन आणि सर्व एकोद्दिष्ट गणांना मिळून एक असे ब्राह्मण सांगावे. देवाकरता दोन ब्राह्मण सांगावेत असे सांगणारा जर पक्ष असेल, तर प्रत्येक पार्वणाला तीन तीन ब्राह्मण सांगितलेच पाहिजेत. देवांकरिता दोन आणि प्रत्येक पार्वणाला एक, किंवा देवांकरिता एक व प्रत्येक पार्वणाला तीन असे विषम प्रमाण घेऊ नये. अमावास्यादि श्राद्धांच्या ठिकाणिही याप्रमाणेच करावे. जो कोणी अत्यंत असमर्थ असेल, अशाने दोन पार्वणांना एकच ब्राह्मण सांगितला तरी चालेल. महालयाच्या अंती महाविष्णूच्या उद्देशाने एक ब्राह्मण अवश्य सांगावा असा कौस्तुभात विशेष सांगितला आहे. ज्याची आई जिवंत असेल त्याने सापत्न मातेचे एकोद्दिष्टश्राद्ध करावे, पार्वणश्राद्ध करू नये. ज्याच्या अनेक सापत्न माता असतील अशाने सार्या आर्यांच्या उद्देशाने एकच ब्राह्मण सांगावा आणि पिंडही एकच करावा. अर्घ्यपात्रे मात्र निरनिराळी करावीत. आपल्या मातेबरोबरच अनेक सावत्र मातांचे जर कोणाला श्राद्ध करणे असेल, तर त्याने आपल्या मातेसह इतर सावत्र आयांच्या उद्देशाने एकच ब्राह्मण, एकच पिंड व एकच अर्घ्य, असे पार्वणश्राद्ध करावे. सापत्न मातांचे निराळे असे एकोद्दिष्ट करू नये असा जो एक पक्ष आहे तरी सर्व सापत्न मातांचे पृथक् एकोद्दिष्ट करावे असेही दुसरा पक्ष सांगतो. महालयात पार्वणाकरता अग्नौकरण केले पाहिजे. एकोद्दिष्ट गणांसाठी अग्नौकरण कृताकृत आहे. एकोद्दिष्टासाठी अग्नौकरण केल्यास, अग्नौकरणाचे अन्न वेगळाल्या पात्रात घ्यावे. महालयात सर्व पार्वणांकरिता व एकोद्दिष्टासाठी एकदा छिन्न केलेला असा एकच दर्भ घ्यावा. दर्शश्राद्धादिकांतील प्रत्येक पार्वणाला निराळा दर्भ घ्यावा. अवशिष्ट श्राद्धप्रयोग आणि अनेक माता असता अभ्यंजनादिकाविषयी जे मंत्रोच्चार करायचे असतात, त्यांची माहिती श्राद्धसागरात आणि आपापल्या शाखांना उक्त अशा प्रयोगग्रंथात पाहावी. एकदाच जर करणे असेल, तर श्राद्धाच्या अंगभूत जे तिलतर्पण ते, दुसर्या दिवशीच सर्व पितरांच्या उद्देशाने प्रातःसंध्येच्या पूर्वी अथवा प्रातःसंध्येच्या नंतर ब्रह्मयज्ञाच्या अंगभूत करावयाच्या तर्पणाहून निराळेच करावे. प्रातिपदिक आणि पंचम्यादिक जे पक्ष करायचे त्यांच्या ठिकाणि ब्राह्मणांचे विसर्जन झाल्यावर, श्राद्धामध्ये पूजित अशा पितरांच्या उद्देशाने तर्पण करावे. पत्नी विटाळशी असताना एकदा करायचा महालय करू नये; कारण त्यासाठी दुसरा उक्तकाल ठरविला आहे. अमावास्येच्या दिवशी जर स्त्री रजस्वला असेल, तर आश्विन शुद्ध पंचमीपर्यंतचा काळ महालयाला गौण आहे. प्रातिपदादि अन्य पक्षाचे ठिकाणी प्रारंभाचे दिवशी पाकाला आरंभ होण्याच्या आधी जर पत्नी रजस्वला होईल, तर एकाच्या पुढचा दुसरा याप्रमाणे पक्षांचा स्वीकार करावा. (अशा वेळी जर सुतक येईल,तर त्या बाबतीतला निर्णय तिसर्या परिच्छेदात सांगितला आहे.) पाकाला आरंभ झाल्यानंतर जर स्त्री रजस्वला होईल, तर तिला दुसर्या घरी ठेवून महालयाला प्रारंभ करावा. विधवेने करायच्या श्राद्धासंबंधानेही हेच जाणावे. अपुत्र अशा विधवेने, अशा प्रसंगी
'मम भर्तृतत्पितृपितामहानां भर्तुर्मातृपितामहीप्रपितामहीनां मम पितृपितामहप्रपितामहानां मम मातृपितामहीप्रपितामहीनां मम मातामहमातृपितामहमातृप्रपितामहानां मम मातामहीमातृपितामहीमातृप्रपितामहीनां तृप्त्यर्थंसकृन्महालयपरपक्षश्राद्धंकरिष्ये'
असा स्वथ संकल्प करून, ब्राह्मणांकडून अग्नौकरणासह सर्व प्रयोग यथाविधि करवावा. ब्राह्मणाने
'अमुकनाम्न्य यजमानायाः भर्तृतत्पितृपितामह०'
वगैरे वरीलप्रमाणे उच्चार करून, प्रयोग करावा. असमर्थ असल्यास - भर्तृत्रयी, स्वपितृत्रयी, स्वमातृत्रयी, स्वमातामहत्रयी सपत्नीक याप्रमाणे चार पार्वणांच्या उद्देशाने महालय करावा. अत्यंत असमर्थता जर असेल, तर स्वभर्तृत्रयी आणि स्वपितृत्रयी अशी दोनच पार्वणे करावीत.