भाद्रपद शुक्लपक्षी श्रवणयुक्त द्वादशीचे दिवशी मध्याह्नकाली वामनाचा अवतार झाला. याकरिता मध्याह्नव्यापिनी द्वादशी मध्याह्नकाली अथवा इतर काली श्रवणयुक्त असेल ती घ्यावी. दोन दिवस श्रवणयोग असेल तर पूर्व दिवसाची घ्यावी. द्वादशीचे दिवशी श्रवणयोगाचा सर्वथा अभाव असेल आणि एकादशीचे दिवशी श्रवणयोग असेल तर मध्याह्नव्यापिनी द्वादशी देखील टाकून एकादशीचे दिवशी व्रत करावे. शुद्धाएकादशीचे दिवशी श्रवणाचा अभाव असेल तर दशमीने विद्ध असलेल्या व श्रवणयुक्त एकादशीला देखील व्रत करावे. पूर्व दिवशीच मध्याह्नव्यापिनी द्वादशी दुसर्या दिवशी मध्याह्नाहून इतर काली श्रवणयुक्त द्वादशी असे असेल तर पूर्व दिवसाचीच घ्यावी. दोन्ही तिथीचे दिवशी श्रवणयोगाचा अभाव असेल तर मध्याह्नव्यापिनी द्वादशीचे दिवशीच व्रत करावे. दोन दिवस मध्याह्नव्याप्ति असेल अथवा दोन्ही दिवस नसेल तर एकादशीने युक्त असेल ती घ्यावी. पारणा पूर्वी सांगितल्याप्रमाणे दोहोंच्या अंती अथवा एकाच्या अंती करावी. या दिवशी मध्याह्नकाली नदीच्या संगमावर स्नान करून सुवर्णमय वामनाचे प्रतिमेची पूजा करून सुवर्णपात्राने अर्घ्य द्यावे. पूजेविषयी मंत्र -
"नमस्ते पद्मनाभाय नमस्ते जलशायिने । तुभ्यमर्घ्यं प्रयच्छामि बालवामनरूपिणे ॥
नमः शार्ङधनुर्बाणपाणये वामनाय च । यज्ञभुक्फलदात्रे च वामनाय नमो नमः ॥"
नंतर दुसर्या दिवशी सपरिवार वामनाची मूर्ति ब्राह्मणाला दान करावी; दानाचा मंत्र-
"वामनः प्रतिगृह्णाति वामनोहं ददामि ते । वामनं सर्वतोभद्रं द्विजाय प्रतिपादये ॥"
याच द्वादशीचे दिवशी रात्री देवपूजा करावी; रात्री असंभव असेल तर दिवसास करावी; आणि दधिव्रत निवेदन करून दधिदान करावे व दुग्धव्रताचा संकल्प करावा. या पयोव्रताविषयी दुधापासून होणारे व दुधामध्ये शिजविलेले पदार्थ वर्ज्य करावे. दही इत्यादि वर्ज्य करू नयेत. याप्रमाणे दधिव्रतामध्ये ताक इत्यादि वर्ज्य नाहीत. प्रसूत झालेल्या गायीचे दहा दिवसांमधील दूध आणि संधिनी (वृषभाने आक्रमलेली) गायीचे दुध यांचा ज्या ठिकाणी निषेध सांगितला आहे तेथे त्या दुधापासून होणारी दही, ताक इत्यादि सर्व वर्ज्य करावी.