हा विष्णूचा दमनोत्सव चैत्रशुद्ध द्वादशीला पारणेच्या दिवशीं करावा. पारणेच्या दिवशीं जर एक घटकाहि द्वादशी न मिळेल, तर या पवित्र दमनोत्सवाला त्रयोदशी घ्यावी, असें वचन आहे. शिवाचा दमनोत्सव चतुर्दशीला करावा. दमनोत्सवाचा प्रयोग येणेंप्रमाणें :- ’उपासाच्या दिवशीं नेहमींची देवपूजा करुन ’श्रीकृष्णाच्या पूजेकरतां तुला नेतों’ अशी प्रार्थना करुन नमस्कार करावा. इतर देवतांविषयीं जर उत्सव करणें असेल, तर जी देवता असेल तिच्या नांवाचा उच्चार करुन, नंतर दवणा घरीं आणावा आणि मग पंचगव्य आणि शुद्ध पाणी यांनीं तो धुऊन देवापुढें ठेवावा. दमनकाच्या जागीं-अशोक, काल, वसंत आणि काम या देवतांची, अथवा फक्त कामदेवाचीच गंधादिकांनीं पूजा करावी.
’नमोस्तु पुष्पबाणाय जगदाल्हादकारिणे ।
मन्मथाय जगन्नेत्रे रतिप्रीतिप्रियाय ते ॥’
या मंत्रानें कामाचें आवाहन करावें.
’कामभस्मसमुद्भूत रतिबाष्पपरिप्लुतः ।
ऋषिगंधर्वदेवादिविमोहक नमोस्तु ते ॥
या मंत्रानें दवण्याची प्रार्थना करावी. ’ॐ कामाय नमः’ या मंत्रानें परिवारासहित कामरुपी दवण्याची गंधादिकांनीं पूजा करावी. नंतर रात्रीं देवाची पूजा करुन, जें अधिवासन करावें तें येणेंप्रमाणें :- देवाच्या पुढें सर्वतोभद्र मंडळ करुन, त्यावर कलश ठेवावा. त्यावर धुतलेल्या वस्त्रांत गुंडाळलेल्या वेळूच्या भांडयासह दवणा ठेवावा. आणि
’पूजार्थं देवदेवस्य विष्णोर्लक्ष्मीपते, प्रभो ।
दमन त्वमिहागच्छ सान्निध्यं कुरुते नमः ॥’
या मंत्रानें (दमनक देवतेचें) आव्हान करावें. पूर्वादि आठ दिशांची नंतर जी पूजा करणें ती पुढील मंत्रांनीं करावी.
१) क्लीं कामदेवाय नमो र्हीं रत्यै नमः ।
२) क्लीं भस्मशरीराय नमो र्हीं रत्यै नमः ।
३) क्लीं अनङ्गाय नमो र्हीं रत्यै नमः ।
४) क्लीं मन्मथाय नमो र्हीं रत्यै नमः ।
५) क्लीं वसन्तसखाय नमो र्हीं रत्यै नमः ।
६) क्लीं स्मराय नमो र्हीं रत्यै नमः ।
७) क्लीं इक्षुचापाय नमो र्हीं रत्यै नमः ।
८) क्लीं पुष्पबाणास्त्राय नमो र्हीं रत्यै नमः ।
याप्रमाणें पूजा केल्यानंतर ’
’तत्पुरुषाय विद्महे कामदेवाय धीमहि ।
तन्नोनंगः प्रचोदयात् ॥’
या गायत्रीनें दवण्याचें १०८ वेळां अभिमंत्रण करुन, त्याची गंधादिकांनीं पूजा करावी. र्हीं नमः’ या मंत्रानें पुष्पांजलि द्यावा. ’नमोस्तु पुष्पबाणाय’ ह्या पूर्वीं सांगितलेल्या आवाहनमंत्रानें नमस्कार करावा.
’क्षीरोदधिमहानाग शय्यावस्थितविग्रह ।
प्रातस्त्वां पूजयिष्यामि सन्निधौ भवते नमः ॥
या मंत्रानें देवाची प्रार्थना करुन, पुष्पांजलि द्यावा. त्या एकादशीला रात्रीं जागरण करावें. सकाळीं नित्याची पूजा करुन, पुन्हां देवाची पूजा करावी. दूर्वा, गंध व अक्षता यांसहित दवण्याची मंजिरी आणून मूलमंत्र म्हणावा.
’देव देव जगन्नाथ वाञ्छितार्थप्रदायक ।
हृत्स्थान्पूरय मे विष्णो कामान् कामेश्वरीप्रिय ॥
इदं दमनकंदेव गृहाण मदनुग्रहात ।
इमां सांवत्सरीं पूजां भगवान्परिपूरय ॥’
हे मंत्र म्हणून पुन्हां मूलमंत्राचा जप करावा व देवाला दवणा अर्पण करावा व नंतर सुशोभित दिसेल अशा तर्हेनें दवणा देवाला वहावा. त्यानंतर अंगदेवतांना दवणा वाहून, पुढीलप्रमाणें प्रार्थना करावी :-
’मणिविद्रुममालाभिर्मन्दार कुसुमादिभिः ।
इयं सांवत्सरी पूजा तवास्तु गरुडध्वज ॥
वनमालां यथा देव कौस्तुभं सततंहृदि ।
तद्वद्दामनकीं मालां पूजांच हृदये वह ॥
जानताजानतावापि न कृतं यत्तवार्चनम् ।
तत्सर्वं पूर्णतां यातु त्वप्रसादाद्रमापते ॥
जितं ते पुण्डरीकाक्ष नमस्ते विश्वभावन ।
हृषीकेश नमस्तेऽस्तु महापुरुष पूर्वज ॥
मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर ।
यत्पूजितं मया देव परिपूर्णं तदस्तु मे ॥’
या मंत्रांनीं प्रार्थना करावी. त्यानंतर पंचोपचारांनीं देवाची पूजा करुन, आरती करावी. ब्राह्मणांना दवणा देऊन जो शिल्लक राहील तो स्वतः घ्यावा. इष्टमित्रांसह पारणें करावें. ज्यांनीं मंत्राची दीक्षा घेतली नसेल त्यांनीं नुसत्या नाममंत्रानेंच दवणा अर्पण करावा. या दमनकोत्सवाचा श्रावण महिन्यापर्यंत गौण काल आहे. हा उत्सव अधिक महिन्यांत व शुक्रास्तादिकांतहि करुं नये. याप्रमाणें दमनारोपणाचा विधि सांगितला. याच चैत्रशुद्ध द्वादशीसंबंधानें भारतांत जें वचन आहे तें येणेंप्रमाणें :---’चैत्री द्वादशीला अहोरात्र विष्णूचें स्मरण करणाराला पुण्डरीक यज्ञाचें फळ मिळतें व तो देवलोकाला जातो.