'ॐ हराय नमः' या मंत्राने माती आणून, ती निवडावी आणि तिच्यात पाणी घालून, ती मळावी. तिचा गोळा केल्यावर, 'ॐ महेश्वरायनमः' या मंत्राने त्याचे लिंग करावे. ते लिंग-ऐशी गुंजांच्या एका कर्षाहून अधिक परिमाणाचे असे अंगठ्याएवढे किंवा त्याहून मोठे करावे, पण लहान करू नये. या मातीच्या लिंगात पंचसुत्री जरी केली नाही तरी दोष नाही. म्हणूनच 'सातवेळा जरी काट्यावर वजन केले तरी प्रत्येकवेळी ज्याचे वजन कमी न भरता अधिकच भरते, ते बाणलिंग होय. व इतर लिंगे नर्मदेतली समजावीत,' असे सांगितले आहे. असले बाणलिंग मिळणे फारच कठीण आहे. व सोन्याच्या वगैरे लिंगात पंचसूत्र करणे अवघड आहे. यास्तव, मातीचेच लिंग श्रेष्ठ समजावे. 'द्वापर युगात पार्याचे लिंग व कलियुगात मातीचे लिंग, ही श्रेष्ठ होत' असे या बाबतीत वचनही आहे. त्यानंतर 'ॐ शूलपाणयेनमः शिवं इह प्रतिष्ठितो भव' असे म्हणून बेलाचे पान ठेवल्या जागी ते मातीचे लिंग ठेवावे. 'ध्यायेन्नित्यं महेशं०' या मंत्राने नंतर ध्यान करून,
'ॐ पिनाकधृषे नमः श्रीसाम्बसदाशिव इहागच्छ इह प्रतिष्ठ इह सन्निहितो भव'
असे आवाहन करावे. या प्रसंगी ब्राह्मणांनी मूलमंत्र म्हणावा. त्यानंतर 'ॐ नमः शिवाय' या मूलमंत्राने पाद्य, अर्घ्य व आचमन देऊन, 'पशुपतये नमः' या व मूलमंत्राने स्नान, वस्त्र, यज्ञोपवीत, गंध, पुष्प, धूपदीप, नैवेद्य, फल, विडा निरांजन व मंत्रपुष्पांजलि- ही अर्पण करून, 'शर्वाय क्षितिमुर्तये नमः' या मंत्राने पूर्वदिशेकडची पूजा करावी. 'भवाय जलमूर्तयेनमः' या मंत्राने ईशान्य, 'रुद्रायाग्निमूर्तयेनमः' या मंत्राने उत्तर, 'उग्रायवायुमुर्तयेनमः' याने वायव्य, 'भीमायाकाशमूर्तयेनमः' याने पश्चिम, 'पशुपतये यजमानमूर्तयेनमः' याने नैऋत्य, 'महादेवायसोममूर्तयेनमः' याने दक्षिण, व ईशानाय सुर्यमूर्तयेनमः' याने आग्नेयी-अशी आठ दिशांत पूजा केल्यावर, प्रार्थना करून नमस्कार करावा. आणि 'महादेवायनमः' असे म्हणून (लिंग) विसर्जन करावे हा लिंगपूजेचा संक्षेप आहे. याचा सबंध प्रयोग प्रयोगचिंतामणीत पाहावा. पूर्वी जी शिवरात्रिव्रताची पूजा सांगितली, ती मातीच्याही लिंगाची करावी. या पार्थिव लिंगाच्या व्रतोद्यापनाचा विधि कौस्तुभेत्यादि ग्रंथात पाहावा.