कार्तिकी पुनवेला चातुर्मास्यव्रताची समाप्ति करावी. चातुर्मास्यव्रतसमाप्तीच्या वेळी जी दाने करावी ती अशी; नक्त केले असल्यास दोन वस्त्रे द्यावीत; एकान्तर उपास केला असल्यास गाय द्यावी; जमिनीवर निजणे केले असल्यास अंथरूण द्यावे; सहाव्या वेळी जेवण केले असल्यास गाय द्यावी; तांदूळ, गहू वगैरे धान्ये सोडली असल्यास जे जे सोडले असेल ते ते सोन्याचे करून द्यावे; कृच्छ्रव्रत केले असल्यास दोन गाई द्याव्या. शाकाव्रताला गाय द्यावी; दूधभात खाणे किंवा दूध ही सोडली असल्यास गाय द्यावी; मध, दही व तूप ही सोडली असल्यास वस्त्र व गाय ही द्यावीत; ब्रह्मचर्यपालनास सोने द्यावे. तांदूळ सोडल्यास दोन वस्त्रे द्यावीत. मौनव्रतास घंटा; रांगोळी काढण्यास गाय व सोन्याचे कमळ; दिवा लावण्यास दिवा व दोन वस्त्रे; जमिनीवर जेवण केल्यास काशाचे भांडे व गाय; गोग्रासास गाय व बैल. शंभर प्रदक्षिणांस वस्त्र; अभ्यंग सोडल्यास तेलाने भरलेला घट; नख व केस वाढविल्यास मध, तूप आणि सोने ही द्यावीत. ज्या बाबतीत विशेष दान सांगितले नाही अशांसाठी सोने व गाय यांचे दान करावे. गूळ सोडला असल्यास, गुळाने भरलेले तांब्याचे भांडे व सोने; मीठ सोडले असल्यास मिठाने भरलेले तांब्याचे भांडे द्यावे असे क्वचित सांगितले आहे. आषाढी पौर्णिमा वगैरे तिथीवर लक्ष प्रदक्षिणा, लक्ष नमस्कार वगैरे व्रतांची सुरवात केली असल्यास त्यांचे उद्यापनही याच (कार्तिकी पौर्णिमा) तिथीला करावे. याचप्रमाणे तुळशीच्या लाखोलीचाही कार्तिक किंवा माघ या महिन्यांत आरंभ करून, रोज हजार तुळशीपत्रे वाहावीत व लक्ष झाल्यावर माघी अथवा वैशाखी पौर्णिमेला त्याचे उद्यापन करावे. फुले वगैरेंच्या लाखोल्यांसंबंधानेही हेच निर्णित समजावे. बेलाची लाखोली वाहिल्याने संपत्ति; दूर्वांच्या लाखोलीने अरिष्टनाश; चाफ्याच्या फुलांच्या लाखोलीने आयुष्यवृद्धि; अतसीच्या (जवस) फुलांच्या लाखोलीने विद्या; तुळशीच्या पानांच्या लाखोलीने विष्णूचा आशीर्वाद; गहू, तांदूळ वगैरे चांगल्या धान्यांच्या लक्षाने दुःखनाश; अशी फळे मिळतात. सर्व फुलांनी सर्व मनोरथ सिद्धीस जातात. हे लाखोलीचे व्रत देखील तीन महिनेपर्यंत करून माघात किंवा वैशाखात संपूर्ण करावे. पहिल्यापेक्षा दुसरे असे हे महिने उत्तरोत्तर प्रशस्त होत. धारणा व पारणा यांचेही व्रत याप्रमाणेच पौर्णिमेला उजवावे. कार्तिकमासव्रते व एक महिना उपास करण्याचे व्रत हीही द्वादशीलाच पुरी करावीत. त्या तिथीला समाप्ति करणे अशक्य असल्यास ती पौर्णिमेला करावी. पाचप्रमाणे गोपद्मवतीची आषाढ शुद्ध एकादशीला सुरवात करून दररोज तेहतीस गोपद्मे काढावीत व त्यांची गंधपुष्पादिकांनी पूजा करून, तितकेच अर्घ्य, प्रदक्षिणा व नमस्कार ही करावीत आणि कार्तिक शुद्ध द्वादशीला तेहेतीस अपूपांचे (मोदक, घारगे, कडबू वगैरे) वाण द्यावे. असे पाच वर्षे केल्यावर त्याचे उद्यापन करावे. लक्ष प्रदक्षिना वगैरे गोपद्मापर्यंतच्या सर्व व्रतांच्या उद्यापनांचे विधि कौस्तुभात पहावेत. कार्तिकी पुनवेला जर कृत्तिकायोग येईल, तर तो महापुण्यकारक आहे, आणि रोहिणीयोग असल्यास तिला महाकार्तिकी म्हणतात. कार्तिकी पुनवेला कृत्तिकायोग असता, जो कोणी कार्तिकस्वामीचे दर्शन घेतो, तो सात जन्मपर्यंत धनाढ्य, वेदपारग आणि ब्राह्मण बनतो. विशाखा नक्षत्री सूर्य असताना ज्या तिथीला कृत्तिका हे चंद्रनक्षत्र येते ती तिथि पद्मयोगाची असते. हा योग पुष्करतीर्थासंबंधाने फार चांगला आहे.