चैत्र शुद्ध त्रयोदशीला अनंगपूजन व्रत करावें. त्यासाठीं जी त्रयोदशी द्वादशीनें विद्ध असेल ती घ्यावी. चतुर्दशीला नृसिंहाचा दोलोत्सव करावा. याच दिवशीं-श्रीशिव, एकवीरा देवी आणि भैरव यांची दवण्यानें पूजा करावी. या कामीं जी चतुर्दशी त्रयोदशीनें विद्ध व अपराह्नव्यापिनी असेल तीच घ्यावी. अपराह्नव्याप्तीचा जर अभाव असेल, तर निदान अपराह्नाला स्पर्श करणारी अशी जी आदल्या दिवसाची असेल, ती घ्यावी. तशीही नसल्यास दुसर्या दिवसाची घ्यावी. चैत्री पौर्णिमा सामान्य निर्णयानें दुसर्या दिवसाची घ्यावी. पूर्वीं ज्या तिथि सांगितल्या त्या तिथींवर जर दवण्याची पूजा केली नसेल, तर पुनवेलाच सर्व देवांची दवण्यानें पूजा करावी. चैत्री पुनवेला चित्रानक्षत्र असतां, रंगीबेरंगी वस्त्राचें दान केलें असतां, तें सौभाग्यप्रद आहे. चैत्री पुनवेला रविवार, गुरुवार अथवा शनिवार असतां, स्नान, श्राद्ध वगैरे जर केलीं, तर अश्वमेधाचें पुण्य लागतें. चैत्रशुद्ध एकादशी, पुनव अथवा मेषसंक्रान्ति यांवर वैशाखस्नानाला जो आरंभ करायचा, त्याचा मंत्र येणेंप्रमाणें--
’वैशाखं सकलं मासं मेषसंक्रमणे रवेः ।
प्रातः सनियमः स्नास्ये प्रीयतां मधुसूदन ॥
मधुहन्तुः प्रसादेन ब्राह्मणानामनुग्रहात् ।
निर्विघ्नमस्तु मे पुण्यं वैशाखस्नानमन्वहम् ॥
माधवे मेषगे भानौ मुरारे मधुसूदन ।
प्रातःस्नानेन मे नाथ फलदो भव पापहन् ॥’
ह्या वैशाखस्नानव्रताच्या दिवसांत हविष्यान्नाचें भक्षण, ब्रह्मचर्य वगैरे नियम पाळावेत. अशाप्रकारें सर्व महिनाभर जर स्नान करण्यास कोणी असमर्थ असेल, तर (एकादशीला आरंभ केलेला असल्यास ) त्रयोदशीपर्यंत तीन दिवस स्नान करावें. ही पुनव मन्वादि आहे असें पूर्वी सांगितलेंच आहे. चैत्र वद्य त्रयोदशी जर शततारकानक्षत्रानें युक्त असेल, तर तिला वारुणी असें नांव आहे. या वारुणीवर स्नानदानादि कृत्यें केल्यास ग्रहणादि पर्वकालाप्रमाणें फळ मिळतें. शततारका नक्षत्र असून जर शनिवार असेल, तर त्या चैत्रवद्य त्रयोदशीला महापारुणी म्हणतात. इतकें असून शिवाय जर शुभयोग असेल, तर तिला महावारुणी म्हणतात. वारुणीयोगाविषयीं कृष्णप्रतिपदेपासून पुनवेपर्यंत एक महिना समजावा. याकरतां अमावास्येनें संपणार्या महिन्यासंबंधानें हा दिवस म्हणजे फाल्गुन कृष्ण त्रयोदशीचा येतो असें समजावें. चैत्र वद्य चतुर्दशीला शिवाच्या सन्निध स्नान केल्यानें, तसेंच त्या दिवशीं जर मंगळवार असेल तर गंगेंत स्नान केल्यानें पिशाचांचा त्रास होत नाहीं. याप्रमाणें धर्मसिंधुसार ग्रंथांतल्या चैत्र महिन्यांतल्या कृत्यांच्या निर्णयाचा उद्देश येथें संपूर्ण झाला.