मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|योगशास्त्र|योगासने, बंध आणि क्रिया|
पद्मासन *

पद्मासन *

प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.


(चित्र क्र. १०४)
पद्म म्हणजे कमळ. हे आसन अत्यंत महत्त्वाच्या आणि अत्यंत उपयुक्त अशा आसनांपैकी एक आहे. हे ध्यानाचे आसन आहे आणि चित्रांमध्ये बुध्द अनेकदा या आसनामध्ये बसलेला दाखवतात. हठयोग प्रदीपिकेच्या पहिल्या अध्यायातील ४८ व्या श्लोकामध्ये या आसनाचे आणि या आसनात बसून श्वसनावर ताबा ठेवण्याचा जो सराव करायचा असतो त्याचे वर्णन पुढीलप्रमाणे केले आहे :
पद्मासनामध्ये बसा. आणि एक तळहात दुसर्‍यावर ठेवल्यावर हनुवटी छातीवर घट्ट रोवा आणि ब्रह्मचिंतन करीत गुदद्वाराचे पुन्हा पुन्हा आकुंचन करुन अपानवायू वर खेचा. त्याचप्रमाणे गळ्याचे आकुंचन करुन प्राणवायू खाली दाबा. यामुळे जागृत झालेल्या कुंडलिनीच्या कृपेमुळे अनुपम असे ज्ञान अभ्यासकाला प्राप्त होते. कुंडलिनी म्हणजे शरीरामधील दिव्य विश्वशक्ती. पाठीच्या कण्याच्या तळाशी असलेल्या शरीराच्या सगळ्यात खालच्या केंद्रामध्ये स्वत:भोवती विखळे घालून झोपलेली नागीण हे कुंडलिनीचे प्रतीक मानले जाते. ही सुप्तशक्ती जागृत करणे आणि पाठीच्या कण्यामधून तिला मेंदूपर्यंत जायला लावणे आवश्यक असते. ती सुषुम्ना नाडीमधून आणि शरीरयंत्रातील मज्जासंस्थेमधील गतिनियंत्रक अशा सहा चक्रांमधून म्हणजेच शरीरातील सहा सूक्ष्म केंद्रांमधून मेंदूपर्यंत जाते. ‘द सर्पट पाँवर’ या आँर्थर अँव्हलाँन ऊर्फ सर जाँन वूडराँफ यांनी लिहिलेल्या पुस्तकात कुंडलिनी जागृत कशी होते याचे वर्णन तपशीलवार दिले आहे. पद्मासन हे मूलभूत आसनांपैकी एक आहे. आणि ते शीर्षासन व सर्वांगासन यांच्या वेगवेगळ्या प्रकारांमध्ये अनेकदा उपयोगात आणले जाते.

पध्दती
१. पाय सरळ समोर पसरून जमिनीवर बसा. (चित्र क्र. ७७)
२. उजवा पाय गुडघ्याशी वाकवून तो हातांनी पकडा आणि उजवी टाच बेंबी. जवळ येईल अशा बेताने डाव्या मांडीच्या मुळाशी ठेवा.
३. आता डावा पाय वाकवा. आणि तो हातांनी धरुन टाच बेंबीजवळ येईल अशा बेताने उजव्या मांडीच्या मुळाशी ठेवा. पायांचे चवडे वर वळवलेले असू द्या. ही मूलभूत पद्मासनाची स्थिती (चित्र क्र. १०४) होय.
४. ज्यांना जमिनीवर बसण्याची सवय नसते त्यांचे गुडघे बहुधा लवचिक नसतात. पद्मासन करताना सुरुवातीला त्यांच्या गुडघ्यांना विलक्षण कळा लागतील. परंतु चिकाटी आणि अखंड सराव यामुळे त्या कळा हळूहळू कमी होत जातील आणि मग दीर्घकाळ ते सुखाने या आसनात बसू शकतील.
५. तळापासून मानेपर्यंत पाठीचा कणा ताठ आणि सरळ असावयास हवा. हात ताणून उजवा हात उजव्या गुडघ्यावर आणि डावा हात डाव्या गुडघ्यावर ठेवावयास हरकत नाही. अंगठे आणि पहिली बोटे वाकवून जुळवून धरावी. हात ठेवण्याचा आणखी एक मार्ग आहे, त्यामध्ये पावले ज्या ठिकाणी एकमेकांवर असतात तेथे एका तळहातावर दुसरा तळहात अशा पध्दतीने हात ठेवावेत. (चित्र क्र. १०५)
६. पायांची स्थिती बदला आणि डावे पाऊल उजव्या मांडीवर व उजवे पाऊल डाव्या मांडीवर ठेवा. त्यामुळे पायांचा विकास समतोलपणे होईल.  

परिणाम
सुरुवातीला गुडघ्यांमध्ये येणार्‍या कळा एकदा नाहीशा झाल्या म्हणजे, पद्मासन हे शरीर-मनाला अत्यंत विसावा देणारे असे आसन आहे हे ध्यानात आहे हे ध्यानात येते. या आसनात शरीर बसलेल्या स्थितीत असते आणि त्यामुळे न आळसावता ते विश्रब्ध राहू शकते. पायांची मांडी आणि ताठ पाठ यामुळे मन एकाग्र आणि तल्लख राहते. त्यामुळे प्राणायामाच्या अभ्यासकांना उपयुक्त असणार्‍या आसनांपैकी गुडघे आणि घोटे यांमधील ताठरपणा नाहीसा होतो, पाठीचा तळचा भाग आणि पोट यांमधील रक्ताभिसरण वाढत असल्यामुळे पाठीचा कणा आणि पोटातील अवयव सुदृढ बनतात.

N/A

References : N/A
Last Updated : September 09, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP