मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|योगशास्त्र|योगासने, बंध आणि क्रिया|
नक्रासन *

नक्रासन *

प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.


(चित्र क्र. ६८ ते ७१)
नक्र म्हणजे मगर. भक्ष्याला पकडणार्‍य़ा मगरीच्या अनेक बदलत्या स्थिती या आसनात अंतर्भूत असल्यामुळे हे नाव दिले गेले आहे.

पध्दती
१. तोंड जमिनीकडे ठेवून पालथे झोपा.
२. कोपरे वाकवा आणि तळहात कंबरेच्या बाजूस ठेवा.
३. दोन पावलांमध्ये एक फूट अंतर ठेवा. श्वास सोडा. आणि तळहात व पायाची बोटे यांवर भार सांभाळीत सर्व शरीर जमिनीपासून काही इंच वर उचला. शरीर दंडुक्याप्रमाणे ताठ अणि गुढगे आवळलेले असू द्या. शरीर जमिनीशी समांतर असू द्या. (चित्र क्र. ६८)
४. काही वेळ श्वसन करुन श्वास सोडा. आणि हात व पावले एकाच वेळी जमिनीवरुन उचलून सबंध शरीर एक फूट पुढे झोकून द्या. (चित्र क्र. ६९, ७० आणि ७१) एक फूट पुढे गेल्यावर काही श्वास घ्या. मग श्वास सोडा. आणि पुढच्या दिशेने पुन्हा झेप घ्या.
५. चार पाच वेळा अशी पुढे झेप घ्या. प्रत्येक झेपेनंतर शरीराची स्थिती क्र. ३ मध्ये वर्णिल्याप्रमाणे असली पाहिजे. या स्थिती भक्ष्याची शिकार करणार्‍या मगरीच्या झेपेप्रमाणे दिसतात. प्रत्येक झेपेनंतर काही सेकंद दीर्घ श्वसन करीत विश्रांती घ्या.
६. आता हालचाली उलटया दिशेने करा. आणि श्वास सोडून एक एक फूट मागे उडया घ्या. आणि मूळ स्थानावर या.
७. धड जमिनीवर टेकवा आणि विसावा घ्या.

परिणाम
या आसनामुळे मनगटे सशक्त बनतात. शरीराचे मांद्य व मेंदूचा थकवाही निघून जातात. सबंध शरीराला नवजीवन लाभते. आणि अंगात जोम सळसळू लागतो. या आसनातील हालचालींमुळे मनगटांवर दाव येतो. म्हणून हे आसन हळूहळू व टप्प्या-टप्प्याने साध्य करावे; नाहीतर मनगटांमध्ये लचक भरते.

N/A

References : N/A
Last Updated : September 09, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP