भुजपीडासन *
प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.
(चित्र क्र. ३४८)
भुज म्हणजे दंड किंवा खांदा, पीडा म्हणजे वेदना किंवा दाब. या आसनामध्ये गुडघ्यांची मागची बाजू खांद्यांवर ठेवून हातांवर शरीराचा तोल सांभाळला जातो.
पध्दती
१. ताडासनात उभे राहा. (चित्र क्र.१) पावलांमध्ये २ फूट अंतर राहील इतके पाय फाकवा.
२. पुढे वाका आणि गुडघे वाकवा.
३. तळहातामध्ये दीड फूट अंतर ठेवून ते पायांच्या मधल्या जागेत जमिनीवर टेका. (चित्र क्र. ३४६)
४. मांडयांची मागची बाजू दंडांच्या मागच्या बाजूवर टेका. दंडाच्यावर, खांदे व कोपरे यांच्या मधल्या जागी मांडया टेकवा.
५. या जागी मांडया टेकवताना सुरवातीच्या काळात टाचा जमिनीवरुन उचला.
६. श्वास सोडा. आधी एक आणि नंतर एक याप्रमाणे पायाची बोटे जमिनीवरुन हळूहळू उचला आणि हातांवर तोल सांभाळा. (चित्र क्र. ३४७) त्यानंतर पावले घोटयांच्यापाशी एकमेकांशी गुंतवा. (चित्र क्र. ३४८) सुरवातीच्या काळात पाय खाली घसरु लागतील आणि तोल सांभाळणे कठीण जाईल. तोल पक्का करण्यासाठी मांडयांची मागची बाजू दंडांवर जास्तीत जास्त उंच जागी टेकण्याचा प्रयत्न करा. हात कोपरांशी किंचित वाकलेले राहातील. हात जास्तीत जास्त लांबवण्याचा प्रयत्न करा आणि डोके वर उचला.
७. मनगटांना शरीराचा भार सहन होत राहील इतका काळ, नेहमीप्रमाणे श्वसन करीत, या शरीर तोललेल्या स्थितीत राहा. त्यानंतर पाय, प्रथम एक आणि नंतर एक अशा तर्हेने, मागे नेऊन पावले मोकळी करा, (चित्र क्र. ३४९ व ३५०), आणि ती जमिनीवर टेका. हात जमिनीवरुन उचला आणि ताडासनात उभे राहा. (चित्र क्र. १)
८. एकमेकात गुंफलेल्या घोटयांची स्थिती बदलून हे आसन पुन्हा करा. जर प्रारंभी उजवे पाऊल डाव्या पायाच्या घोटयावर ठेवले असेल तर आसनाची पुनरावृत्ती करताना डावे पाऊल उजव्या पायाच्या घोटयावर ठेवा.
परिणाम
हे आसन केल्यामुळे हाताचे पंजे आणि मनगटे मजबूत बनतात. तसेच पोट आकुंचित झाल्यामुळे पोटाचेही स्नायू सशक्त बनतात. शरीराला हलकेपणा येतो. दंडाचे दुय्यम स्नायू या आसनामुळे विकसित होतात आणि सुदृढ बनतात. त्यासाठी व्यायामसाधने किंवा व्यायामशाळा यांची गरज पडत नाही. शरीराचे विविध भाग वजने आणि प्रतिवजने म्हणून उपयोगात आणले जातात. गरज असते ती फक्त इच्छाशक्तीची.
N/A
References : N/A
Last Updated : September 12, 2020
TOP