अष्टा वक्रासन *
प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.
(चित्र क्र. ३४२ आणि ३४३)
या आसनाला अष्टावक्र ऋषींचे नाव दिले आहे. सीतेचा पिता मिथिलेचा राजा जनक याचे हे गुरु. असे सांगतात की जेव्हा हा ऋषी मातेच्या गर्भात होता त्यावेळी त्याचा पिता कगोल (किंवा कहोल) याने वेदपठण करताना कित्येक चुका केल्या; त्या ऐकून अजून जन्मालाही न आलेला हा ऋषी हसू लागला. त्यामुळे पित्याला राग येऊन ‘तू अष्टावक्र होऊन जन्माला येशील’ असा त्याने त्याला शाप दिला. अखेर तो जन्माला आला तेव्हा त्याचे शरीर आठ ठिकाणी वाकडे झाले होते. या वाकडेपणामुळे त्याला अष्टावक्र हे नाव मिळाले. एका तात्त्विक वादात मिथिलेचा राजपंडित वंडी याने कहोलाचा एका तात्त्विक वादात पराभव केला होता. अष्टावक्र हा लहानपणीच विद्वान पंडित बनला आणि वंडीला वादात पराभूत करुन आणि जनकाचा गुरु बनून त्याने बापाच्या पराभवाचा सूड घेतला. तेव्हा त्याच्या पित्याने त्याला उ:शाप दिला आणि वाकडेपणा जाऊन त्याचे शरीर सरळ झाले. हे आसन दोन टप्प्यांमध्ये दिले आहे.
पध्दती
१. पावलांमध्ये १८ इंच अंतर ठेवून उभे राहा.
२. गुडघे वाकवा. उजवा तळहात पायांच्या मध्ये जमिनीवर टेका आणि डावा तळहात डाव्या पायाच्या पलीकडे जवळ्च जमिनीवर टेका.
३. उजवा पाय उजव्या हातावरुन पुढे आणा आणि उजव्या मांडीची मागची बाजू उजव्या दंडाच्या मागच्या बाजूवर कोपरालगतच्या वरच्या भागावर ठेवा. डावा पाय दोन दंडाच्या मध्ये, परंतु उजव्या दंडाच्या जरा अधिक जवळ आणून ठेवा. (चित्र क्र. ३४०)
४. श्वास सोडा. दोन्ही पाय जमिनीवरुन उचला. डावे पाऊल उजव्या पायावर घोटयापाशी ठेवून पायांची घडी घाला. (चित्र क्र. ३४१). आणि दोन्ही पाय उजव्या बाजूकडे न्या (चित्र क्र. ३४२). उजवा हात मांडयांच्या मध्ये पकडला जाईल. आणि तो कोपराशी किंचित वाकलेला असेल. डाव हात ताठ राहावा. नेहमीप्रमाणे श्वसन करीत या स्थितीत काही काळ दोन हातांवर तोल सावरुन राहा. हा या आसनाचा पुढला टप्पा.
५. आता श्वास सोडा. कोपरे वाकवा. धड आणि डोके ही दोन्ही जमिनीशी समांतर होईपर्यंत खाली आणा. (चित्र क्र. ३४३) नेहमीप्रमाणे श्वसन करीत डोके आणि धड एकदा ह्या बाजूला आणि एकदा त्या बाजूला असे हालवीत राहा. हा या आसनाचा दुसरा टप्पा.
६. श्वास घ्या. हात ताठ करा. धड वर उचला. (चित्र क्र. ३४२). पायांची घडी मोडा आणि पाय मोकळे करा आणि ते जमिनीवर आणा.
७. हे आसन दुसर्या बाजूने पुन्हा करा. क्र. २ ते ५ या कृतींच्या सूचनेमध्ये ‘डावा’ व ‘उजवा’ या शब्दांची उलटापालट करुन त्याप्रमाणे हे आसन करा.
परिणाम
या आसनामुळे मनगटे आणि दंड मजबूत बनतात आणि पोटाचे स्नायू विकसित होतात.
N/A
References : N/A
Last Updated : September 12, 2020
TOP