मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|योगशास्त्र|योगासने, बंध आणि क्रिया|
सेतुबंधासन *

सेतुबंधासन *

प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.


(चित्र क्र. २९६)
सेतू म्हणजे पूल. सेतुबंध म्हणजे पुलाची रचना. या आसनामध्ये सबंध शरीराची कमान बनते आणि एका टोकाला टाळू व दुसर्‍या टोकाला पावले यांचा आधार त्या कमानीला असतो, यामुळे हे नाव दिले गेले आहे.

पध्दती
१. पाठीवर सरळ उताणे निजा (चित्र क्र. २१९). काही वेळा दीर्घ श्वसन करा.
२. गुडघे वाकवा. गुडघ्याशी पाय फाकवा आणि टाचा कुल्ल्यांजवळ आणा.
३. टाचा जुळवून ठेवा आणि टाचांच्या बाहेरच्या बाजू जमिनीवर घट्टपणे टेकवा.
४. हात डोक्याच्या बाजूंना आणा आणि श्वास सोडून धड उचला. शरीराची कमान करुन टाळू जमिनीवर टेकू द्या. (चित्र क्र. २९३) मान वर ताणून आणि पाठीचे, छातीमागचा आणि तळचा हे भाग वर उचलून डोके जास्तीतजास्त मागच्या बाजूला खेचण्याचा प्रयत्न करा.
५. छातीवर हातांची घडी करा. डावे कोपर उजव्या हाताने आणि उजवे कोपर डाव्या हाताने पकडा. (चित्र क्र. २९४) दोनदा किंवा तीनदा श्वास घ्या.
६. श्वास सोडा, पुट्ठा वर खेचा (चित्र क्र. २९५) व पाय ताठ होईपर्यंत ताणा. (चित्र क्र. २९६) पावले जुळवा आणि ती जमिनीवर जोराने दाबा. आता सर्व शरीराचा एक पूल किंवा कमान तयार होईल. एका टोकाला टाळू आणि दुसर्‍या टोकाला पावले यांच्यावर हा पूल आधारलेला असेल.
७. नेहमीप्रमाणे श्वसन करीत या स्थितीत काही सेकंद राहा.
८. श्वास सोडा. हातांची घडी मोडा व हात जमिनीवर टेका. गुडघे वाकवा. पाय आणि धड जमिनीवर आणा. डोक्यावरील पकड सैल करा. मान सरळ करा. सरळ उताणे झोपा आणि विसावा घ्या.

परिणाम
या आसनामुळे मान मजबूत बनते. आणि पाठीच्या कण्याचे वरचा, मधला, तळचा आणि खालच्या टोकाचा हे सर्व भाग सुदृढ बनतात. पाठीचे प्रतारक स्नायू शक्तिशाली बनतात व पुट्ठा आकुंचित होऊन सशक्त बनतो. मज्जाग्रंथी, मस्तकग्रंथी, कंठग्रंथी व मूत्रस्थग्रंथी या रक्तामध्ये माखल्या जातात व त्यांचे कार्य सुव्यवस्थितपणे होऊ लागते.

N/A

References : N/A
Last Updated : September 12, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP