परिवृत्तैकपाद शीर्षासन *
प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.
(चित्र क्र. २०५, २०६ आणि २०७).
परिवृत्त म्हणजे सभोवार फिरविलेला. एकपाद म्हणजे एक पाय. शीर्षासनाच्या या प्रकारात पाय फाकवले जातात. आणि नंतर धड आणि पाय ही एका-एका बाजूला वळवली जातात. डोकी किंवा हात यांची स्थिती मुळासारखीच राहाते.
पध्दती
१. पार्श्वशीर्षासन (चित्र क्र.२०२) पूर्ण करा. पाय फाकवा. उजवा पाय पुढे न्या. आणि डावा पाय समतोलपणाने तितकाच मागे न्या. (चित्र क्र. २०४) श्वास सोडा. पाठीचा कणा डावीकडे वळवा. म्हणजे दोन्ही पाय घडयाळाच्या काटयाच्या दिशेने ९० अंशांनी बाजूला वळतील. (बाजूचे दृश्य : चित्र क्र. २०५)
२. बाजूला वळल्यावर गुडघ्यांमागील स्नायू, (धोंदशीर) गुडघे आणि पोटर्या घट्ट करुन पाय काठीसारखे ताठ ठेवा.
३. पाय आणखी फाकवा आणि नेहमीसारखे श्वसन ठेवण्याचा प्रयत्न करीत या स्थितीत २० ते ३० सेकंद राहा.
४. श्वास सोडा. सरळ सालंब शीर्षासन १ मध्ये या. आता डावा पाय पुढे न्या व उजवा पाय मागे न्या. पाय घडयाळाच्या काटयाच्या उलटया दिशेने ९० अंशांनी बाजूला वळतील अशा बेताने पाठीचा कणा उजवीकडे वळवा. (पुढील दृश्य : चित्र क्र. २०६;) मागील दृश्य : चित्र क्र. २०७) या आसनात आधीच्या इतकाच वेळ राहा. श्वास सोडा. आणि पुन्हा सालंब शीर्षासन १ मध्ये या.
परिणाम
या आसनामुळे पायाचे स्नायू विकसित होतात आणि मूत्रपिंड, मूत्राशय, प्रोस्टेट ग्रंथी आणि आतडी सुधारतात.
N/A
References : N/A
Last Updated : September 11, 2020
TOP