पादहस्तासन *
प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.
(चित्र क्र.४६)
पाद म्हणजे पाय आणि हस्त म्हणजे हात. हे आसन पुढे वाकून आणि आपल्या हातांवर उभे राहून करावयाचे असते.
पध्दती
१. ताडासनात उभे राहा (चित्र क्र. १). एक फूट अंतर पायांमध्ये ठेवून उभे रहा.
२. श्वास सोडा. पुढे वाका आणि गुढगा न वाकवता पावलांखाली हात सरकवा. तळहात आणि चवडे एकमेकांशी जुळलेले राहावेत (चित्र क्र. ४५).
३. डोके वर उचलून धरा आणि पाठ जास्तीत जास्त अंतर्गोलाकृतीत ठेवा. गुढग्यांवरील पकड सैल न करता या स्थितीत काही वेळ श्वसन करा.
४. आता श्वास सोडा आणि कोपरे वाकवून व तळहातांपासून पावले वर खेचून डोके गुढग्यांमध्ये न्या (चित्र क्र. ४६). या स्थितीत नेहमीसारखे श्वसन करीत २० सेकंद राहा.
५. श्वास घ्या. डोके वर उचला आणि क्र. २ च्या स्थितीमध्ये या (चित्र क्र. ४५) डोके चांगले वर उचललेले असू द्या. दोनदा श्वास घ्या.
६. श्वास घ्या. उठा आणि ताडासनात उभे राहा (चित्र क्र. १)
पादांगुष्ठासन आणि पादहस्तासन यांचे परिणाम
पहिल्या आसनापेक्षा दुसरे आसन अधिक मेहनतीचे आहे. परंतु दोघांचेही परिणाम सारखेच आहेत. पोटातील अवयव या आसनामुळे सुधारतात आणि पाचक रसांची निर्मिती वाढते. यकृत आणि प्लीहा यांचा मर्दपणा नाहीसा होतो. पोटाचा फुगवटा किंवा जठरविषयक त्रास ज्यांना होत असेल त्यांना ह्या दोन आसनांचा लाभ होईल. चित्र क्र. ४३ आणि ४५ यांमध्ये दाखविल्याप्रमाणे पाठीच्या अंतर्गोलाकार स्थितीसच पाठीच्या मणक्यामधील सरकलेल्या चकत्या जागच्या जागी बसतात. जर कण्यातील चकती निखळलेली असेल तर डोके गुडघ्यांमध्ये आणू नका. मणक्यांमधील चकत्या सरकलेल्या व्यक्तींच्यावर मी प्रयोग केले आहेत आणि अंतर्गोल पाठीमुळे त्यांना फायदा झाल्याचे आढळून आले. मात्र हे आसन करण्यापूर्वी गुरुचे मार्गदर्शन घेतलेच पाहिजे. कारण, पाठीची अंतर्गोलात्मक स्थिती साधणे ताबडतोब शक्य नसते. या आसनाचा अभ्यास सुरु करण्यापूर्वी इतर दुय्यम आसनांवर प्रभुत्व मिळवणे आवश्यक आहे.
N/A
References : N/A
Last Updated : September 08, 2020
TOP