मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|योगशास्त्र|योगासने, बंध आणि क्रिया|
गालवासन *

गालवासन *

प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.


(चित्र क्र.४२७ आणि ४२८)
गालव हा एक ऋषी असून विश्वामित्र ऋषीचा एक शिष्य होता. या आसनाला गालव ऋषीचे नाव दिले आहे.

पध्दती
१. सालंब शीर्षासन २ (चित्र क्र.१९२) करा.
२. नंतर उजवे पाऊल डाव्या मांडीच्या मुळाशी आणि डावे पाऊल उजव्या मांडीच्या मुळाशी ठेवून पद्मासनात (चित्र क्र.४१३) या. श्वास सोडा आणि पोट व छाती यांना मांडया स्पर्श करतील अशा तर्‍हेने धड वाकवा. काही वेळा श्वास घ्या.
३. धड उजवीकडे वळवा. श्वास सोडून उजव्या दंडाच्या मागच्या बाजूवर बगलेच्या जास्तीत जास्त जवळ दोन्ही नडग्या एकमेकींवर येतील अशा तर्‍हेने मांडी घातलेले पाय खाली आणा. (चित्र क्र. ४२६) ही स्थिती स्थिर करा. काही वेळा दीर्घ श्वास घ्या आणि शरीर तोलून धरा.
४. श्वास सोडा. डोके जमिनीवरुन उचलून शरीर वर खेचा. छाती व पोट यांच्या पडद्याच्या आसपासचे स्नायू आवळून धरा. हात ताठ करा आणि हातांवर तोल सांभाळा. (चित्र क्र. ४२७) या स्थितीत तुम्हाला शक्य होईल तितके सेकंद राहा. या स्थितीत वर वर पाहता मोकळे दिसणारे, डावा  खांदा आणि हात, यावर अधिक भार आलेला जाणवेल.
५. कोपरे वाकवा. डोके जमिनीवर टेका आणि पद्मासनातली मांडी न मोडता सालंब शीर्षासन २ मध्ये जा.
६. श्वास सोडा. धड वाकवा. पाय डाव्या दंडाच्या मागच्या बाजूवर ठेवून उजवीकडील बाजूस केल्याप्रमाणेच आता उजवीकडे शरीर तोलून धरा. (चित्र क्र. ४२८)
७. कोपरे वाकवा. डोके जमिनीवर ठेवा. सालंब शीर्षासन २ करा. मांडी मोडा. आता प्रथम डावे पाऊल उजव्या मांडीच्या मुळाशी आणि नंतर उजवे पाऊल डाव्या मांडीच्या मुळाशी ठेवा आणि हे आसन वर वर्णन केल्याप्रमाणे पुनरावृत्त करा.
८. डोके जमिनीवर टेकल्यावर पुन्हा सालंब शीर्षासन २ करा. नंतर पाय जमिनीवर आणून विसावा घ्या किंवा ऊर्ध्व धनुरासन (चित्र क्र.४८६) करुन ताडासनात (चित्र क्र. १) उभे राहा. विपरीत चक्रासन (चित्र क्र. ४८८ ते ४९९) उत्तम रीतीने येऊ लागले म्हणजे ऊर्ध्व धनुरासनानंतर ते केल्यामुळे शरीराला आराम मिळतो.

परिणाम
हे आसन नियमितपणे केल्याने मनगटे आणि पोटाचे अवयव मजबूत बनतात. पोटातील दोन्ही बाजूंकडील स्नायू विकसित होतात. पाठीचा कणा अधिक लवचिक बनतो. मान व खांदे अधिक शक्तिमान बनतात. या आसनामुळे शीर्षासन (चित्र क्र. १८४), पद्मासन (चित्र क्र. १०४) आणि पश्चिमोत्तानासन (चित्र क्र. १६०) यांचे लाभ एकत्रितपणे मिळतात.

N/A

References : N/A
Last Updated : September 12, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP