मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|योगशास्त्र|योगासने, बंध आणि क्रिया|
वसिष्ठासन *

वसिष्ठासन *

प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.


(चित्र क्र. ३९८)
वसिष्ठ हा एक विख्यात ऋषी होता. सूर्यवंशी राजघराण्याचा हा गुरु असून कित्येक वेदसूक्तांचा, विशेषत: ऋग्वेदाच्या सातव्या मंडलाचा हा कर्ता होय. ब्राह्मणाची प्रतिष्ठा आणि शक्ती यांचा हा एक प्रातिनिधिक नमुना होता आणि सप्तर्षी या तारकापुंजामध्ये असलेल्या सात ऋषींमध्ये यालाही स्थान दिले गेले आहे. वसिष्ठ आणि राजर्षी विश्वामित्र यांच्यामधील स्पर्धेच्या अनेक कथा सांगितल्या जातात. विश्वामित्र हा क्षत्रिय असून धर्मनिष्ठा व तपाचरण यांमुळे तो ब्रह्मर्षी पदाला पोहोचला होता. या आसनाला वसिष्ठ ऋषीचे नाव दिले आहे.

पध्दती
१. ताडासनात उभे राहा. (चित्र क्र. १) पुढे वाका आणि तळहात जमिनीवर टेका. जणू आपण अधोमुख श्वानासन (चित्र क्र. ७५) करीत आहोत अशा रीतीने पाय ४ ते ५ फूट मागे न्या.

२. संपूर्ण शरीर उजव्या कुशीला वळवा अणि उजवा पंजा व पाऊल यांवर शरीर तोलून धरा. उजव्या पावलाची बाहेरची बाजू जमिनीवर ठामपणे टेकलेली असावी. डावे पाऊल उजव्या पावलावर ठेवा. डावा तळहात डाव्या कंबरेवर ठेवा आणि शरीर सरळ व ताठ ठेवून तोल सांभाळा (चित्र क्र. ३९६). या स्थितीमध्ये तोल सांभाळण्याचे कसब शिकण्यासाठी उजव्या पायाची आतली बाजू भिंतीशी टेकेल अशा तर्‍हेने भिंतीजवळ राहून हे आसन करा.
३. श्वास सोडा. डावा पाय गुडघ्यापाशी वाकवा. शरीर किंचित पुढे न्या. डाव्या पायाचा आंगठा आणि पहिली दोन बोटे यांमध्ये डाव्या पायाचा आंगठा पकडा. (चित्र क्र. ३९७). डावा हात आणि डावा पाय सरळ वर खेचून उभे करा. (चित्र क्र.३९८) आंगठयावरील पकड सुप्तपादांगुष्ठासनातल्याप्रमाणे (चित्र क्र. २८४) राहील. हात आणि पाय ताठ ठेवून दीर्घ श्वसन करीत या स्थितीत २० ते ३० सेकंद राहा.
४. आंगठयावरील पकड सोडा. डावा पाय पुन्ह उजव्या पावलावर टेका आणि डावा पंजा खाली आणून पुन्हा एकदा कंबरेवर ठेवा.
५. श्वास सोडा. शरीर डाव्या कुशीला वळवून डावा पंजा व डावे पाऊल यांवर शरीर तोलून धरा. वरील सूचनांमध्ये ‘डावा’ व ‘उजवा’ या शब्दांची उलटापालट करुन आधीच्याच इतका वेळ हे आसन दुसर्‍या बाजूने करा.

परिणाम
या आसनामुळे मनगटे मजबूत बनतात. पायांना व्यायाम घडतो आणि पाठीच्या कण्याचे खालचे भाग सुदृढ बनतात.

N/A

References : N/A
Last Updated : September 12, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP