मुक्त हस्त शीर्षासन *
प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.
(चित्र क्र. २०० आणि २०१)
मुक्त म्हणजे मोकळा, हस्त म्हणजे हात. शीर्षासनाच्या या प्रकारावर प्रभुत्व मिळवणे सर्वात कठीण आहे. हे आसन सुखाने करता येऊ लागले म्हणजे संपूर्ण शीर्षासनावर पूर्ण प्रभुत्व मिळाले असे समजावे. या आसनामध्ये तोल सांभाळणे तसे सोपे असते, परंतु वर जाताना आणि खाली येताना गुडघ्याशी न वाकवता ताठ व सरळ ठेवणे हे पराकाष्ठेचे कठीण असते.
पध्दती
१. सतरंजीची चौघडी जमिनीवर पसरा आणि तिच्याजवळ गुडघे टेका.
२. धड पुढे वाकवा. टाळू सतरंजीवर टेका.
३. छातीसमोर व पावलांच्या दिशेने हात सरळ पसरा आणि मनगटांची मागची बाजू जमिनीवर टेका. हात कोपरांशी अगदी सरळ राहू द्या. तळहात वर वळवा. मनगटांमधील अंतर खांद्यांमधील अंतराइतकेच असावे.
४. धड उचलून जमिनीबरोबर त्याचा काटकोन करा. मनगटे जमिनीवर हळू दाबा. श्वास सोडा. आणि पाय उचला. (चित्र क्र. १९९) पाय घट्ट आवळा आणि हळूहळू वर उचलीत काटकोनात आणा. (बाजूचे दृश्य : चित्र क्र. २००)
५. या आसनात नेहमीसारखे श्वसन करीत १ मिनिट राहा. हात सरळ ठेवा. कोपरे ताणा. आणि मनगटाची स्थिती न बदलता खांदे जमिनीपासून जास्तीत जास्त उंच खेचून धरा. (पुढील दृश्य : चित्र क्र. २०१)
६. श्वास सोडा. कंबरेला मागच्या दिशेने हलकासा झोका द्या. आणि हळूहळू पाय जमिनीवर आणा. असे करताना शरीराचा भार थोडासा मनगटावर येऊ द्या.
७. जमिनीवरुन डोके उचला, खाली बसा आणि विसावा घ्या.
टीप :
शीर्षासनाच्या विविध प्रकारांवर प्रभुत्व मिळवल्यावर शरीराला तोल केवळ डोक्यावर सांभाळलेला असताना हातांची स्थिती हवी तशी बदलता येते. हातांची स्थिती बदलण्यासाठी मग पुन्हा पुन्हा पाय खाली आणावे लागत नाहीत. ही गोष्ट हळूहळू शिकणे आवश्यक आहे, नाहीतर मान आणि खांदे लचकण्याची जवळजवळ खात्रीच असते.
N/A
References : N/A
Last Updated : September 10, 2020
TOP