क्रौंचासन *
प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.
(चित्र क्र. १४१ आणि १४२)
क्रौंच म्हणजे करकोचा. क्रौंच हे एका पर्वताचेही नाव आहे. हा हिमालयाचा नातू मानला जातो. आणि युध्दाची देवता कार्तिकेय व विष्णूचा सहावा अवतार परशुराम यांनी या पर्वताचा भेद केल्याच्या कथा आहेत. बसून करावयाच्या या आसनामध्ये एक पाय गुडघ्याशी वाकवला जातो आणि पाऊल हातांनी धरले जाते. त्यानंतर सरळ उभ्या केलेल्या पायाच्या गुडघ्यावर हनुवटी टेकली जाते. हा उंच केलेला पाय करकोच्याच्या उंचावलेल्या मानेसारखा, तसेच पर्वताच्या तुटलेल्या कडयासारखा दिसतो म्हणून या आसनाला हे नाव देण्यात आले आहे.
पध्दती
१. पाय सरळ समोर पसरुन बसा. (चित्र क्र. ७७)
२. उजवा पाय गुडघ्याशी वाकवा आणि पाऊल मागे न्या. उजवे पाऊल कंबरेच्या सांध्याच्या बाजूला टेका. बोटे पाठीमागे रोखलेली व सर्वच्या सर्व जमिनीला टेकलेली असू द्या. उजव्या पोटरीची आतली बाजू उजव्या मांडीच्या बाहेरच्या बाजूला स्पर्शू द्या. दोन्ही गुडघे एकत्र जुळवा.
३. श्वास सोडा. डावा गुडघा वाकवा. डावे पाऊल दोन्ही हातांनी धरा आणि डावा पाय उचलून सरळ उभा करा. (चित्र क्र. १४०)
४. डावा पाय पूर्णपणे लांबवा. आणि पाठ ताठ ठेवा. या स्थितीत काही वेळा श्वसन करुन श्वास सोडा. डोके व धड पुढे झुकवा आणि त्याचवेळी डावा पाय जवळ आणण्याचा प्रयत्न करीत डाव्या पायाच्या गुडघ्यावर हनुवटी टेका. चित्र क्र. १४१ व १४२)
५. दीर्घ श्वसन करीत या स्थितीत २० ते ३० सेकंद राहा. हनुवटी उचललेल्या पायाच्या गुडघ्यावर टेकलेली असताना वाकवलेला पाय जमिनीवरुन उचलू नका.
६. श्वास घ्या. डोके आणि धड मागे आणा (चित्र क्र. १४०) डावा पाय खाली आणा. हात मोकळे करा. उजवा पाय सरळ समोर पुढे आणा. आणि स्थिती क्र. १ मध्ये या.
७. हे आसन उलटया बाजूने पुन्हा करा. आता डावा गुडघा वाकवा. डावे पाऊल डाव्या कंबरेच्या सांध्यापाशी ठेवा. उजवा पाय वर उचलून उभा करा, दोन्ही आसनांना सारखा वेळ द्या.
परिणाम
हे आसन त्र्यंगमुखैकपाद पश्चिमोत्तासनानंतर (चित्र क्र. १३९) त्याचा पुढचा टप्पा म्हणून करता येईल. हे आसन पश्चिमोत्तानासनापेक्षा (चित्र क्र. १६०) करावयास अधिक कठिण आहे. त्यामुळे त्यापासून होणार लाभही जास्त आहेत. या आसनात पाय पूर्णपणे ताणला जातो. पायाच्या स्नायूंना व्यायाम घडतो. पोटाच्या अवयवांनाही नवजीवन लाभते.
N/A
References : N/A
Last Updated : September 10, 2020
TOP