पाशासन *
प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.
(चित्र क्र. ३२८ व ३२९)
पाश म्हणजे फास किंवा दोरी. या आसनात जमिनीवर उकिडवे बसा. धड ९० अंशांनी एका कुशीला वळवा. एक हात दोन्ही मांडयांच्या भोवती लपेटा आणि दुसरा हात खांद्यापासून पाठीमागे वळवून एका हाताने दुसरा हात पकडा. धड आणि पाय एकत्र बांधण्यासाठी हातांचा उपयोग फासासारखा केला जातो यावरुन हे नाव पडले आहे.
पध्दती
१. चवडे आणि टाचा जमिनीवर टेकवून उकिडवे बसा.
२. पावले आणि गुडघे एकत्र ठेवा. ढुंगण जमिनीवरुन उचलून तोल सावरा. (चित्र क्र. ३१७)
३. तोल स्थिर केल्यानंतर धड ९० अंशांनी उजवीकडे वळवा. डावी बगल उजव्या मांडीच्या बाहेरच्या बाजूच्या पलीकडे उजव्या गुडघ्यापाशी येऊ द्या. (चित्र क्र. ३२३) जास्तीत जास्त मुरड साधण्यासाठी डावा गुडघा एक इंच पुढे वाकवा.
४. श्वास सोडा. डावा हात खांद्यापासून लांबवा. (चित्र क्र. ३२४) डावी बगल आणि उजवी मांडी यांमध्ये रिकामी जागा अजिबात ठेवू नका. डावा हात उजव्या मांडीभोवती लपेटा. आणि डावा खांदा डाव्या पायाच्या दिशेने वाकवून डावा हात डाव्या कंबरेपाशी आणा. एकदा श्वास घ्या.
५. श्वास सोडा. उजवा हात खांद्यापासून वाकवून पाठीच्या मागे न्या. उजवा खांदा वाकवा आणि पाठीच्या मागे डाव्या कंबरेपाशी हातांची बोटे एकमेकांमध्ये अडकवा. (चित्र क्र. ३२५)
६. हळूहळू पंजे पकडा. (चित्र क्र. ३२६) आणि हे सुलभ झाल्यानंतर मनगटे पकडा. (चित्र क्र. ३२७, ३२८ व ३२९)
७. तोल सांभाळण्यासाठी पोटरीचे स्नायू आवळून धरा. पाठीचा कणा जितका शक्य होईल तितका अधिक उजवीकडे वळवा आणि कोणत्याही एका खांद्यापासून पलीकडे नजर लावा.
८. हातांची पकड सैल करा आणि दुसर्या बाजूने हे आसन पुन्हा करा. आता धड डावीकडे वळवा. उजवा हात डाव्या मांडीभोवती लपेटा. उजवा खांदा वाकवा आणि उजवा पंजा उजव्या कंबरेपाशी आणा. नंतर श्वास सोडून डावा हात खांद्यापासून वाकवून पाठीमागे न्या. डावा खांदा वाकवा आणि पाठीच्या मागे उजव्या कंबरेजवळ डाव्या पंजाने उजवा पंजा पकडा.
परिणाम
या आसनामुळे घोटे मजबूत आणि लवचिक बनतात. ज्या व्यक्तींना दिवसातून कित्येक तास उभे राहावे लागते त्यांच्या पायांना या आसनामुळे विसावा मिळतो. या आसनामुळे पाठीचा कणा सुदृढ बनतो आणि अभ्यासकाच्या अंगी चपळपणा येतो. खांद्यांची हालचाल मोकळेपणाने होऊ लागते व ते मजबूत बनतात. या आसनामुळे पोटाभोवतीचा मेद झडतो आणि पोटातील अवयवांना मालीश होते. व त्याचवेळी छाती पूर्णपणे विस्तारली जाते. अर्ध मत्स्येंद्रासन १ व २ (चित्र क्र. ३११ व ३३०) यांपेक्षा हे अधिक तीव्र आहे व त्यामुळे अधिक लाभदायक आहे. यकृत, प्लीहा आणि स्वादुपिंड यांची मंदता या आसनामुळे कमी होते. मधुमेही व्यक्तींना या आसनामुळे फायदा होतो, तसेच त्यामुळे पचन सुधारते.
N/A
References : N/A
Last Updated : September 12, 2020
TOP