मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|योगशास्त्र|योगासने, बंध आणि क्रिया|
उत्थित त्रिकोणासन *

उत्थित त्रिकोणासन *

‘योग’ हा शब्द संस्कृत भाषेतील ‘युज्’ या धातूपासून बनलेला आहे.


(चित्र क्रमांक ४ आणि ५)
उत्थित म्हणजे ताणलेला किंवा लांबवलेला. हे उभ्याने करावयाचे आसन ताणलेल्या त्रिकोणासारखे दिसते.
पध्दती
१. ताडासनात उभे राहा. (चित्र क्रमांक १)
२. दीर्घ श्वास घ्या आणि उडी मारुन पाय फाका. पायातील अंतर तीन ते साडेतीन फूट असावे. हात खांद्याच्या रेषेत बाजूस पसरा. तळहात जमिनीकडे वळवा. हात जमिनीशी समांतर ठेवा. (चित्र क्रमांक ३)
३. उजवे पाऊल ९० अंशांनी उजवीकडे वळवा. डावे पाऊल थोडेसे उजवीकडे वळवा. डावा पाय आतून लांब ताणलेला आणि गुडघ्याशी घट्ट आवळलेला असू द्या.
४. श्वास सोडा. धड उजवीकडे वळवा आणि उजवा तळहात उजव्या घोट्याशी आणा. शक्य झाल्यास उजवा तळहात पूर्णपणे जमिनीवर टेका. (चित्र क्र. ४ व ५)
५. चित्रात दाखविल्याप्रमाणे डावा हात उचलून उजव्या खांद्याच्या रेषेत आणा आणि धडाला ताण द्या. पायांची मागची बाजू, छातीची मागची बाजू आणि पुठ्ठा ही एका ओळीत असावयास हवी. पसरलेल्या डाव्या हाताच्या आंगठयावर दृष्टी खिळवा (स्थिर करा). उजव्या गुडघ्याची वाटी वर खेचून उजवा गुडघा घट्ट आवळलेला ठेवा, व तो पायाच्या बोटांच्या दिशेला वळलेला असू द्या.
६. या स्थितीत समतोल व दीर्घ श्वसन करीत अर्धा ते एक मिनिट राहा. मग उजवा तळहात जमिनीपासून उचला. श्वास घ्या आणि क्र. २ च्या स्थितीत उभे राहा.
७. आता डावे पाऊल ९० अंशांनी डावीकडे वळवा. उजवे पाऊल थोडेसे डावीकडे वळवा. दोन्ही गुडघे घट्ट आवळलेले असू द्या. आणि क्र. २ ते ६ या स्थिती दुसर्‍या बाजूने करीत जा. श्वास घ्या आणि क्र. २ च्या स्थितीत या. उजव्या बाजूइतकाच वेळ डाव्या बाजूच्या स्थितीसाठी द्या.
८. श्वास सोडा आणि उडी मारुन पुन्हा ताडासनात उभे राहा (चित्र क्र. १).

परिणाम
या आसनामुळे पायाच्या स्नायूंना सुदृढता येते. पाय आणि पुठ्ठा यांमधला ताठरपणा जातो. पायामध्ये आलेल्या छोटया विकृती नाहीशा होऊन त्यांचा समतोल विकास होतो. पाठदुखी आणि मान चमकणे (मन्यास्तंभ) यांपासून आराम मिळतो. घोटे मजबूत होतात आणि छातीला मजबूतपणा येतो.

N/A

References : N/A
Last Updated : September 08, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP