मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|योगशास्त्र|योगासने, बंध आणि क्रिया|
सिध्दासन *

सिध्दासन *

प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.


(चित्र क्र. ८४)
सिध्द म्हणजे पवित्र आणि पुण्यवान अशी जवळजवळ दैवी व्यक्ती. या व्यक्तीला अलौकिक सिध्दी प्राप्त झालेल्या असतात. सिध्द या शब्दाचा अर्थ साधू ऋषी किंवा द्रष्टा असाही होतो. "सिध्द म्हणतात की ज्याप्रमाणे सर्वात महत्त्वाचा नियम अहिंसा हा आहे आणि यमांमध्ये सर्वात महत्त्वाचा यम मिताहार हा आहे, त्याप्रमाणे आसनांमध्ये सर्वात महत्त्वाचे आसन सिध्दासन हे आहे.” ८४ लक्ष आसनांमधून मनुष्याने सिध्दासनाचा नियमित अभ्यास करावा. त्यामुळे ७२ हजार नाडया शुध्द होतात.’’ (मानवी शरीरामध्ये मज्जाशक्तीवाहक ज्या शिरा असतात त्यांना नाडया म्हणतात.)
"आत्म्याने ध्यान करणार्‍या आणि मिताहार घेणार्‍या योग्याने जर १२ वर्षे सिध्दासनाचा अभ्यास केला तर त्याला योगसिध्दी प्राप्त होतात. (आत्मा म्हणजे जीवात्मा आणि परमात्मा, सिध्दी म्हणजे अलौकिक सामर्थ्य.)
सिध्दासनावर प्रभुत्व मिळाले म्हणजे आनंददायी उन्मनी अवस्था (समाधी) स्वाभाविकपणे आणि प्रयत्नाविना प्राप्त होते. आत्म्याच्या तीन अवस्था असतात आणि त्या एका चौथ्या अवस्थेमध्ये अंतर्भूत असतात. त्या म्हणजे जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुरीयावस्था होत. पहिल्या जागृतीच्या अवस्थेमध्ये जीवाला जड वस्तूंनी बनलेल्य सामान्य जगाची जाणीव असते. जड वस्तूंपासून त्याला आनंद मिळतो. इथे शरीराचे अवलंबित्व मुख्य असते. दुसर्‍या स्वप्नाच्या अवस्थेमध्ये जीव सूक्ष्म वस्तूंचा उपभोग घेतो. जागृतावस्थेतील अनुभवाचे द्रव्य वापरुन तो स्वत:साठी विविध आकारांचे एक नवे जग निर्माण करतो. शरीराच्या बंधनांतून मुक्त होऊन आत्मा स्वैर संचार करतो. तिसरी अवस्था गाढ निद्रेची असते. तिच्यात स्वप्ने किंवा वासना नसतात. तिला सुषुप्ती म्हणतात. हिच्यात जीवात्मा परब्रह्माशी काही काळापुरता एकरुप होत आणि सर्वोच्च आनंदाचा लाभ त्याला होतो असे म्हणतात. गाढ झोपेत सर्व वासनांच्या वर आपण उचलले जातो. आत्म्यावर असलेल्या क्लेशरुपी पडद्यातून आपण मुक्त होतो .. जीवात्मा जरी मांसाने वेष्टिलेला असला, तरी त्याचे उगमस्थान दिव्य आहे. झोपेत शरीराच्या बंधनांपासून ते मुक्त होते व त्याला त्याचा मूल स्वभाव लाभतो असे म्हणतात ... पण ही सततची स्वप्नहीन अवस्था आणि पूर्ण अचेत म्हणजे संज्ञाहीनता ही चुकून एकच मानली जाणे संभवते .... ही स्वप्नहीन निद्रा म्हणजे सर्वोच्च अवस्था नव्हे. ती सर्वोच्च म्हणजे चौथी अवस्था वेगळीच आहे. अंतर्गत किंवा बाह्य वस्तूंची जाणीव नसलेली अशी ही शुध्द, स्वाभाविक संज्ञा असते. गाढ झोपेत इंद्रियांच्या सविकारी जीवनाच्या फार वरच्या पातळीवर, परब्रह्माशी पूर्णपणे एकरुप होऊन जीवात्मा राहतो. गाढ झोपेच्या अवस्थेत जे अभावात्मकपणे जाणवते त्याचे भावात्मक अंग तुरीयावस्थेत जाणवते असे डाँ. राधा कृष्णन यांनी ‘फिलाँसफी आँफ द उपनिषद्‍स’ या ग्रंथात म्हटले आहे. मांडूक्य उपनिषदात ही चतुर्थ अवस्था पुढीलप्रमाणे वर्णन केली आहे : "ज्ञाते म्हणतात की ही चौथी अवस्था म्हणजे आत्मनिष्ठ अनुभवही नसतो, वस्तुनिष्ठ अनुभवही नसतो आणि या दोहोंच्या मधलाही नसतो. हे ज्ञान इंद्रियगम्य नसते, सापेक्ष नसते किंवा अनुमानात्मकही नसते. ही चौथी अवस्था इंद्रियगम्य नसते, ज्ञानगम्य नसते, शब्दगम्य नसते. ही शुध्द कैवल्यरुप जाणीव असते; तिच्यात जगाचे आणि द्वैताचे भान पूर्णपणे गेलेले असते. ते परम श्रेय असते; एकमेव अद्वितीय असते; ते ब्रह्म असते. फक्त त्याचेच ज्ञान करुन घे !” "राजयोग, समाधी, उन्मनी, मनोन्मनी, अमरत्व, लय, शून्याशून्य, परमपद, अमनस्क, अद्वैत, निरालंब, निरंजन, जीवनमुक्ती, सहजावस्था आणि तुरीय हे सर्व एकच अर्थाचे शब्द आहेत. पाण्यात टाकलेला मिठाचा कण ज्याप्रमाणे त्याच्यात विलीन होऊन एकरुप बनतो, त्याप्रमाणे मन आणि आत्मा यांचा संयोग म्हणजे समाधी. जेव्हा प्राण आणि मन यांचा विलय होतो, तेव्हा निर्माण होणारी मेळाची अवस्था म्हणजे समाधी.”
- हठयोग-प्रदीपिका, अध्याय ४, श्लोक ३ ते ६.
सिध्दासारखे आसन नाही, केवलासारखा कुंभक नाही. खेचरीसारखी मुद्रा नाही आणि नादासारखा लय नाही. खेचरी मुद्रेचा शब्दश: अर्थ ‘अवकाशात भ्रमण करणे’ हा आहे. या मुद्रेचे वर्णन घेरंड संहितेच्या तिसर्‍या अध्यायात श्लोक २५ ते २८ मध्ये पुढीलप्रमाणे केले आहे : "जिभेच्या खालची शीर कापा आणि जीभ सारखी मागेपुढे हालवीत राहा. तिच्यावर ताजे लोणी घासा. जीभ लांबवण्यासाठी लोखंडी शस्त्राने ती बाहेर ओढा. हे सातत्याने केल्यावर जीभ लांब होते आणि ती दोन भुवयांच्या मधल्या जागेला स्पर्शू लागली की खेचरी मुद्रा साध्य होते. त्यानंतर जीभ तोंडातच आटाळयाकडे व नंतर मागे वळवा. नाकपुडयांतून येणार्‍या मार्गाची तोंडामध्ये जी छिद्रे असतात, त्यांच्यापर्यंत जिभेचे टोक पोचवा. ती छिद्रे जिभेने बंद करा (अशा तर्‍हेने संकल्प थांबवा.) व दृष्टी भुवयांच्या मध्ये लावा. याला खेचरी म्हणतात. या क्रियेमुळे मूर्च्छा, भूक, तहान, आळस, या गोष्टी नाहीशा होतात. रोग, वृध्दत्व, किंवा मृत्यू यांची बाधा जाते. शरीर दिव्य बनते.”
[नाद म्हणजे आतला गूढ आवाज होय. चौथ्या अध्यायातील ७९ ते १०१ या श्लोकांमध्ये अनेक उपमा देऊन त्याचे तपशीलवार वर्णन केले आहे. योगाची व्याख्या ‘चित्ताच्या व्यापारांचे नियमन’ अशी केली जाते. मनाचे नियमन करण्यासाठी कोणत्या तरी वस्तूवर ते एकाग्र करावे लागते. त्यानंतर हळूहळू ते त्या वस्तूपासून मागे ओढून घेतले जाते आणि आत स्वत:मध्ये त्याला वळवून पाहायला लावले जाते. इथे योग्याला अंतरातील गूढ नादावर चित्त एकाग्र करण्यास सांगतात. "मन हे सर्पासारखे असते. नाद ऐकल्यावर त्याची चंचलता जाते व ते इतरत्र पळत नाही.” हळूहळू नाद सूक्ष्म होऊ लागतो व मनही त्याच्याबरोबर सूक्ष्म होते. अग्नी हा काष्ठ जाळल्यावर स्वत:ही नाहीसा होतो, त्याप्रमाणे नादाबरोबरच मनाचाही लय होतो.]

पध्दती
१. पाय सरळ समोर पसरुन जमिनीवर बसा. (चित्र क्र. ७७)
२. डावा पाय गुडघ्याशी वाकवा. डावे पाऊल हातांनी धरा. त्याची टाच शिवणीनजीक ठेवा. डाव्या पायाचा चवडा उजव्या मांडीला लावून ठेवा.
३. उजवा पाय गुडघ्याशी वाकवा. आणि उजवे पाऊल डाव्या घोटयावर ठेवा. उजवी टाच जघनास्थीला लावून ठेवा.
४. मांडी आणि डाव्या पायाची पोटरी यांच्या मध्ये उजव्या पायाचा चवडा ठेवा.
५. शरीराचा भार टाचांवर ठेवू नका.
६. हात पुढल्या बाजूला ताणा आणि तळहात वरच्या दिशेला होतील अशा बेताने हातांची मागची बाजू गुढग्यांवर ठेवा. आंगठा आणि पहिले बोट एकत्र जुळवा. बाकीची बोटे पसरलेली राहू द्या. (चित्र क्र. ८४)
७. पाठ, मान आणि डोके सरळ व ताठ ठेवून आणि नाकाच्या शेंडयावर खिळवून धरावी त्याप्रमाणे नजर आत वळवून या स्थितीत शक्य तितका अधिक वेळ राहा.
८. पावले मोकळी करा आणि काही काळ विसावा घ्या. आता उजवी टाच प्रथम शिवणीशी आणि नंतर डावे पाऊल उजव्या घोटयावर, असे करुन वर वर्णिलेले आसन आधीच्या आसनाइतकाच वेळ करा.

परिणाम
या आसनामुळे जघनाचा भाग निकोप राहतो. पद्‍मासनाप्रमाणे (चित्र क्र. १०४) हे शरीर-मनाला फार मोठया प्रमाणावर विश्रांती देणारे आसन आहे. बसलेल्या अवस्थेत असल्यामुळे या आसनात शरीर स्वस्थ असते. पायांची घातलेली मांडी आणि ताठ राहिलेली पाठ यामुळे मन एकाग्र आणि तल्लख राहते. प्राणायाम आणि समाधी यांचा अभ्यास करणार्‍यांना हे आसन फार उपयोगी आहे. केवळ शारीरिक दृष्टिकोनातून पाहिले तर गुडघे आणि घोटे यांचा ताठरपणा त्यामुळे नाहीसा होतो. पाठीचा तळचा भाग आणि पोट यांमधले रक्ताभिसरण सुधारते. त्यामुळे पाठीच्या कण्याचा खालचा भाग व पोटातील अवयव सुदृढ बनतात.

N/A

References : N/A
Last Updated : September 09, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP