विपरीत शलभासन ***
प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.
(चित्र क्र.५८४)
विपरीत म्हणजे उलट, विरुध्द, किंवा उफराटे. शलभ म्हणजे टोळ. या आसनातील ताण गंड-भेरंडासनातल्यापेक्षा (चित्र क्र.५८० आणि ५८१) अधिक असतो. आणि हालचाली हलासनाच्या (चित्र क्र.२४१) उलट असतात.
पध्दती
१. जमिनीवर सतरंजी घडी करुन ठेवा. त्यावर सरळ पालथे निजा. तोंड जमिनीकडे असू द्या. मान ताणा आणि हनुवटी सतरंजीवर घट्ट रोवून ठेवा; नाहीतर तिला खरचटेल.
२. कोपरे वाकवा आणि तळहात छातीजवळ ठेवा. बोटे डोक्याकडे रोखलेली असू द्या.
३. श्वास सोडा, गुडघे वाकवून वर उचला व जमिनीपासून किंचित वर उचललेल्या छातीकडे न्या. (चित्र क्र.५७१)
४. काही वेळा श्वसन करुन श्वास सोडा आणि झटका देऊन पाय हवेत वर न्या. शरीर वरच्या दिशेने लांबवा आणि तोलून धरा. (चित्र क्र.५७२) शरीराचा भार हनुवटी, मान, खांदे कोपर व मनगटे यावर घ्या. नेहमीप्रमाणे श्वसन करण्याचा प्रयत्न करा.
५. श्वास सोडा, गुडघे वाकवा, (चित्र क्र.५७३) पाय खाली आणि पावले डोक्यावरुन पलीकडे अशा बेताने न्या की पायाची बोटे जमिनीला लागतील (चित्र क्र.५८२). पावले डोक्यापासून जास्तीत जास्त लांबवा आणि पाय जमिनीकडे असू द्या. (चित्र क्र. ५८४)
६. या स्थितीत काही सेकंद राहा. आता ही स्थिती हलासनाच्या (चित्र क्र.२४१) उलट दिसेल. कण्याचा फार मोठा ताण व पोटावरील दाब यांमुळे श्वसन अतिशय जलद व कष्टाचे होईल. तेव्हा श्वास रोधू नका.
७. कोपरे वाकवा आणि हात रुंदावा. हातांचे पंजे खांद्यांच्या जवळ आणा आणि तळहात जमिनीवर टेका. गुडघे वाकवा. पावले डोक्याच्या जवळ आणा. (चित्र क्र.५८२). शरीर फिरवून हनुवटी वर आणा. (चित्र क्र.५८३) आणि ऊर्ध्व धनुरासन करा. (चित्र क्र.४८६). ताडासनात उभे राहा. (चित्र क्र.१) किंवा श्वास सोडून विपरीत चक्रासन (चित्र क्र.४८८ ते ४९९) करा आणि विसावा घ्या.
परिणाम
या आसनामुळे गंड भेरंडावसनासारखेच (चित्र क्र.५८० आणि ५८१) लाभ मिळतात. कुंडलिनी जागृत करणे हे या दोन आसनांचे प्रयोजन. कुंडलिनी म्हणजे आपणात वास करणारी दैवी विश्वशक्ती. पाठीच्या कण्याच्या मुळाशी सर्वात खालच्या नाडीचक्रात वेटोळ घालून झोपलेली नागीण हे तिचे प्रतीक. ही सुप्त शक्ती जागृत करण्याचा व तिला पाठीच्या कण्यामधून मेंदूपर्यंत (सहस्त्रार किंवा सहस्त्रदल कमलापर्यंत) नेण्याचा प्रयत्न योगी करीत असतो. भौतिक बंधनांपासून मुक्त होण्यासाठी सर्व शक्तीच्या दैवी मूलस्त्रोतावर चित्त एकाग्र करुन तो अहंकाराचा विलय करतो ‘नद्या समुद्रात विलीन होऊन त्यांचे नाम आणि रुप नाहीसे होते, त्याचप्रमाणे नामरुपाचा त्याग करुन जाणता माणूस स्वयंप्रकाशी, अनंत अशा परब्रह्माची प्राप्ती करुन घेतो.’
N/A
References : N/A
Last Updated : September 12, 2020
TOP