विविध विषय - अध्यात्म
श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे.
८७५.
स्वस्कंदी बैसणे आपुलिये छाये । अघटित काय घडो शके ॥१॥
दुजेंवीण सुखे स्वरुप बोलणे । अद्वैतासी उणे येऊं पाहे ॥२॥
सुख आणि दुःख वृत्तीच्या संबंधे । निवृत्तीच्या बोधे द्वंद्व कैंचे ॥३॥
सुखातीत देव पहावा अनंत । दास म्हणे संत वृत्तिशून्य ॥४॥
वृत्तिशून्य संत असोनियां वृत्ति । हे खूण जाणती अनुभवी ॥५॥
८७६.
ब्रह्म हे जाणावे आकाशासारिखे । माया हे ओळखे वायूऐसी ॥१॥
वायूऐसी माया चंचळ चपळ । ब्रह्म ते निश्चळ निराकार ॥२॥
निराकार ब्रह्म नाही आकारले । रुप विस्तारले मायादेवी ॥३॥
मायादेवी जाली नांव आणि रुप । शुद्ध सस्वरुप वेगळेंचि ॥४॥
वेगळेंचि परी आहे सर्वां ठायी । रिता ठाव नाही तयाविणे ॥५॥
तयाविणे ज्ञान तेंचि ते अज्ञान । नाही समाधान ब्रह्मेंविण ॥६॥
ब्रह्मेविण भक्ति तेंचि पैं अभक्ति । रामदासी मुक्ति ब्रह्मज्ञाने ॥७॥
८७७.
वृक्षेविण छाया गुणेविण माया । बिंबेविण वांया प्रतिबिंब ॥१॥
प्रतिबिंब सरी सिंधुविण लहरी । सोनेंविण परी अळंकार ॥२॥
अळंकार कृत्य कर्त्याविण केंवी । कैंची गथागोवी निर्गुणासी ॥३॥
निर्गुणासी गुण हेंचि मूर्खपण । दृश्येविण खूण दृष्टांताची ॥४॥
दृष्टांताची खूण परब्रह्मी घडे । वेदां मौन्य पडे कासयासी ॥५॥
कासयासी तेव्हां अद्वैत पहावे । द्वैतचि स्वभावे ब्रह्म जाले ॥६॥
जाले परब्रह्म अत्यंत सुगम । ब्रह्म आणि भ्रम एकरुप ॥७॥
एकरुप आहे दूध आणि ताक । हंसेविण काक बोलताती ॥८॥
बोलताती सर्वब्रह्म ऐसे बंड । व्यर्थचि थोतांड सत्य जाण ॥९॥
सत्य जाण ब्रह्म निर्मळ निश्चळ । मायेचा विटाळ जेथे नाही ॥१०॥
जेथे नाही गुण त्या नांव निर्गुण । गुरुमुखे खूण ठायी पाडी ॥११॥
ठायी पाडी सत्यस्वरुप शाश्वत । मग आपेंआप बुझशील ॥१२॥
बुझशील साच धरितां विश्वास । ओंवी रामदास गात असे ॥१३॥
८७८.
बोलवेना ते बोलावे । चालवेना तेथे जावे ॥१॥
नवल स्वरुपाचा योग । जीवपणाचा वियोग ॥२॥
वाट नाही तेथे जावे । जाणवेना ते जाणावे ॥३॥
हातां न ये तेंचि घ्यावे । मनेंवीण आटोपावे ॥४॥
नसोनियां भेटि घ्यावी । तुटी असोनि पडावी ॥५॥
रामदासी दृढ बुद्धि । होतां सहज समाधि ॥६॥
८७९.
सत्य राम एक सर्वहि मायिक । जाणावा विवेक योगियांचा ॥१॥
योगियांचा देव तया नाही खेंव । जेथे जीवशीव ऐक्यरुप ॥२॥
ऐक्यरुप जेथे हे पिंडब्रह्मांड । ते ब्रह्म अखंड निराकार ॥३॥
निराकार ब्रह्म बोलताती श्रुति । आद्य मद्य अंती सारिखेची ॥४॥
सारिखेंचि ब्रह्म नभाचियेपरी । सबाह्य अंतरी कोंदलेसे ॥५॥
कोंदलेसे परी पहातां दिसेना । साधुविण येना अनुभवा ॥६॥
अनुभवा येना ब्रह्म हे निश्चळ । जया तळमळ संसाराची ॥७॥
संसाराचे दुःख सर्वही विसरे । जरी मन भरे सस्वरुपी ॥८॥
सस्वरुपी नाही सुख आणि दुःख । धन्य हा विवेक जयापाशी ॥९॥
जयापाशी ज्ञान पूर्ण समाधान । त्यांची आठवण दास करी ॥१०॥
८८०.
राम अवघाची आपण । कैंची समाधि भिन्नपण ॥१॥
सहज सिद्धासी समाधी । तोचि जाणावी उपाधी ॥२॥
देहसमाधी धारणा । तेचि कली निवारणा ॥३॥
रामदासी अनुसंधान । समाधीसी समाधान ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : January 29, 2011
TOP