४५१ .
भूतभविष्याचे ज्ञान । जया अमृतभोजन ॥१॥
रे या देवांचा कैवारी । तोचि आमुचा सहाकारी ॥२॥
कल्पतरु चिंतामणी । कामधेनूची दुभणी ॥३॥
नाना रत्नांचे डोंगर । दिव्य भोग निरंतर ॥४॥
रामदासाची आवडी । अवघे देह तेहतिस कोडी ॥५॥
४५२ .
ध्यान करुं जाता मन हारपले । सगुणी जाहले गुणातीत ॥१॥
जेथे पाहे तेथे राघवाचे ठाण । करी चाप बाण शोभतसे ॥२॥
रामरुपी दृष्टी जाऊनी बैसली । सुखे सुखावली न्याहाळीता ॥३॥
रामदास म्हणे लांचावले मन । जेथे तेथे ध्यान दिसतसे ॥४॥
४५३ .
जन्मोजन्मीचे सुकृत । भेटि जाली अकस्मात ॥१॥
आतां सोडितां सुटेना । तंतु प्रीतिचा तुटेना ॥२॥
त्याग करितां संयोग । नव्हे कल्पांती वियोग ॥३॥
रामदासी ऐसे केले । देवभक्तां भेटवीले ॥४॥
४५४ .
भगवंताचे लळेवाड । मायबाप पुरवी कोड ॥१॥
रुसला धुरु बुझाविला । अढळपदी स्थिर केला ॥२॥
पुरवी उपमन्यूची आळी । क्षीरसागर दे वनमाळी ॥३॥
अंबरीष कडियेवरी । त्यास खालते नुतरी ॥४॥
रामदासा लोभावर । जवळा नित्य रघुवीर ॥५॥
४५५ .
राम माझी माता राम माझा पिता । राम न भजतां काय जिणे ॥१॥
जिणे ते जाणावे श्रीरामी भजावे । पुनरपि न यावे गर्भवासा ॥२॥
गर्भवास पाहे दारुण तो आहे । आतां सेवा पाय राघोबाचे ॥३॥
राघोबाचे पायी उद्धरली शीळा । दिव्यरुप बाळा प्रगटली ॥४॥
माझ्या राघोबाचे एक नाम घ्या रे । काम क्रोध वैरी पालटणे ॥५॥
पालटणे होय संसारस्वार्थ । हाचि धरा हेत दास म्हणे ॥६॥
४५६ .
छेत्री सुखासनी अयोध्येचा राजा । नांदतसे माझा मायबाप ॥१॥
माझा मायबाप त्रिलोकी समर्थ । सर्व मनोरथ पूर्ण करी ॥२॥
पूर्ण प्रतापाचा कैवारी देवांचा । नाथ अनाथांचा स्वामी माझा ॥३॥
स्वामी माझा राम योगियां विश्राम । सांपडले वर्म थोर भाग्य ॥४॥
थोर भाग्य त्याचे राम ज्याचे कुळी । संकटी सांभाळी भावबळे ॥५॥
भावबळे जेही धरिला अंतरी । तया क्षणभरी विसंबेना ॥६॥
४५७ .
राम अनाथांचा नाथ । आम्हां कैवारी समर्थ ॥ध्रु०॥
वनी शिळा मुक्त केली । गणिका विमानी वाहिली ॥१॥
राम दिनांचा दयाळ । देव सोडिले सकळ ॥२॥
रामीरामदास म्हणे । आतां आम्हां काय उणे ॥३॥
४५८ .
राम अयोध्येचा राजा । तोचि बाप होय माझा ॥१॥
वामभागी जी शोभली । तीच माझी हो माउली ॥२॥
ज्यासी म्हणती लक्ष्मण राजा । तोचि दिव्य चुलता माझा ॥३॥
ज्याचा सोन्याचा कांसोटा । तोचि बंधू माझा मोठा ॥४॥
ऐशा कुळी मी जन्मलो । दास म्हणे धन्य जालो ॥५॥
४५९ .
धांवा केला भक्तजनी । आली देवाची धांवणी ॥१॥
देव घातले बांदोडी । तेथे राम घाली उडी ॥२॥
रामीरामदासी भेटी । जाली संसाराची तुटी ॥३॥
४६० .
जाणे सुख दुःख राम माझा एक । येर ते माईक वैभवाची ॥१॥
वैभवाची सखी वोरंगोनि जाती । आत्माराम अंती जिवलग ॥२॥
जिवलग नाही श्रीरामावांचोनि । हाचि माझे मनी दृढ भाव ॥३॥
भाव अन्यत्रांचा आहे वरपंगाचा । रामेविण कैंचा अंतरंग ॥४॥
अंतरींची व्यथा श्रीरामासमर्था । जाणवल्या चिंता दुरी करी ॥५॥
करी प्रतिपाळ शरण आलियांचा । राम त्रैलोक्याचा मायबाप ॥६॥
मायबाप धन सज्जन सोयरा । एका रघुवीरावीण नाही ॥७॥
नाही मज चिंता श्रीराम असतां । संकटी बोहातां उडी घाली ॥८॥
उडी घाली मज अनाथाकारणे । राम सर्व जाणे अंतरीचे ॥९॥
अंतरीचे गुज राम सर्व बीज । रामदासी निज प्रगटले ॥१०॥