मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
अध्यात्म

विविध विषय - अध्यात्म

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे.


७८६.
देवा तूं समर्थ तुज येणे जाणे । नव्हे श्लाघ्यवाणे सर्वथाही ॥१॥
सर्वथाही नाही श्लाघ्य दुःख शोक । उणे पुरे लोक बोलताती ॥२॥
बोलताती जे ते सर्वही सांडावे । निश्चळचि व्हावे दास म्हणे ॥३॥

७८७.
देवासी सांडुनी देऊळ पूजिती । लौकिकाचा रीती काय सांगो ॥१॥
काय सांगो आतां देखत देखतां । देव पाहो जातां जेथे तेथे ॥२॥
जेथे तेथे देव लोक ओळखेना । विचार पाहीना कांही केल्या ॥३॥
कांही केल्या तरी देव सांपडेना । संसारे घडेना समाधान ॥४॥
समाधान नाही देवांवाचूनियां । सर्व कर्म वयां निरर्थक ॥५॥
निरर्थक तीर्थे व्रते तपे दाने । एका ब्रह्मज्ञाने वांचूनियां ॥६॥
वांचूनियां ज्ञान ते पशुसमान । अज्ञाने पतन पाविजेते ॥७॥
पाविजेते दुःख विचार नसतां । कम करुं जातां कासावीस ॥८॥
कासावीस कर्मे होईजे भ्रमिष्ट । देव सर्व श्रेष्ठ अंतरला ॥९॥
अंतरला देव सर्वांचे कारण । सर्व निःकारण सहजचि ॥१०॥
सहजचि जाले कर्मभोगे केले । वाताहात जाले सर्व कांही ॥११॥
सर्व कांही नाही एका देवेवीण । शाश्वताची खूण वेगळचि ॥१२॥
वेगळीच खूण सज्जन जाणती । खुणेसी बाणती संतजन ॥१३॥
संतजन बोधी जाहाले सज्जन । त्यांचा अनुमान दुरावला ॥१४॥
दुरावला देव दुरी सांडुं नये । धरावा उपाय साधूसंग ॥१५॥
साधूसंगे साधा सद्वस्तु विवेके । तुम्हांसी लौकिके काय काज ॥१६॥
काय काज आहे परलोका जातां । लौकिक तत्वता येहि लोकी ॥१७॥
येहि लोकी करा लोकसंपादणी । त्रैलोक्याचा धनी ओळखावा ॥१८॥
ओळखावा देव नित्य निरंजन । तया जन वन सारिखेची ॥१९॥
सारीखेचि ब्रह्म आहे सर्वां ठायी । संतां शरण जाई आलया रे ॥२०॥
आलया रे तुज देवचि कळेना । जेणे केले नाना सृष्टिभाव ॥२१॥
सृष्टिभाव कोणे केले ते पहावे । पाहोनि रहावे समाधाने ॥२२॥
समाधान केले संसार करितां । देवासी नेणतां जन्म गेला ॥२३॥
जन्म गेला सर्व केला खटाटोप । उदंड आटोप आटोपीला ॥२४॥
आटोपीला परी देव अंतरला । अभाग्या कशाला जन्मलासी ॥२५॥
जन्मलासी वायां जननी कष्टली । नाही उद्धरीली कुळवल्ली ॥२६॥
कुळाचे मंडण ब्रह्मज्ञानी जन । जयां सनातन प्रगटला ॥२७॥
प्रगटला देव जयाचे अंतरी । धन्य सृष्टीवरी तोचि एक ॥२८॥
तोचि एक धन्य ब्रह्मादिकां मान्य । निर्गुणी अनन्य सर्वकाळ ॥२९॥
सर्वकाळ गेला कथानिरुपणे । अध्यात्मश्रवणे निजध्यासे ॥३०॥
निजध्यास जया लागला स्वरुपी । जाला ब्रह्मरुपी ब्रह्मरुप ॥३१॥
ब्रह्मरुप तेथे ब्रह्मचि नाडळे । विवेकाने गळे अहंभाव ॥३२॥
अहंभाव गळे ब्रह्मानुसंधाने । आत्मनिवेदने अन्यनता ॥३३॥
अनन्यता जोडे ऐसे ज्ञाते थोडे । ज्यांचेनि निवडे सारासार ॥३४॥
सारासार पाहे तो साधू पूरता । जाणे अन्यनता भक्ति करुं ॥३५॥
भक्ति करुनियां मुक्ति पाविजेते । विवेके आईते ब्रह्मरुप ॥३६॥
ब्रह्मरुप जाले लोकिकी वर्तले । साधू ओळखिले साधुजनी ॥३७॥
साधुजनी साधु ऐसा जाणिजेतो । इतरा जना तो चोजवेना ॥३८॥
चोजवेना लीळा कैसी अंतर्कळा । असोनि निराळा जनांमध्ये ॥३९॥
जनांमध्ये आहे जनांसी कळेना । जैसा आकळेना निरंजन ॥४०॥
निरंजन जनी असेना कळेना असोनी । तैसा साधु जनी निरंजन ॥४१॥
निरंजन नाही आणिला प्रचीती । तयां जनां गती कोण म्हणे ॥४२॥
कोण म्हणे धन्य ते प्राणी जघन्य । जयासी अनन्य भक्ती नाही ॥४३॥
भक्ती नाही मनी त्या नांव अभक्त । संसारी आसक्त जन्मवरी ॥४४॥
जन्मवरी लोभे सर्व स्वार्थ केला । अंती प्राण गेला एकलाची ॥४५॥
एकलाचि गेला दुःख भोगूनियां । कन्या पुत्र जाया सांडूनीयां ॥४६॥
सांडूनी स्वजन गेला जन्मोजन्मी । अज्ञानाची ऊर्मी निरसेना ॥४७॥
निरसेना ऊर्मी अंतर्देहधर्मी । प्राणी परब्रह्मी अंतरला ॥४८॥
अंतरला दुरी असोनि अंतरी । तया कोण करी सावधान ॥४९॥
सावधान व्हावे आपले आपण । सृष्टीचे कारण ओळखावे ॥५०॥
ओळखावे ब्रह्म तेणे तुटे भ्रम । आणि मुख्य वर्म अज्ञानाचे ॥५१॥
अज्ञानाचे वर्म अंतरी निरसे । जरी मनी वसे विचारणा ॥५२॥
विचारे पहातां सर्वत्रांचे मूळ । तेणे ते निर्मूळ ब्रह्म भासे ॥५३॥
ब्रह्म भासे ऐसे कदा म्हणो नये । परंतु उपाय श्रवणाचा ॥५४॥
श्रवणाचा अर्थ यथातथ्य काढी । ऐसा कोण गडी सावधान ॥५५॥
सावधान मन करुनी मनन । मनाचे उन्मन होत आहे ॥५६॥
होत आहे परी केलेचि पाहिजे । विचारे लाहिजे मोक्षपद ॥५७॥
मोक्षपद कैसे कोणासी म्हणावे । विवेके जाणावे हेंचि एक ॥५८॥
हेंचि एक बरे पाहातां सुटीका । संसार लटीका बंधनाचा ॥५९॥
बंधनाचा भाव ज्ञाने केला वाव । मोक्षाचा उपाय विचारणा ॥६०॥
विचारणा करी धन्य तो संसारी । संदेहे अंतरी आढळेना ॥६१॥
आढळेना देहो काईसा संदेहो । नित्य निसंदेहो संतजन ॥६२॥
संतजन जेथे धन्य जन तेथे । सार्थकचि होते अकस्मात ॥६३॥
अकस्मात देव सांपडे उदंड । दृश्याचे थोतांड नाशिवंत ॥६४॥
नाशिवंत काय विचारे पहावे । ते सर्व राहावे सांडूनीयां ॥६५॥
सांडूनीयां दृश्य आणि मनोभास । मग जगदीश ओळखावा ॥६६॥
ओळखावे तया असावे अनन्य । तरी संतमान्य होईजे ते ॥६७॥
होईजेते कैसे ज्याचे त्यास कळे । जो कोणी निवळे मनामध्ये ॥६८॥
मनामध्ये मन जनांमध्ये जन । निर्गुणी अनन्य निर्गुणचि ॥६९॥
निर्गुणचि नव्हे जो कोणी चांडाळ । त्यासी सर्वकाळ जन्ममृत्यु ॥७०॥
जन्ममृत्यु यमयातना दारुण । चुकवील कोण ज्ञानेवीण ॥७१॥
ज्ञानेवीण जिणे व्यर्थ दैन्यवाणे । वाचितो पुराणे पोटासाठी ॥७२॥
पोटासाठी लोकां करी नमस्कार । होतसे किंकर किंकरांचा ॥७३॥
किंकरांचा दास भूषण मिरवी । सृष्टीचा गोसावी ओळखेना ॥७४॥
ओळखेना देव ओळखेना भक्त । ओळखेना संत महानुभाव ॥७५॥
महानुभाव देव कांहीच कळेना । मन ही वळेना पुण्यमार्गे ॥७६॥
पुण्यमार्ग कैसा पाप आहे कैसे । कळेना विश्वासेवीण कांही ॥७७॥
कांही तरी एक पहावा विचार । कैसा पैलपार पाविजे तो ॥७८॥
पावीजे तो पार होतसे उद्धार । सर्वहि ईश्वरसन्निधाने ॥७९॥
सन्निधान ज्याचे ईश्वरी सर्वदा । संसाराआपदा तया नाही ॥८०॥
तया नाही जन्ममरणाची बाधा । मिळाले संवादा संतांचिया ॥८१॥
संतांचिया गुणा जे गुणग्राहिक । तयां नाही नर्क येरां बाधी ॥८२॥
बाधीतसे येतां सर्वही संसार । ज्ञानी पैलपार उत्तरले ॥८३॥
उत्तरले पार सर्व माईकाचा । धन्य विवेकाचा उपकार ॥८४॥
उपकार जाला थोर या शब्दांचा । मार्ग निर्गुणाचा सांपडला ॥८५॥
सांपडला मार्ग धन्य सांख्ययोग । फळासी विहंग पावे जैसा ॥८६॥
पावे जैसा पक्षी तया अकस्मात । तैसा अकल्पित ज्ञानमार्ग ॥८७॥
ज्ञानमार्ग सर्व मार्गांमध्ये श्रेष्ठ । बोलिले वरिष्ठ ठायी ठायी ॥८८॥
ठायी ठायी देव मांडूनी बैसती । तेणे कांही मुक्ति पाविजेना ॥८९॥
पाविजेना मुक्ति भक्तांवाचुनीयां । भक्तीविण वायां गेले लोक ॥९०॥
लोक गेले वांया भक्ति न करीतां । देवासि नेणतां जाणपणे ॥९१॥
जाणपण मूर्खे आणिले जायाचे । जैसे भांडे काचे मृत्तिकेचे ॥९२॥
मृत्तिकेचे भांडे वळेना वांकेना । शेवटी तगेना कांही केल्या ॥९३॥
कांही केल्या लोक करीना सार्थक । होय निरर्थक सर्व कांही ॥९४॥
सर्व कांही जाते प्रचीतीस येते । भ्रमले मागुते मायाजाळी ॥९५॥
मायाजाळ तुटे जरी देव भेटे । परिसेसी झगटे लोह जैसा ॥९६॥
लोह जैसा रुपे पालटे सर्वांगी । तैसा जाण योगी योगीसंगे ॥९७॥
योग्याचे संगती सर्वकाळ योग । कैंचा मा वियोग परब्रह्मी ॥९८॥
परब्रह्मी लोक प्रत्यक्ष वागती । परी त्यांची गति चोजवेना ॥९९॥
चोजवेना गती गुरुमुखेविण । रामदास खूण सांगतसे ॥१००॥

N/A

References : N/A
Last Updated : January 29, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP