४८१ .
भगवंताचे भक्तीसाठी । थोर करावी आटाआटी ॥१॥
स्वेदबिंदु आले जाण । तेंचि भागीरथीचे स्नान ॥२॥
वोळंगतां देवराव । सहज होतसे उपाव ॥३॥
सकळ लोकांचे भाषण । देवासाठी संभाषण ॥४॥
जे जे हरपले सांडले । देवाविण कोठे गेले ॥५॥
जठराग्नीस अवदान । लोक म्हणती भोजन ॥६॥
एकवीस सहस्त्र जप । होतो न करितां साक्षेप ॥७॥
दास म्हणे मोठे चोज । देव सहजी सहज ॥८॥
४८२ .
वेधे भेदावे अंतर । भक्ति घडे तदनंतर ॥१॥
मनासारिखे चालावे । हेत जाणोनि बोलावे ॥२॥
जनी आवडीचे जन । त्याचे होताती सज्जन ॥३॥
बरे परीक्षावे जनां । अवघे सगट पिटावेना ॥४॥
दास म्हणे निवडावे । लोक जाणोनियां घ्यावे ॥५॥
४८३ .
आम्ही रामाचे रामाचे । दास रंक दीन त्याचे ॥१॥
सर्वकाळ हरीचे ध्यान । नाही आणिक साधन ॥२॥
चित्त गुंतलेसे ध्यानी । सदा हरीचे भजनी ॥३॥
राम सर्वांचे दैवत । भाव जाणुनि जैसा तेथ ॥४॥
राम तारक दीनांसी । चमत्कार रामदासी ॥५॥
४८४ .
सोडी संसाराची आस । धरी भक्तिचा हव्यास ॥१॥
दुःखमूळ हा संसार । तयामध्ये भक्ति सार ॥२॥
ग्रंथ पाहतां लक्षकोटी । जेथे तेथे भक्ति मोठी ॥३॥
जन्मा आलियाचे फळ । दास म्हणे हे सफळ ॥४॥
४८५ .
न करितां भजन होईल तर्जन । तेथे कोण जन सोडवील ॥१॥
सोडवील देव अनाथांचा नाथ । तो एक समर्थ मनी धरा ॥२॥
मनी धरा गोष्टी आपुल्या हिताची । भक्ति स्वहिताची दास म्हणे ॥३॥
४८६ .
आलया देवाची वाट चुकलासी । म्हणोनि आलासी संसारी ॥१॥
संसारी दुःखे करिसी रुदन । चुकले भजन राघवाचे ॥२॥
राघवाची भक्ति नेणतां विपत्ति । तुज अधोगती जन्म जाला ॥३॥
जन्म जाला परी वेगी सोय धरी । सत्वर संसारी मोकळिक ॥४॥
मोकळिक होय भक्तिपंथे जातां । हे वाक्य तत्वतां दास म्हणे ॥५॥
४८७ .
सर्वकाळ गेला संसार करितां । तरी सार्थकता कैसी घडे ॥१॥
कैसी घडे भक्ति कैसी घडे मुक्ति । म्हणोनियां चित्ती गोष्टी धरा ॥२॥
गोष्टी धरा मनी स्वहितालागुनी । बैसा देवध्यानी क्षणएक ॥३॥
क्षण एक गेला सुखाचा बोलता । तेणे कांही चिंता ओसरेल ॥४॥
ओसरेल चिंता संसाराची माया । भजे रामराया दास म्हणे ॥५॥
४८८ .
सुपुत्र संसारी कुळाचे मंडण । वंशउद्धरण हरिभक्त ॥१॥
भक्त तरे तारी बेताळीस कुळे । भक्तिचेनीमुळे जगदोद्धार ॥२॥
जगदोद्धार करी सुपुत्र संसारी । येर अनाचारी पापरुपी ॥३॥
पापरुपी नर अभागी जाणावे । जयासी नेणवे देवराणा ॥४॥
देवराव वोळे देखोनियां भाव । दास म्हणे माव कामा नये ॥५॥
४८९ .
सर्व कांही चिंता केली भगवंताने । आपुले चिंतने काय होते ॥१॥
काय होते देव कांही कां करीना । विश्वासावे मना ऊर्ध्वगती ॥२॥
ऊर्ध्वगती हे तों बुध्दीच्या वैभवे । उतराई व्हावे काय आतां ॥३॥
काय आतां द्यावे काय आहे माझे । मीपणाचे ओझे कासयासी ॥४॥
कासयासी चित्त दुश्चित करावे । संसारी तरावे देवाचेनि ॥५॥
देवाचेनि नामे हरतील कर्मे । परी नित्यनेमे जपध्यान ॥६॥
जपध्यान पूजा अखंड करावी । बुध्दि विवरावी देव देणे ॥७॥
देवदेणे बुध्दि तेणे सर्व सिद्धि । गति निरवधि होत असे ॥८॥
होत असे गती देवी विश्वासतां । चिंता नाही आता कासयाची ॥९॥
कासयाची चिंता कासया करावी । भक्ति हे धरावी राघवाची ॥१०॥
राघवाची भक्ति तेणे होय मुक्ति । भक्तीविण युक्ति कामा नये ॥११॥
कामा नये युक्ति धरावा विश्वास । सांगतसे दास प्रचीतीने ॥१२॥
४९० .
हरिभक्ति करी धन्य तो संसारी । जयाचा कैवारी देवराणा ॥१॥
देवराणा सदा सर्वदा मस्तकी । तयासी लौकिकी चाड नाही ॥२॥
चाड नाही तया राघवाच्या दासा । सार्थक वयसा रामदासी ॥३॥