मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
उपदेशपर

विविध विषय - उपदेशपर

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे.


६१०.
नमन योगीराया स्वामी दत्तात्रया । गाईन ओंवीया संसारीच्या ॥१॥
संसारीचे दुःख आठवले मनी । मागे नाना योगी भोगीलिया ॥२॥
भोगीलीया परी नाही आठवण । दुःख ते कठीण विसरलो ॥३॥
विसरलो राम चित्ती दृढ काम । तेणे गुणे श्रम थोर जाला ॥४॥
जालो कासावीस थोर गर्भवासी । नको त्या दुःखासी सांगवेना ॥५॥
सांगवेना सीण अत्यंत कठीण । रामा तुजवीण दुःख जाले ॥६॥
दुःख जाले भारी मातेचे उदरी । नव मास वरी कोंडियेले ॥७॥
कोंडियेले मज अत्यंत सांकडी । रामा कोण सोडी तुजवीण ॥८॥
तुजविणे मज जाहाले बंधन । जठरी शयन जननीचे ॥९॥
जननीजठर संकोचित थोर । विष्ठा आणि मूत्र नाकी तोंडी ॥१०॥
नाकी तोंडी जंत वांति आणि पित्त । निर्बुजले वित्त वायो नाही ॥११॥
वायो नाही तेथे वन्हीचा उबारा । तेणे या शरीरा दुःख होय ॥१२॥
दुःख होय थोर सर्वांग आहाळे । तेणे गुणे पोळे अस्थि मांस ॥१३॥
अस्थींचा पंजर सिरी वेटाळीला । नाडी गुंडाळीला मेद मांसे ॥१४॥
मेद मांस कृमी कुश्चिळ कातडी । गळती आंतडी लवथवीत ॥१५॥
ऐसे अमंगळ अत्यंत कुश्चीळ । प्राण हा व्याकूळ होय दुःख ॥१६॥
दुःखे आला त्रास तेणे कोंडि श्वास । कोंडिले उमस घेतां नये ॥१७॥
नये नये येतां सर्वथा बाहेरी । ऐसिये दाथरी उकडीले ॥१८॥
उकडितां प्राणी करी तळमळ । तंव जन्मकाळ आला पुढे ॥१९॥
आले पुढे अंतःकाळाचे संकट । कष्टांवरी कष्ट थोर जाले ॥२०॥
थोर जाले कष्ट मातेच्या उदरी । सीणलो श्रीहरी दास तुझा ॥२१॥
दास्य मी करीन ऐसे होते ध्यान । जन्मकाळी प्राण गेला माझा ॥२२॥
गेला माझा प्राण जाले विस्मरण । स्वामीचे चरण विसरलो ॥२३॥
विसरलो सोहं मग म्हणे कोहं । जन्म काळी बहु दुःख जाले ॥२४॥
दुःखे दुखवलो मग म्हणे आहो । जन म्हणे टाहो फोडियेला ॥२५॥
फोडियेला टाहो पडतां भूमीवरी । दिवसेंदिवस हरी विसरलो ॥२६॥
विसरलो बुद्धि स्वहिताची शुद्धि । अज्ञानाची वृद्धि होत आहे ॥२७॥
होत आहे वृद्धि दृढ देहेबुद्धि । तुज कृपानिधी अंतरलो ॥२८॥
अंतरलो सुख तुज विसरतां । विषयो भोगितां दुःख जाले ॥२९॥
दुःख जाले फार ऐसा हा संसार । पुढे षड विकार उद्भवले ॥३०॥
उद्भवले तेणे सुख दुःख कळे । प्राण हा आंदोळे दुःख होतां ॥३१॥
दुःख होय देही माता नेणे कांही । मज वाचा नाही काय करुं ॥३२॥
काय करुं दुःखे पोळे अभ्यंतर । मातेसी अंतर जाणवेना ॥३३॥
जाणवेना माझे दुःख मी अज्ञान । मग मी रुदन करी देवा ॥३४॥
करीं देवा आतां माझी सोडवण । दुःख हे दारुण भोगवेना ॥३५॥
भोगवेना दुःख संसारीचे आतां । धांवे बा अनंता पावे वेगी ॥३६॥
पावे वेगी दास सोडवी आपुले । लोभे वाहावले मायाजाळी ॥३७॥
मायाजाळी दृढ झाले माझे माझे । रामा नाम तुझे आठवेना ॥३८॥
आठवेना चित्ती स्वहिताचे ज्ञान । मायबापी लग्न केले लोभे ॥३९॥
लोभे लग्न केले मानिली आवडी । पायी वोली बेडी बंधनाची ॥४०॥
बंधनाची बेडी प्रबळला कम । मग कैंचा राम आठवेल ॥४१॥
आठवेना राम स्वामी त्रैलोक्याचा । जालो कुंटुंबाचा भारवाही ॥४२॥
भारवाही जालो रामा अंतरलो । बंधनी पडलो काय करुं ॥४३॥
काय करुं मज कामाचे सांकडे । संसाराचे कोडे उगवेना ॥४४॥
उगवेना मन आठवे कांचन । सर्वकाळ ध्यान प्रपंचाचे ॥४५॥
प्रपंचाचे ध्यान लागले मानसी । चित्त अहर्निशी दुश्चंचळ ॥४६॥
चंचळ मानस संसारउद्वेगे । क्षणक्षणा भंगे चित्तवृत्ती ॥४७॥
वृत्ती कांता धन पाहे जनमान । इच्छेचे बंधन दृढावले ॥४८॥
दृढावले ओझे प्रपंचाचे माथां । तेणे गुणे वेथा थोर होय ॥४९॥
थोर होय वेथा तारुण्याच्या भरे । कामाचे कावीरे आवरेना ॥५०॥
आवरेना क्रोध तेणे होय खेद । वृत्तींचा उच्छेद करुं पाहे ॥५१॥
करुं पाहे घात थोर पुढिलांचा । मार्ग स्वहिताचा अंतरलो ॥५२॥
अंतरलो भक्ती ठाकेना विरक्ती । देवा तुझी प्राप्ति केंवी घडे ॥५३॥
केंवी घडे प्राप्ति पतितासी । जाल्या पापराशी सांगो किती ॥५४॥
सांगो किती दोष जाले लक्ष कोटी । पुण्य माझे गांठी आढळेना ॥५५॥
आढळेना पुण्य पापाचे डोंगर । करिती संसार माझे माझे ॥५६॥
माझी माता पिता माझे बंधुजन । पुत्र कांता धन सर्व माझे ॥५७॥
सर्व माझे ऐसे मानिला भर्वंसा । तुज जगदीशा विसरलो ॥५८॥
विसरलो तुज वैभवाकरितां । सेखी मातापिता राम जाली ॥५९॥
राम जाली माता देखत देखतां । तरी म्हणे कांता पुत्र माझे ॥६०॥
माझे पुत्र माझे स्वजन सोईरे । दृढ देही भरे अहंभाव ॥६१॥
अहंभाव मनी दुःख आच्छादुनी । वर्ततसे जनी अभिमाने ॥६२॥
अभिमान माथां वाहे कुटुंबाचा । अंतरी सुखाचा लेश नाही ॥६३॥
नाही नाही सुख संसारी पाहतां । पुरे देवा आतां जन्म नको ॥६४॥
नको नको आतां घालूं या संसारी । पोळलो अंतरी काय करुं ॥६५॥
काय करुं माझे नेणती स्वहित । आपुलाले हित पाहतील ॥६६॥
पाहतील हित वैभवाची सखी । कोणी मज सेखी कामा नये ॥६७॥
कामा नये कोणी तुजवीणे रामा । नेई निजधामा माहियेरा ॥६८॥
माहियेर माझे अंतरले दूरी । लोभे दुराचारी गोवियेले ॥६९॥
गोवियेले मज आपुलाल्या हिता । माझी कोणी चिंता केली नाही ॥७०॥
केली नाही चिंता लोभे गुंडाळीले । पिळुन घेतले सर्व माझे ॥७१॥
सर्व माझे गेले जालो नि कारण । स्वामीचे चरण अंतरलो ॥७२॥
अंतरलो देवा आयुष्य वेंचले । अंतर पडिले काय करुं ॥७३॥
काय करुं आतां शरीर खंगले । मज ओसंडिले जिवलगी ॥७४॥
जिवलगी मज ओसंडिले देवा । काय करुं ठेवा प्रालब्धाचा ॥७५॥
प्रालब्धाचा ठेवा प्रपंची रंगला । देह ही खंगला वृद्धपणी ॥७६॥
वृध्दपणी माझे चळले शरीर । श्रवण बधीर नेत्र गेले ॥७७॥
नेत्र गेले मज पाहतां दिसेना । स्वये उठवेना पाय गेले ॥७८॥
पाय गेले तेणे दुःख होय भारी । तेथेंचि बाहेरी जाववेना ॥७९॥
जाववेना तेणे जाले अमंगळ । अत्यंत कुश्चीळ वांती पित्त ॥८०॥
वांति पित्त जन देखोनि पळती । दुर्गंधी गळती नवनाळी ॥८१॥
नवनाळी वाहे दुर्गंधी न साहे । वांति होऊं पाहे देखतांचि ॥८२॥
देखते सकळ सुटले पाझर । मळमूत्री धर धरवेना ॥८३॥
धरवेना तृषा क्षुधा आणि दिशा । पराधेन आशा प्रबळली ॥८४॥
प्रबळली आशा जाली अनावर । चित्ती तृष्णातुर सर्वकाळ ॥८५॥
सर्वकाळ चित्ती थोर लोलंगता । खायासी मागतां नेदी कोणी ॥८६॥
नेदी कोणी कांही क्षीण जालो देही । जिवलगी तेही ओसंडीले ॥८७॥
ओसंडीले मज वैभव गेलियां । देह खंगलीयां दुःख जाले ॥८८॥
दुःख जाले थोर क्षुधा आवरेना । अन्न हि जिरेना वांती होय ॥८९॥
वांती होय तेणे निर्बुजे वासना । स्वादिष्ट चाववेना दांत गेले ॥९०॥
दांत गेले तेणे जिव्हेची बोबडी । कंठ गडगडी बोलवेना ॥९१॥
बोलवेना अंतःकाळीच्या विपत्ती । सर्वही म्हणती मरेना कां ॥९२॥
मरेना कां आतां कासयां वाचलां । देव विसरला नेणो यासी ॥९३॥
नेणो याची नाही मर्यादा खुंटली । सकळां लागली चिंता मनी ॥९४॥
चिंता मनी वाटे मृत्युची सकळां । सर्वांसी कंटाळा आला थोर ॥९५॥
आला थोर त्रास जिवलग बोलती । देवा याची माती उचलावी ॥९६॥
उचलावी माती सर्वांचे अंतरी । सुखाची सोईरी दूरी ठेली ॥९७॥
दूरी ठेली सर्व सुखाची चोरटी । कोणीच सेवटी सोडवीना ॥९८॥
सोडवीना कोणी श्रीरामावांचूनि । संकटी धांवणी राम करी ॥९९॥
राम करीतसे दासांचा सांभाळ । भक्तांचा स्नेहाळ राम येक ॥१००॥

N/A

References : N/A
Last Updated : January 26, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP